पृष्ठप्रदेश: हिंटरलँड. एखाद्या बंदरात उतरलेला माल ज्या प्रदेशात पोहोचविला जातो आणि निर्यातीसाठी त्या बंदराला ज्या प्रदेशातून माल पुरविला जातो, त्या प्रदेशाला त्या बंदराचा पृष्ठप्रदेश म्हणतात. बंदरातील सोयी-सवलती, तेथपासूनचे अंतर, वाहतुकीचे मार्ग व साधने, आयात-निर्यात, मालाची गरज आणि पुरवठा इत्यादींवर पृष्ठप्रदेशाचा विस्तार अवलंबून असतो. उदा., वसईच्या आणि कल्याणच्या खाड्यांवरून, बोर घाटातून व थळ घाटातून रेल्वे झाल्याबरोबर मुंबई बंदराचा पृष्ठप्रदेश महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व कर्नाटक येथपर्यंत आणि उत्तर भारतातही वेगाने विस्तारला. मुंबई व कलकत्ता या बंदरांचे पृष्ठप्रदेश दिल्लीपर्यंत पोहोचले असून ते एकमेकांत मिसळले आहेत. हिंटरलँड (पिछाडीचा प्रदेश) ही संज्ञा मूळ जर्मन असून ती १८८३-८५ च्या सुमारास आफ्रिकेतील जर्मन सत्तेखालील सागरकिनारी प्रदेशाच्या वादातून विशेषत्वाने पुढे आली. ग्रेट ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल यांसारख्या साम्राज्यवादी देशांनी, विशेषतः आफ्रिकेतील त्यांच्या वसाहतींच्या संदर्भात, पृष्ठप्रदेशाच्या तत्त्वाचा राजकीय अर्थाने पुरस्कार केला. अखंडता व सलगता या कसोट्या वापरून ताब्यातील प्रदेशाच्या लगतचा वा पिछाडीचा भूभाग हा ज्याच्या त्याच्या मालकीचा, अशी अमेरिकन भूमिका होती. आफ्रिका खंड हे यूरोप खंडाचा पृष्ठप्रदेश आहे असेही म्हटले जाई, तथापि पृष्ठप्रदेशाचे तत्त्व किंवा लगतच्या प्रदेशाचे अमेरिकन तत्त्व यांचा फारसा उपयोग झाला नाही कारण अशा प्रदेशावर परिणामकारक नियंत्रण ठेवणे प्रत्यक्षात कठीण होते. पृष्ठप्रदेश या संज्ञेचा अर्थ गेल्या शतकाच्या अखेरीपासून विकसित होत गेल्याचे दिसून येते. पार्श्वभूमी, बंदरांच्या लगतचा भाग व एखाद्या शहराच्या व्यवहारांवर प्रभाव पाडू शकणारा परिसर अशा विविध अर्थांनी आता ही संज्ञा वापरली जाते. एखाद्या शहराभोवती जो प्रदेश सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय इ. दृष्टींनी त्या शहराशी संबंधित असतो व त्या प्रदेशातील व्यवहार त्यावर बहुतांशी अवलंबून असतात, त्या प्रदेशाला अलीकडे त्या शहराचा पृष्ठप्रदेश (‘उमलँड’) असे म्हणतात. उमलँड ही संज्ञाही मूळ जर्मन आहे. ‘नागरी पृष्ठप्रदेश’ या अर्थाने या संज्ञेचा वापर १९४१ साली ई. व्हॅन क्लिफ याने केला तथापि तत्पूर्वीही जर्मन भूगोलवेत्त्यांनी ‘आसपासचा प्रदेश’ या अर्थाने तिचा वापर केल्याचे दिसून येते.

कुमठेकर, ज. ब.