माकाऊ : चीनच्या दक्षिण किनाऱ्यावरील पोर्तुगालचा सागरपार प्रांत. पर्ल (चु चिअँग) नदीमुखखाडीच्या पश्चिम बाजूवर हा प्रदेश असून समोरच पूर्वेकडे ६४ किमी. वर खाडीच्या पूर्व बाजूवर हाँगकाँग ही ब्रिटिश वसाहत आहे. याच खाडीच्या शिरोभागी, माकाऊच्या उत्तरेस १०५ किमी.वर कँटन हे चीनचे बंदर आहे. प्रांताचे क्षेत्रफळ सु. १५·५ चौ. किमी. व लोकसंख्या २,६१,६८० (१९८१). चीनच्या ग्वांगटुंग या प्रांताच्या दक्षिणेकडील छोट्या व अरुंद अशा माकाऊ द्वीपकल्पाचा (क्षेत्रफळ ५·२ चौ. किमी.), तसेच तैपा (३·८ चौ. किमी.) व कुलोनी (६·५ चौ. किमी.) या दोन छोट्या बेटांचा यात समावेश होतो. राजधानी माकाऊ ही माकाऊ द्वीपकल्पावर असून एकूण लोकसंख्येपैकी सु. ९०% लोक येथे राहतात.

माकाऊ द्वीपकल्पाचा प्रदेश जरी उंचसखल असला, तरी प्रदेशाची उंची फारशी नाही. नागरी वस्तीस तो अनुकूल आहे. सर्वांत जास्त उंची (१७४ मीटर) कुलोनी बेटावर आढळते. येथे कायम स्परूपाच्या नद्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा पावसाळ्यात साठा केला जातो व चीनमधूनही पाण्याची आयात केली जाते. द्वीपकल्पावर व दोन्ही बेटांवर ग्रॅनाइटी टेकड्या असून त्या गाळाच्या संचयनापासून निर्माण झालेल्या सपाट भूमीने वेढलेल्या आहेत. मात्र या सपाट प्रदेशांचा विस्तार फारच कमी आहे. समुद्र हटवून जमीन तयार करण्याच्या योजना विस्तृत प्रमाणावर चालू आहेत. माकाऊचे हवामान उष्ण कटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे. वार्षिक सरासरी पर्जन्य १५२ सेंमी. असून जास्तीतजास्त पाऊस मोसमी वाऱ्यांच्या काळात पडतो. सरपणासाठी व इमारतींच्या बांधकामासाठी बरीच जंगलतोड करण्यात आल्याने सध्या केवळ गवत व खुरट्या वनस्पती यांचेच आच्छादन आढळते. कुलोनी बेटावर वनीकरण केले जात आहे. कस्तुरी मांजर सोडले, तर माकाऊमध्ये प्राणिजीवनही फारसे नाही.

पोर्तुगीजांचे पहिले जहाज १५१३ मध्ये पर्ल नदीमुखखाडीत आले व तेव्हापासून पोर्तुगीजांचा माकाऊकडे ओघ सुरू झाला. पोर्तुगीजांचा चीनशी अधिकृत व्यापार १५५३ मध्ये सुरू झाला व १५५७ मध्ये ही पोर्तुगीजांची वसाहत बनली. पोर्तुगीजांनी माकाऊचा वापर १५३५ पासून केल्याचे चिनी नोंदींवरून दिसते. या वसाहतीच्या वापरासाठी पोर्तुगाल चीनकडे १८४९ पर्यंत काही खंडणीही भरत असे. १८८७ मध्ये झालेल्या करारानुसार चीनने माकाऊवरील पोर्तुगालचे प्रभुत्व मान्य केले. या करारानुसार चीनच्या संमतीशिवाय पोर्तुगालला माकाऊ कोणत्याही एखाद्या तिसऱ्या देशाच्या स्वाधीन करता येणार नाही.

