लक्षद्वीप : (लखदीव). भारताचा केंद्रशासित प्रदेश व अरबी समुद्रातील एक द्वीपसमूह. ८ ते १२ १३’ उ.अक्षांश आणि ७१ ते ७४ पू. रेखांश यांदरम्यान याचा विस्तार आहे. या द्वीपसमूहात २० प्रवाळ बेटांचा समावेश असून त्यांत १२ कंकणद्वीपे, ३ प्रवाळशैलभित्ती व ५ निमज्जित किनारपट्ट्या आहेत. सर्व बेटांचे एकूण क्षेत्रफळ ३२ चौ.किमी असून ॲन्ड्रोथ (क्षेत्रफळ ४.८ चौ.किमी.-लोकसंख्या ६,८१२-१९८१), अमिनी (२.६-५,३६७), अगत्ती (२.७-४,१११), बित्रा (०.१-१८१), चेटलट (१.०-१,४८४), काडमट (३.१-३,११४), काल्पेनी (२.३-३,५४३), काव्हारट्टी (३.६-६,६०४), किल्टन (१.६-२,३७५) व मिनिकॉय (४.४-६, ६५८) या प्रमुख दहा बेटांवरची एकूण लोकसंख्या ४०,२४९ होती (१९८१). सर्वात कमी लोकसंख्या बित्रा या बेटावर असून कोणत्याही बेटाची रुंदी २ किमी.पेक्षा अधिक नाही. केरळ राज्यातील कोचीन शहरापासून लक्षद्वीप बेटे सु. २२० ते ४४० किमी. अंतरावर आहेत. काव्हारट्टी हे या प्रदेशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : देशातील या सर्वात लहान केंद्रशासित प्रदेशाचा भूभाग कमी असला, तरी याला ४,२०० चौ. किमी.चे खाजणक्षेत्र, २०,००० चौ.किमी.चे जलक्षेत्र व ७ लाख चौ.किमी.चे आर्थिक क्षेत्र लाभलेले आहे. कोणत्याही बेटाची सस.पासूनची उंची १० मी.पेक्षा अधिक नाही. पृथ्वीचे तापमान सतत वाढत आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून पुढील सु. पन्नास ते शंभर वर्षांच्या कालावधीत लक्षद्वीप बेटे पाण्याखाली बुडतील, असा अंदाज राष्ट्रीय महासागरविज्ञान संस्थेने व्यक्त केला आहे. या बेटांवर कोणतीही पर्वतश्रेणी नाही किंवा कोणतीही नदी वाहत नाही.

हवामान : लक्षद्वीप बेटांवरील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६० सेंमी. असून दोन्हीही मॉन्सूनचा पाऊस येथे पडतो. मार्च, एप्रिल व मे महिन्यांत कडक उन्हाळा जाणवतो. नारळ, केळी, अळू, शेवगा, विलायती फणस, फणस व रानटी बदाम ह्या वनस्पती या प्रदेशात आढळतात. पुळणींच्या जवळ थैस्सिआ हेंप्रिचीन व साइमॉड्सीए आयसोएटीफोलिया असे दोन भिन्न प्रकारांचे सागरगवत आढळते. सागरामुळे होणारे क्षरण व पुळणींवर होणारे गाळाचे संचयन यांवर या गवतामुळे मर्यादा घातल्या गेल्या आहेत. लक्षद्वीपमध्ये सागरी प्राणिजीवन समृद्ध आहे. भूभागावर गुरेढोरे व पाळीव खाद्यपक्षी आढळतात. सामान्यपणे आढळणारे थराथसी (स्टर्ना फुस्काटा) व कारिफेटू (ॲनवस स्टॉलिड्स) हे समुद्रपक्षी आहेत. पक्षी अभयारण्य म्हणूनच हे बेट घोषित करण्यात आलेले आहे.

