राजनांदगाव : मध्य प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व पूर्वीच्या नांदगाव संस्थानाची राजधानी. लोकसंख्या ८६,३४३ (१९८१). हे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील तसेच दक्षिण-पूर्व रेल्वेच्या मुंबई-कलकत्ता (नागपूरमार्गे) लोहमार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. दुर्गच्या पश्चिमेस सु. २४ किमी. वरील हे शहर पूर्वीपासून सुती कापडाची व शेतमालाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे.

सुरुवातीच्या काळात या शहरावर गोंड राजांची सत्ता असावी. एकोणिसाव्या शतकात सोहपूर (पंजाब) येथील प्रल्हाद दास नावाच्या महंत घराण्यातील एका व्यापाऱ्याने येथे वास्तव्य केले व हळूहळू या भागात आपले वर्चस्व वाढविले. त्याने व्यापारात भरपूर संपत्ती मिळविली व मृत्यूपूर्वी महंत हरी दास याला सर्व दान दिली. हरी दासाने कर्जाच्या मोबदल्यात एका जमीनदाराकडून त्याची सर्व मालमत्ता घेतली व यातूनच संस्थानाची निर्मिती झाली. पुढे त्याच्या शिष्यांनी या संस्थानाचा सर्व कारभार आपल्या हाती घेतला. त्यांच्यानंतर महंत मंजिराम, त्याचा शिष्य घसी दास, घसी दासाचा मुलगा घनराम यांनी संस्थानाची सत्ता आपल्या ताब्यात घेतली. ब्रिटिश सरकारने १८६५ मध्ये घनरामाला सरंजामदार म्हणून मान्यता दिली व सनद म्हणून दत्तक घेण्याची परवानगी दिली. त्याने तीनच वर्षे गादी सांभाळली. त्यानंतर राजा बलराम दास याने संस्थानाचा कारभार पाहिला. त्या काळी राजनांदगाव ही संस्थानाची राजधानी होती. १९४७ मध्ये हे संस्थान दुर्ग जिल्ह्यात विलीन झाले.

शहरात जुन्या वास्तूंपैकी एक मोठा राजवाडा असून त्याने सु. २ हे. क्षेत्र व्यापलेले आहे. येथे गोंड राजा जित्राईच्या कारकीर्दीतील काही वस्तू जतन केलेल्या आहेत. शहरात राणी बाग, बलदेव बाग इ. प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. येथे एक कापूस वटण गिरणी व विभागीय शासकीय मुद्रणालय आहे. जवळच असलेल्या शिवनाथ नदीतून शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहरात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये काली देवतेची मोठी यात्रा भरते. सय्यद बाबा अताल्शाहचा उरूसही मोठ्या प्रमाणात साजरा होतो.

चौंडे, मा. ल.