चीन व जपान यांच्याशी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे माकाऊ हे प्रवेशद्वार होते. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चीनच्या विदेश व्यापाराचे कँटन हे मुख्य केंद्र बनले. परदेशी व्यापाऱ्यांसाठी तेथे व्यापारी ठाणीही उघडण्यात आली. परंतु नोव्हेंबर ते मे या व्यापार काळातच व्यापाऱ्यांना कँटनमध्ये येण्याची अनुमती असे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारसमूहाची स्थापना माकाऊत करण्यात आली. अठराव्या शतकाचा उत्तरार्ध व एकोणिसाव्या शतकाचा काही काळ, हा माकाऊच्या भरभराटीचा काळ होता. पुढे चिनी अधिकारीवर्ग व यूरोपियन व्यापारी यांच्यात अफूच्या व्यापारावरून वाद निर्माण झाला. परिणामतः ग्रेट ब्रिटन व चीन यांच्यात युद्ध होऊन १८४१ मध्ये आपली वसाहत म्हणून ब्रिटिशांनी हाँगकाँगवर ताबा मिळविला. १८४९ मध्ये पोर्तुगीजांनी माकाऊतील चिनी सीमा शुल्क कार्यालये नष्ट केली व माकाऊची खुले बंदर म्हणून घोषणा केली. परंतु अल्पावधीतच हाँगकाँगने व्यापारात माकाऊला मागे टाकले. त्यामुळे या पोर्तुगीज वसाहतीचा व्यापाऱ्यांनी त्याग केला. एकोणिसाव्या शतकात कँटन व हाँगकाँग यांचा झालेला विकास व माकाऊ बंदरातील गाळाचे संचयन यांमुळे व्यापारदृष्ट्या व उतारपेठ म्हणून माकाऊ बंदराचे महत्व बरेच कमी झाले. पहिल्या महायुद्धानंतर मात्र बंदरात खूप सुधारणा करण्यात आल्या. १९२० मध्ये माकाऊ बंदराच्या विकासासाठी एक कोटी डॉलरचा खर्च करण्यात आला. १९२६ मध्ये बाह्य बंदर बांधण्यात आले. १९५१ मध्ये माकाऊ हा पोर्तुगीजांचा सागरपार प्रांत बनला. १९७६ मध्ये माकाऊची नवी घटना अंमलात आली. तेव्हापासून माकाऊचे एका ‘विशेष प्रांता’त रूपांतर करून माकाऊला प्रशासकीय, वैधानिक, वित्तीय आणि आर्थिक स्वायत्तता देण्यात आली. तथापि १९७९ मध्ये माकाऊ पुन्हा पोर्तुगीज प्रशासनाखाली राहील, अशी घोषणा करण्यात आली. चीन या शेजारील देशाशी माकाऊने सलोख्याचे संबंध ठेवलेले आढळतात. पोर्तुगालकडून नेमलेला गव्हर्नर विधानसभेच्या १७ सभासदांच्या सल्ल्याने माकाऊचा राज्यकारभार पाहतो. या १७ सभासदांपैकी ६ निर्वाचित, ५ गव्हर्नरने नियुक्त केलेले व ६ व्यापारी संस्थांनी निवडलेले असतात. ही संख्या २१ पर्यंत वाढविण्याची मागणी आहे. विधानसभेची मुदत तीन वर्षांची असते. मंत्रिमंडळ पाच सचिवांचे असून त्यांची नियुक्ती पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष गव्हर्नरच्या सल्ल्याने करतात. येथे राजकीय पक्ष नाहीत. मात्र नागरिक संघ आहेत.