इतिहास : स्थानिक दंतकथांनुसार केरळचा अखेरचा राजा चेरमान पेरुमाल याच्या कारकीर्दीत या बेटांवरील पहिली वसाहत झाली असावी. काही अरब व्यापाऱ्यांच्या हुकुमावरून जेव्हा राजाला इस्लामधर्म स्वीकारावयास लावण्यात आला, तेव्हा राजधानी क्रंगनोर (सांप्रतचे कोडुंगलूर) मधून त्याने मक्केला जाण्याच्या निमित्ताने पलायन केले. त्याच्या शोधार्थ किनाऱ्यावरील अनेक ठिकाणांवरून मक्केकडे जाणाऱ्या खलाशी बोटी सोडण्यात आल्या. त्यांपैकी कननोरच्या राजाची बोट तीव्र वादळात सापडून फुटली. तेव्हा अरबी समुद्रातच काही दिवस काढल्यानंतर शेवटी राजा व त्याच्याबरोबरील लोक एका बेटावर आले, ते बेट म्हणजेच ‘बंगारम बेट’ असल्याचे मानतात. त्यानंतर ते जवळच्या अगत्ती बेटावर आले. शेवटी वातावरण निवळल्यानंतर वाटेतील वेगवेगळ्या बेटांवर थांबत थांबत ते मुख्य भूमीवर आले. हा राजा परतल्यावर खलाशी आणि सैनिकांची दुसरी तुकडी अरबी समुद्रात पाठविण्यात आली. तेव्हा त्यांनी अमिनी बेटाचा शोध लावून तेथे ते राहू लागले. या पथकामध्ये पाठविलेले लोक हिंदू होते. आज जरी या बेटांवर इस्लामचे प्रभुत्व स्पष्टपणे दिसत असले, तरी अजूनही हिंदूंच्या काही सामाजिक परंपरा या लोकांमध्ये पहावयास मिळतात. अमिनी, काव्हारट्टी, ॲन्ड्रोथ व काल्पेनी या बेटांवर प्रथम लहान लहान वसाहती स्थापन झाल्या व त्यानंतर या बेटांवरील लोकांनी अगत्ती, किल्टन, चेटलट व काडमट या बेटांवर स्थलांतर केले.

ओबेदुल्ला या अरबी फकिराने येथे इस्लामवर प्रवचने केल्याचे सांगितले जाते. ॲन्ड्रोथ बेटावर ओबेदुल्लाची कबर असून आज ते एक पवित्र स्थळ मानले जाते. श्रीलंका, मलेशिया आणि ब्रह्मदेशातहीॲन्ड्रोथच्या धर्मोपदेशकांचा आदर केला जातो.

पोर्तुगीजांचे भारतात सोळाव्या शतकात आगमन झाल्यावर समुद्रपर्यटकांच्या दृष्टीने लखदीवला विशेष महत्त्व आले. जहाजांसाठी काथ्याच्या दोरखंडांना खूप मागणी होती, त्यासाठी बेटांवरील जहाजांची लूट करण्यास पोर्तुगीजांनी सुरुवात केली. नारळाचा काथ्या मिळविण्यासाठी पोर्तुगीज लोक काही वेळा जबरदस्तीने अमिनी बेटावर उतरत, परंतु बेटावरील लोकांनी या अतिक्रमण करणाऱ्या  लोकांना विष घालून मारले. अशा रीतीने पोर्तुगीजांच्या अतिक्रमणाचा शेवट करण्यात आला.

सर्व बेटांवरील लोकांचे इस्लामीकरण केल्यानंतरही पुढे काही वर्षे चिरक्कलच्या (छिराकल) हिंदू राजाचेच अधिराज्य या बेटांवर होते. सोळाव्या शतकाच्या मध्यात चिरक्कलच्या राजाकडून कननोरच्या अरक्कल (अली राजा) या मुस्लिम घराण्यातील राजाच्या हातात बेटांची सत्ता आली. अरक्कलची कारकीर्द खूपच जुलमी व असह्य होती. तिला कंटाळून १७८३ मध्ये अमिनी बेटावरील काही लोक मोठ्या धैर्याने मंगलोरला टिपू सुलतानकडे गेले व अमिनी गटातील बेटांची सत्ता स्वतःकडे घेण्याची विनंती त्यांनी टिपू सुलतानला केली. टिपू सुलतानने अरक्कलच्या पत्नीशी मैत्रीपूर्ण बोलणी केली, तेव्हा विचारविनिमय होऊन अमिनी गटातील बेटांची सत्ता टिपू सुलतानकडे देण्यात आली. अशा प्रकारे बेटांची विभागणी दोन अधिराज्यांत झाली. पाच बेटे टिपू सुलतानाच्या अधिसत्तेखाली आली व उरलेली तशीच अरक्कलच्या अधिसत्तेखाली राहिली.

