अवंती : मध्य भारतातील प्राचीन देश. आधुनिक माळवा, निमाड व त्यालगतचा मध्य प्रदेशाचा भाग म्हणजे हा देश होय. ‘आकरावंती’, ‘मालय’ (मालव), ‘अवंतिका’, ‘आकारवेणावंतिका’ अशीही याची नामांतरे आढळतात. हा देश नर्मदा नदीच्या दोन्ही बाजूंस असून त्याच्या उत्तरेस राजपुताना व दक्षिणेस तापी नदी होती. उत्तरेकडील भागाची राजधानी उज्‍जयिनी, तर दक्षिणेकडील भागाची राजधानी माहिष्मती होती. इतिहासाच्या विभिन्न काळी अवंतीच्या सीमांमध्ये अनेक फेरफार झाले उदा., उत्तरेकडील भोपाळ प्रदेशाचा भाग फुटून त्याची राजधानी विदिशा झाली. हैहय कुलोत्पन्न राजे अवंतीमध्ये राज्य करीत. भारतीय युद्धात अवंती देशाची सेना कौरवपक्षात सामील असल्याचा उल्लेख मिळतो. गौतम बुद्धाच्या वेळी येथे उदयन राजा राज्य करीत होता. इ.स.पू. चौथ्या शतकात हा देश मगध साम्राज्याचा भाग झाला. गुप्त सम्राट विक्रमादित्याने शकांची हकालपट्टी करून येथे नवीन साम्राज्य स्थापिले. नवव्या शतकातील परमार, त्यानंतरचे चाहमान व नंतरचे मुसलमान यांच्या कारकिर्दीत अवंतीचे वैभव कमी कमी होत गेले.

जोशी, चंद्रहास शाह, र. रू.