बिस्के उपसागर : फ्रान्सच्या पश्चिमेला व स्पेनच्या उत्तरेकडील अटलांटिक महासागराच्या भागाला बिस्के उपसागर म्हणतात. स्पेनच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या बॅस्क लोकांवरून हे नाव पडले आहे. रोमन लोक त्यास ‘कँटेब्रिअन समुद्र’ म्हणत. त्याचा विस्तार फ्रान्समधील ब्रिटनीनजीक असलेल्या अशंत बेटापासून स्पेनच्या वायव्येस असलेल्या ऑर्टेगाल भूशिरापर्यंत आहे. फ्रान्समधील ल्वार आणि गारॉन या दोन मोठ्या व इतरही अनेक लहान नद्या या उपसागरास मिळतात. फ्रान्सच्या किनाऱ्याजवळ या उपसागरात बेल ईल, एल् द्यू, एल् दॉलेराँ, एल् द न्वार्मूत्ये यांसारखी महत्त्वाची बेटे आहेत. त्यांच्या सु. ६४० किमी. लांबीच्या किनाऱ्यावर फ्रान्समध्ये सँ नाझेर, लार्शेल, रॉशफॉर आणि स्पेनमधील सॅन सिबॅस्‌चॅन, बिलबाओ व सांतांदेर ही बंदरे वसलेली आहेत. र्‌वायां व सीं झँद लूझ ही फ्रान्सच्या समुद्रतटावरील महत्त्वाची आरोग्यकेंद्रे आहेत. स्पेनमधील आणि फ्रान्समधील उत्तरेकडील किनारा दंतुर असून जिराँद आणि आडूर या दोन नद्यांमधील किनारा मात्र सरळ आहे. त्यावर वाळूच्या टेकड्या मोठ्या प्रमाणात आढळतात. वायव्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे अनेकदा या उपसागरात वादळे उद्‌भवतात. त्यावेळी उसळणाऱ्या भरतीच्या लाटा सु. १२ मी. उंचीच्या असतात.

खांडवे, म. अ.