श्रीरंगपट्टणच्या युद्धात टिपू सुलतान मारला गेल्यानंतर बेटांचा ताबा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे आला. त्यावेळी बेटाचा राज्यकारभार मंगलोरहून चाले. १८४७ मध्ये एका तीव्र चक्रीवादळाचा तडाखा ॲन्ड्रोथ बेटाला बसला. तेव्हा चिरक्कलच्या राजाने बेटावरील लोकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व त्यांना मदत देण्यासाठी ॲन्ड्रोथला जाण्याचे ठरविले. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी सर विल्यम रॉबिन्सन यानेही राजाबरोबर ॲन्ड्रोथला जाण्याचे ठरविले. ॲन्ड्रोथला गेल्यावर तेथील लोकांच्या सर्वच मागण्या पुरविणे राजाला अशक्य वाटले, तेव्हा विल्यमने कर्जाच्या स्वरूपात काही मदत राजाला देऊ केली. ही मदत पुढे चार वर्षेपर्यंत चालू ठेवली. कर्जाची रक्कम खूपच वाढली. इंग्रजांनी राजाकडे कर्ज परतफेडीची मागणी केली परंतु परतफेड करणे राजाला अशक्य होते. तेव्हा १८५४ मध्ये उरलेल्या सर्व बेटांचे प्रशासन ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यात आले. अशा प्रकारे सर्व बेटांवर ब्रिटिशांचे अधिराज्य आले. दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात ही बेटे घेतली म्हणून त्यांचे नाव ‘लक्षद्वीप’ पडले असे म्हटले जाते.


हा द्वीपसमूह १ नोव्हेंबर १९५६ रोजी भारताचा केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आला. त्यावेळी कालिकत (केरळ राज्य) हे राजधानीचे ठिकाण होते. १९६४ मध्ये कालिकतहून काव्हारट्टीला राजधानी हलविण्यात आली. १९७३ मध्ये हा द्वीपसमूहाचे ‘लक्षद्वीप’ असे नामकरण करण्यात आले. केंद्रशासित प्रदेश होण्यापूर्वी ही बेटे पूर्वीच्या मद्रास राज्याचा एक भाग होती. सर्व बेटांचा मिळून एक जिल्हा असून त्याची चार तालुक्यांत विभागणी करण्यात आली आहे. मिनिकॉय वगळता अन्य तालुक्यांचा कारभार नियुक्त तहसिलदारांमार्फत पाहिला जातो. ॲन्ड्रोथ, काव्हारट्टी व अमिनी ही तहसिलीची मुख्य ठाणी आहेत. मिनिकॉयच्या तहसिलदाराची जागा रद्द करण्यात आली असून त्याऐवजी तेथे ऑगस्ट १९७८ पासून उपजिल्हाधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. लखदीव गट व मिनिकॉयमधील सर्वात खालच्या कार्यालयाला ‘अमिन’, तर आमिनदिवी गटातील कार्यालयाला ‘कारानी’या नावांनी ओळखले जात होते. सध्या सर्वच बेटांवर या कार्यालयास सामान्यपणे अमिन असेच संबोधले जाते.

केरळ उच्च न्यायालयाची अधिकारिता लक्षद्वीपपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या प्रशासकामार्फत या प्रदेशाचा कारभार पाहिला जातो. विकास कार्यक्रम, कायदा व सुव्यवस्थाविषयक संपूर्ण कार्यभार जिल्हाधिकारी आणि विकास आयुक्त यांच्याकडे असतो.