मासेमारी, व्यापार, कारखानदारी व पर्यटन हे व्यवसाय येथे चालतात. शेतीव्यवसाय विशेष महत्वाचा नाही. तांदूळ व भाजीपाला यांचे थोडेबहुत उत्पादन घेतले जाते. बहुतेक धान्य आयातच केले जाते. मासेमारी प्रामुख्याने पर्ल नदीमुखखाडीत चालते. तथापि चीनच्या सरहद्दीबाबतच्या निर्बंधामुळे मासेमारीवर बऱ्याच मर्यादा पडतात. द्वीपकल्पाचा पश्चिम भाग व चीनची मुख्यभूमी यांदरम्यानच्या ड्यूक चॅनेलच्या मुखाशी असलेल्या अरुंद व लांबट अशा सुरक्षित जलाशयाचा अंतर्गत बंदरासारखा वापर केला जातो. त्याला पूर्वापार महत्त्व आहे. नव्याने विकसित करण्यात आलेले बाह्य बंदर पूर्व किनाऱ्यावर आहे. व्यापारी दृष्ट्या मोक्याचे स्थान व खुले बंदर यांमुळे माकाऊला महत्त्व आहे. तथापि चीनच्या निर्बंधामुळे माकाऊच्या व्यापारविकासावर मर्यादा पडलेल्या आहेत. माकाऊला धान्य व उपभोग्य वस्तूंचा स्वस्तात पुरवठा करणारा चीन हा प्रमुख देश आहे. तसेच कापड, खेळणी, विद्युत्‌साहित्य यांचीही आयात केली जाते. माकाऊतून प्रामुख्याने मासे, कापड, मीठ यांची परदेशी निर्यात केली जाते, तर लाकूड, अन्नधान्ये यांची आयात केली जाते. १९८२ मध्ये एकूण निर्यात ४४७·९० कोटी पतॉकांची (माकाऊचे चलन) झाली. माकाऊत सोन्याचा चोरटा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. आयात केलेल्या सोन्याच्या विटांचे वाहतुकीस सुलभ होईल अशा आकारात रूपांतर करून त्यांची निर्यात केली जाते. निर्यातीचा ओघ आशियाई देशांकडे असल्याचे आढळते. १९५० पासून येथील औद्योगिक विकासास सुरुवात झाली. वसाहतीतून उपलब्ध झालेल्या स्वस्त मजूर पुरवठ्यामुळेच येथील औद्योगिक विकासास चालना मिळाली. कापड उद्योग महत्त्वाचा असून त्याशिवाय पादत्राणे, खेळणी, विद्युत्‌सामग्री, प्लॅस्टिक, मीनाकारी वस्तू, फटाके व शोभेची दारू, चिनी मद्य, कापूर, धूपकांड्या इ. उद्योगही विकास पावत आहेत. तथापि प्रभावी करयोजनेचा अभाव आणि पाण्याचा तुटवडा यांमुळेही येथील औद्योगिक विकासावर मर्यादा पडलेल्या आहेत.


पर्यटन व्यवसायाची वेगाने वाढ होत आहे. जुगार, कुत्र्यांच्या शर्यती व नोव्हेंबरातील ‘माकाऊ ग्रां प्री’ हा वार्षिकोत्सव, ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. १९८२ मध्ये ५० लक्ष पर्यटकांनी माकाऊला भेट दिली. चीन व हाँगकाँग यांनी जुगारावर निर्बंध घातल्याने माकाऊतील सार्वजनिक संगीत नृत्यगृहांकडे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. ही गृहे चोवीस तास उघडी असून त्यांत सर्व प्रकारच्या खेळांच्या सुविधा उपलब्ध आहेत. जुगारविषयक सर्व काम सरकारमान्य व्यवसाय संघाकडून पाहिले जाते. त्यासाठी वर्षाला १० लक्ष डॉलर कर भरला जातो आणि बाह्य बंदराची व हाँगकाँगशी होणाऱ्या वाहतुकीची सर्व व्यवस्था पाहिली जाते. १९७७ मध्ये शासनाच्या एकूण उत्पन्नापैकी एक–तृतीयांश उत्पन्न जुगारकरापासून मिळाले.

पतॉक हे माकाऊचे स्वतंत्र चलन असून ते काढणाऱ्या बँकेची १९८० मध्ये स्थापना झाली. ५, १० व ५० ऑव्हूंची आणि १, ५ व २० पतॉकांची नाणी असतात, तर ५, १०, ५०, १०० व ५०० पतॉकांच्या नोटा असतात. १ पतॉक = १०० ऑव्हू होतात. १०० पतॉक = ८·५२ स्टर्लिंग पौंड = १२·३६ डॉलर किंवा १ स्टर्लिंग पौंड = ११·७४ पतॉक व १ अमेरिकी डॉलर = ८·५९ पतॉक, असा विनिमय दर होता (३१ डिसेंबर १९८३). १०४ पतॉक = १०० हाँगकाँग डॉलर होतात. येथे ११ व्यापारी बँका, ७ विदेशी बँका आणि ३ विमा कंपन्या आहेत.

