टँपा : अमेरिकेच्या फ्लॉरिडा राज्यातील हिल्सबरो परगण्याचे ठाणे. लोकसंख्या २,७७,७६७ (१९७०). हिल्सबरो नदीमुखावरील हे सागरी बंदर टॅंपा उपसागरावरील सेंट पीटर्झबर्गशी २४ किमी. च्या गँडी ब्रिजने जोडलेले आहे. टँपा एक मोठे वितरण केंद्र असून तेथे फळे डबाबंदी, सिगार पत्र्याचे व कागदी डबे, सिमेंट, खते, पेये, दुग्धपदार्थ, रसायने, औषधी इ. विविध व्यवसाय चालतात. येथून मुख्यतः फॉस्फेट व लिंबू जातीची फळे निर्यात होतात. येथे साउथ फ्लॉरिडा व टँपा विद्यापीठ, हिल्सबरो ज्यूनियर व टँपा महाविद्यालये आणि इतर संस्था आहेत. जवळच मॅकडिल हवाई तळ आहे. टँपा आता एक आकर्षक पर्यटन केंद्र बनले आहे.

लिमये, दि. ह.