आर्थिक स्थिती : शेती हा लक्षद्वीपच्या अर्थव्यवस्थेचा मूलाधार आहे. नारळ हे आर्थिक दृष्ट्या सर्वांत महत्त्वाचे पीक असून बेटांवरील सर्व कृषियोग्य क्षेत्र (२,७८० हे.) नारळाच्या पिकाखाली होते (१९८६-८७). वर्षाला दर हेक्टरी सरासरी ८,०७८ नारळ किंवा प्रत्येक झाडाचे सरासरी ५८ नारळ उत्पादन असून जगातील नारळ उत्पादक राष्ट्रांतील सरासरी उत्पादनापेक्षा हे जास्त आहे. लखदीव लहान, लखदी व सामान्य, ग्रीन ड्वॉर्फ. इ. नारळाचे प्रकार येथे आढळतात. लिंबू जातीची फळे, केळी, पपया, पेरू, चिकू, शेवगा, मिरची, टोमॅटो, वांगी, रताळी इत्यादींची लागवड आडपीक म्हणून नारळीच्या बागांमधून केलेली आढळते. शासनाच्या येथील कृषी प्रात्यक्षिक शेतांमधून पिकविलेला भाजीपाला लोकांना पुरविला जातो. बहुपीक प्रात्यक्षिक शेतीखालील क्षेत्र २६० हेक्टरपर्यंत वाढविलेले असून त्या शेतीत ६४० मजूर गुंतलेले आहेत. खोबरे, काथ्या, गूळ, मद्य व मासे ही लक्षद्वीपमधील प्रमुख उत्पादने आहेत. काथ्याच्या व्यापारात प्रशासनाची मक्तेदारी असून जनकल्याणाच्या दृष्टीने ना नफा ना तोटा या तत्त्वावर काथ्या घेऊन त्याच्या बदल्यात लोकांना तांदूळ पुरविला जातो. खोबऱ्याचे वार्षिक सरासरी उत्पादन २,५०० टन असून त्यातील २,००० टन खोबरे कालिकत व मंगलोर यांच्या बाजारपेठांत पाठविले जाते. शेतीबरोबरच मच्छीमारी हा येथील लोकांचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. चोहोबाजूंना असलेल्या विस्तृत समुद्रामुळे लक्षद्वीपमध्ये मासेमारी व्यवसायाच्या विकासास बराच वाव आहे. समुद्रात ट्यूना जातीचे मासे मोठ्या प्रमाणावर सापडतात. दरडोई माशांची उपलब्धता देशात सर्वांत जास्त येथे आहे. होड्या बांधणी करणाऱ्या  दोन गोद्या असून तेथे यांत्रिक होड्या तयार केल्या जातात. लक्षद्वीपच्या सागरात ३३१ पेक्षा अधिक यांत्रिक होड्या कार्यरत असून त्यांपैकी ३१३ होड्या सवलतीच्या किंमतींत व भाडेखरेदी पद्धतीने कोळ्यांना वाटण्यात आल्या आहेत. १९८७-८८ मध्ये सु. ७,२९९ टन मासे पकडण्यात आले. मिनिकॉय येथे मासेमारी प्रशिक्षण केंद्र (स्था. १९७२) असून बर्फनिर्मिती, शीतगृह, मासे डबाबंदीकरण इ. उद्योग चालतात, तसेच तेथे ट्यूना माशांवर प्रक्रिया केली जाते. काथ्यानिर्मिती हासुद्धा येथील महत्त्वाचा उद्योग आहे. लक्षद्वीपमध्ये काथ्यानिर्मिती व प्रात्यक्षिकांची सहा केंद्रे असून ती काडमट, किल्टन, चेटलट, अमिनी, अगत्ती व ॲन्ड्रोथ येथे आहेत. या केंद्रांमधून १९८७-८८ मध्ये काथ्यापासून २०.२ टन चांगल्या प्रतीचा पातळ धागा तयार करण्यात आला. काथ्यापासून दोर व चटया तयार केल्या जातात. सुक्या नारळाच्या कवटीपासून तपकिरी तंतू निर्मितीची ॲन्ड्रोथ, काडमट, अमिनी व काव्हारट्टी ही केंद्रे असून १९८७-८८ मध्ये तेथून ९० टन तंतू उत्पादन झाले. तेल काढणे व चटया विणण्याचे व्यवसायही चालतात. काल्पेनी येथील विणमाल निर्मिती केंद्रामधून ३८,८१० पोशाख तयार करण्यात आले (१९८७-८८). काव्हारट्टी व काल्पेनी येथे प्रत्येकी एक हस्तव्यवसाय प्रशिक्षण केंद्र आहे. काव्हारट्टी येथे एक फर्निचर तयार करण्याची औद्योगिक सहकारी संस्था व एक हस्तव्यवसाय औद्योगिक सहकारी संस्था आहे. अमिनी व काल्पेनी येथे दोन काथ्या सहकारी संस्था असून स्थानिक प्रशिक्षित महिला तिच्या सभासद आहेत. यांशिवाय इतरही अनेक प्रकारच्या सहकारी संस्था येथे कार्य करतात. काव्हारट्टी व मिनिकॉय येथे दुग्धशाळा, तर ॲन्ड्रोथ, काडमट, काल्पेनी, मिनिकॉय, काव्हारट्टी, अगत्ती व किल्टन येथे कुक्कुट पैदास क्षेत्रे आहेत.

