सप्तमहाद्वीपे : भारतीय पुराणांनी वर्णिलेली, पृथ्वीच्या सात द्वीपांची संकल्पना. या संकल्पनेविषयीचे उल्लेख महाभारत ⇨ भीष्मपर्व ) तसेच देवी भागवत, विष्णु, स्कंद आदी पुराणांतून आढळतात. कुश, कौंच, जंबु, पुष्कर, प्लक्ष, शाक व शाल्मली ही ती सात द्वीपे होत. सप्तद्वीपांच्या मूळ संकल्पनेविषयी व त्यांच्या सभोवती असलेल्या सागरांविषयी देवी भागवता त एक कथा आढळते, ती पुढीलप्रमाणे : स्वयंभू मनूला प्रियंवत व उत्तानपाद नामक दोन पुत्र होते. त्यांपैकी प्रियंवत व त्याचे वंशज यांनी पृथ्वीवर अनेक वर्षे राज्य केले. त्याने रविराजाला ⇨ सूर्याला ) पृथ्वीच्या एकाच दिशेने मार्गकमण करताना पाहिले. सूर्य एकाच बाजूने जात असताना दुसरी बाजू निसर्गत:च अंध:कारमय असणार. आपल्या फिरण्याने असेच घडेल काय ? पृथ्वीवर सदा सर्वकाळ प्रकाश असला पाहिजे आणि अंध:काराचा लवलेशही राहता कामा नये, या विचारात एक दिवस तो रथात बसला आणि त्याने पृथ्वीला सात प्रदक्षिणा घातल्या. त्याच्या रथाच्या चाकांमुळे जमिनीवर सात भेगा पडल्या व त्यांमुळे सप्तमहाद्वीपे निर्माण झाली.

पौराणिक संकल्पनेत निर्देशिलेल्या या सप्तद्वीपांचे साधर्म्य पुराणांतील प्रदेशवाचक आणि लोकवाचक नामसदृशांवरून विदयमान भौगोलिक-प्राकृत रचनेत शोधण्याचा प्रयत्न वि. का. राजवाडे यांनी केला असून काही अनुमाने काढली आहेत. त्यांच्या मते कॅस्पियन आणि अरल समुद्र या दोहोंमधील प्रदेश कुशद्वीप असावे. ते हिंदुकुशच्या उत्तरेस असल्याचे वर्णन आढळते. घृत समुद्राच्या पश्चिमेस कौंचद्वीप आहे. सध्याची बूखारा आणि समरकंद ही शहरे पूर्वी या प्रदेशात असावीत. काश्मीरच्या उत्तरेस एका बिंदूपासून पर्वतांच्या सहा रांगा निघालेल्या आहेत. हिमालय, काराकोरम,कुनलुन,तिएनशान,हिंदु कुश व सुलेमान हे ते पर्वत होत.त्यांच्या मध्य बिंदूस पुराणकार मेरू पर्वत म्हणतात.हे सहा पर्वत ज्या द्वीपात आहेत ते ⇨जंबुद्वीप मानले आहे. जम्मू हे नाव जंबूचा अवशेष असावे. सध्याचा चीनचा उत्तरेकडील जो भाग ते पुष्करद्वीप होय. कुनलुन पर्वताने पुष्करद्वीपाचे दोन भाग केले आहेत. तुर्कस्तान व गीस मिळून प्लक्षद्वीप असावे. गीकांच्या प्राचीन इतिहासात पॅलॅसगी म्हणून जे नाव येते, ते प्लक्षाचे अपभ्रष्ट रूप असावे. प्लक्षद्वीपात आर्यक, कुरव, विविंश व भावित असे चार वर्ण ⇨ विभाग ) होते. महाभारता त ⇨शाकद्वीपा चा उल्लेख असून त्यात मग, मशक, मानस व मंदग हे चार वर्ण असल्याचा उल्लेख आहे. असिरियन संस्कृतीत मंद याचा उल्लेख पुन:पुन्हा येतो. मंद म्हणजे सिथियन होत. सिथियन म्हणजे शकस्थानीय अथवा शक होत. मंदांनी इ. स. पू. ७०० ते ५५० च्या दरम्यान असिरियावर अधिसत्ता गाजविली. असुरांच्या लेखातील मंद हेच इतिहास-पुराणकाळातील शकशूद्र मंदग असावेत. कौंचद्वीपाच्या पूर्वेस उत्तर समुद्राच्या व अल्ताई पर्वताच्या दिशेने शाकद्वीप असल्याचे उल्लेख मिळतात. श्रीकृष्ण-पुत्र सांब याने शाकद्वीपातून सूर्य-प्रतिमा स्थापनार्थ मंग बाह्मण आणविले होते, अशी भविष्य पुराणा त कथा आहे. सांप्रतचा काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांमधील प्रदेश शाल्मलीद्वीप असावे. अर्थात राजवाडे यांनी काढलेली सर्वच अनुमाने काहींना कल्पनेचा विलास वाटतात, तर काही विद्वान त्यांत तर्कसंगती असल्याचे नमूद करतात.

देशपांडे, सु. र.