माकाऊमध्ये विमानतळ नसून ते आंतरराष्ट्रीय प्रवासी जलवाहतूकीच्या मार्गावरही नाही. हाँगकाँगशी मात्र जलपर्णी बोटींच्या साहाय्याने वाहतूक केली जात असून ते अंतर केवळ अर्ध्या तासाचे आहे. यांदरम्यान परंपरागत नौका वाहतूकही चालते. माकाऊ द्वीपकल्प आणि तैपा व कुलोनी या दोन बेटांदरम्यान नौका वाहतूक चालते. ही दोन बेटे एकमेकांना दोन किमी. लांबीच्या सेतुमार्गाने, तर द्वीपकल्प व तैपा एकमेकांना दोन किमी. लांबीच्या पुलाने जोडली आहेत. माकाऊमधील अंतर्गत वाहतूक-व्यवस्था चांगली आहे. १९८१ मध्ये सु. ९० किमी. लांबीचे रस्ते होते. नव्याने २४० किमी. लांबीचे रस्ते बांधण्याची, विमानतळ उभारण्याची, बंदराचा अधिक विकास करण्याची व दळणवळणाच्या सोयींमध्ये सुधारणा करण्याची योजना आहे. १९८४ पासून हाँगकाँगशी हेलिकॉप्टरसेवा सुरू झाली आहे. १९८२ मध्ये येथे ७,८०० रेडिओ संच व ५०,००० दूरचित्रवाणी संच होते. येथून दूरचित्रवाणीचे कार्यक्रम प्रक्षेपित केले जात नसून ते हाँगकाँगकडून घेतले जातात. येथे एक भू-उपग्रह स्थानक उभारलेले असून ते हाँगकाँगशी सूक्ष्म लहरींनी जोडलेले आहे.

चीनमधून वारंवार आलेल्या निर्वासितांच्या लोंढ्यांमुळेच येथे चिनी संख्येने अधिक आहेत. सुमारे ९०% पोर्तुगीज जन्मानेच माकाऊतील आहेत, तर निम्म्यापेक्षा अधिक चिनी माकाऊबाहेरचे आहेत. नागरी सेवा, पोलीस व सशस्त्र दलांत बहुसंख्य पोर्तुगीज आहेत. मात्र या पोर्तुगीज प्रांतात चिनी संस्कृतीचाच प्रभाव अधिक दिसून येतो. माकाऊतील सुंदर बागा, चिनी राष्ट्रवादी सन-यत्-सेन यांचा पुतळा, माजाँग या चिनी खेळाबद्दल असलेले वेड यांमधून चिनी संस्कृतीचा प्रभाव जाणवतो, तर नृत्य-गायनादी कलांवर पोर्तुगीजांचा प्रभाव आढळतो. पोर्तुगीज ही राजभाषा असून इंग्रजी व कँटनी या भाषाही मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात. पोर्तुगीज कवी लुईज द कामाँइश (१५२४–८०) याचे १५५८–५९ या काळात माकाऊत वास्तव्य होते. त्याने लुझीअड्स या महाकाव्याचा काही भाग येथे लिहिला. पोर्तुगीज व चिनी भाषांतील वृत्तपत्रे येथून प्रसिद्ध होतात. इंग्रजी वृत्तपत्रे दररोज हाँगकाँगवरून येतात. दहा वर्षांवरील सु. ८०% लोक साक्षर आहेत. १९८१–८२ मध्ये एकूण ५६ बालोद्याने, ६३ प्राथमिक ३१ माध्यमिक व १० इतर शैक्षणिक संस्था होत्या. माकाऊ येथे एक विद्यापीठ आहे. येथे आरोग्य सोयी चांगल्या आहेत. गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारीचा प्रश्न मात्र भेडसावतो. माकाऊ राष्ट्रीय ग्रंथालय, सर रॉबर्ट हो तुंगचे चिनी ग्रंथालय, लुईज द कामाँइश संग्रहालय, इ. येथील उल्लेखनीय संस्था आहेत.

चौधरी, वसंत