लक्षद्वीप बेटे ही भारताच्या मुख्य भूमीशी जलवाहतुकीने जोडली आहेत. ‘एम्. व्ही अमिनदीबी’ (१९७०),‘एम्.व्ही भारत सीमा’, ‘एम्.व्ही दीपसेतू’ या जहाजांद्वारे येथे वाहतूक केली जाते. जहाजे मुख्यतः कोचीन व बेपोर बंदरांतून सुटत असून कोचीन-लक्षद्वीप हे अंतर जहाजाने कापण्यास सु. १२ ते २० तास लागतात. बेटांतर्गत वाहतूक सेवा ‘एम्.एल बित्रा’ ही मोटर नौका पुरविते. मॉन्सून काळात समुद्र खवळलेला असल्याने जहाजवाहतुकीत अडथळे येतात. लक्षद्वीपमध्ये १० डाक कार्यालये, ९ बिनतारी संदेशवहन स्थानके व ५ दूरध्वनी कार्यालये आहेत. १९७२ पासून काव्हारट्टी व भारतीय मुख्य भूमी यांदरम्यान रेडिओ-दूरध्वनी सुविधा उपलब्ध झाली असून चेटलट व बित्रा या बेटांदरम्यानही ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. काव्हारट्टी येथे उपग्रह दळणवळण केंद्र स्थापन झाले असून (१९८०) दुसरे केंद्र मिनिकॉय बेटावर उभारण्यात येत आहे. मिनिकॉय येथेच हवामानविषयक वेधशाळा व १८८५ मध्ये उभारण्यात आलेले दीपगृह आहे.


लोक व समाजजीवन : लक्षद्वीप बेटांवरील बहुसंख्य लोक सुन्नी पंथीय मुस्लिमधर्मीय आहेत. मिनिकॉय बेट वगळता मलयाळम् ही येथील लोकांची प्रमुख भाषा आहे. मिनिकॉयमधील लोक उर्दू आणि सिहंली यांचे मिश्रण असलेली ‘महाल’ ही भाषा बोलतात. या भाषेची लिपीही स्वतंत्र आहे. १९८१ च्या जणगणनेनुसार लक्षद्वीपच्या एकूण लोकसंख्येत (४०,२४९) २०,३७७ पुरुष व १९,८७२ स्त्रिया होत्या. दर हजार पुरुषांमागे ९७६ स्त्रिया असे स्त्री-पुरुष प्रमाण आहे. १९७१-८१ या दशकातील लोकसंख्यावाढीचे प्रमाण २६.४९ टक्के आहे. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स  १,२५७ असून साक्षरतेचे प्रमाण ५४.७२% होते (१९८१). लखदीव व अमिनी गटांतील लोक मलबारच्या किनाऱ्यावरील मुस्लिम लोकांप्रमाणे पोशाख व दागदागिने घालतात, तर मिनिकॉयमधील लोक मालदीवमधील लोकांप्रमाणे पेहराव करतात. येथील मूळच्या लोकांची घरे म्हणजे नारळाच्या झावळ्यांनी झाकलेल झोपड्या होत. अलीकडे विटांची घरे बांधण्यात येऊ लागली आहेत.

बेटांवर जुने रीतिरिवाज पाळले जातात. त्यामुळे पडदापद्धती, बालविवाह, अनेक-विवाह पद्धती, अंधश्रद्धा इ. आढळतात. अद्याप जातिव्यवस्था मानली जाते. कोया, मालमिस आणि मेलाचेरी या मिनिकॉय वगळता इतर बेटांवरील मुख्य जाती आहेत. कोया जातींचे लोक उच्चवर्गीय व धनिक आहेत. मालमिस हे मध्यमवर्गीय असून खलाशी किंवा मासेमारी करणारे आहेत. मेलाचेरी हे कनिष्ठ दर्जाचे असून ते कामगार किंवा कूळ म्हणून काम करतात. मानिकफन, ठाक्रूफन, ठाक्रू व राव्हेरी या मिनिकॉमधील चार मुख्य जाती आहेत. लक्षद्वीपमध्ये आंतरजातीय विवाहास मान्यता नाही. मरुमक्कतायम् कायद्यानुसार येथील लोक वागतात. मातृप्रधान संस्कृती मानली जाते. घरात स्त्रिया-मुलींना मान असतो. मुलीच्या वडिलांना मुलाच्या वडिलांकडून हुंडा मिळतो. मुलगा मुलीच्या घरी नांदायला जातो. एखाद्या मुलीला नवरा आवडेनासा झाला, तर ती त्याच्या चपला बाहेर ठेवते, मग नवऱ्याला तिच्या घरात प्रवेश नसतो.

वस्ती असलेल्या सर्व बेटांचे विद्युतीकरण करण्यात आलेले असून त्यासाठी ११८ किमी.लांबीचे वीजमार्ग टाकले आहेत. लक्षद्वीपमध्ये ५० विद्यालये असून त्यांत ८ माध्यमिक विद्यालये आहेत. या विद्यालयांत मिळून ४८६ शिक्षक व ११,९६५ विद्यार्थी आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून काही खास सवलती दिल्यात जातात. सर्व स्तरांवरील शिक्षण मोफत आहे. केरळमधील कालिकत विद्यापीठाशी संलग्न असलेले शासकीय जवाहरलाल नेहरू महाविद्यालय काव्हारट्टी येथे आहे (१९७२). मलयाळम् भाषा हे शाळेतील शिक्षणाचे माध्यम असून हिंदी हा सक्तीचा विषय आहे. उच्च शिक्षणासाठी बहुतांश विद्यार्थी भारतात इतरत्र जातात.

या केंद्रशासित प्रदेशात ७ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून काव्हारट्टी व मिनिकॉय येथे प्रत्येकीएक रुग्णालय आहे. त्याशिवाय बित्रा येथे एक प्रथमोपचार केंद्र, अन्ड्रोथ व काव्हारट्टी येथे प्रत्येकी एक आयुर्वेदिक दवाखाना आहे. पूर्वी अस्वच्छ पाण्यामुळे लोकांचे आरोग्य बिघडत असे. काव्हारट्टी येथे विद्युती अपोहन (इलेक्ट्रोडायलिसिस) पद्धतीने समुद्रातील पाण्याचे निर्क्षारीकरण करून पिण्याचे स्वच्छ, शुद्ध व गोडे पाणी येथील रहिवाशांना पुरविले जाते. स्वच्छ पाणी मिळू लागल्यामुळे रोगराई आटोक्यात आणली गेली आहे. पूर्वी कुष्ठरोग व हत्तीरोग यांचे येथे बरेच प्रमाण होते. आज ह्या दोन्ही रोगांवर नियंत्रण आणण्यात स्पृहणीय यश मिळाले आहे. काव्हारट्टी बेटावर कुष्ठरोग्यांसाठी रुग्णालय आहे. प्रत्येक बेटावर एक आरोग्य निरीक्षक असून औषधोपचार मोफत केले जातात. गंभीर आजार असलेल्या  रोग्यांना देशाच्या मुख्य भूमीवर आणून तेथे मोफत आरोग्यसेवा उपलब्ध केली जाते. सर्व रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांत मिळून १२० खाटा असून प्रतिहजारी लोकसंख्येसाठी तीन खाटा असे हे प्रमाण आहे. चोहोबाजूंनी समुद्राने वेढलेल्या या बेटांवर पिण्याच्या पाण्याची मात्र टंचाई आहे. येथील विहिरींमधील पाण्यात क्षारांचे प्रमाण अधिक असते.

पर्यटन : काव्हारट्टी ही लक्षद्वीपची राजधानी असून येथे सर्व शासकीय कार्यालये आहेत. याच बेटावर मत्स्यालय व जलजीवालय आहे. स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या विकासास लक्षद्वीपमध्ये खूप वाव आहे परंतु भारताच्या मुख्य भूमीवरून लक्षद्वीपला जाण्यासाठी पूर्वी असलेल्या कडक निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसायाचा विशेष विकास झालेला नव्हता तथापि वरील निर्बंध थोड्या प्रमाणात सौम्य करण्यात आल्यामुळे लक्षद्वीपला जाणाऱ्या  स्थानिक तसेच परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास चालना मिळालेली आहे पर्यटकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. १९८७-८८ मध्ये ३१६ परदेशी पर्यटकांनी तसेच मुख्य भूमी वरील १,६३८ पर्यटकांनी लक्षद्वीप बेटांना भेट दिली. खारकच्छच्या उथळ व नितळ पाण्यात वाढणारे प्रवाळ हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. अगत्ती बेटावर धावपट्टी तयार करण्यात आली असून एप्रिल १९८८ पासून मुख्य भूमी व अगत्ती यांदरम्यान वायुदूतसेवा कार्यान्वित झाली आहे. बंगारम बेटावर मनुष्यवस्ती नसली, तरी तेथे वेगवेगळ्या सुविधा पुरवून पर्यटन केंद्र म्हणून त्याचा विकास करण्यात आला आहे. 

चौधरी, वसंत.

नकाशाशाळेत जाणाऱ्या मुली, मिनिकॉय बेट.जलपर्यटन : प्रवाशांचे बेटावरील प्रमुख आकर्षण.काडमट बेटावरील पर्यटकनिवासमिनिकॉय बेटावरील पारंपरिक 'लावा' नृत्य