मौंट ब्‍लँक पूल व रूसो बेट, जिनीव्हा.जिनीव्हा : स्वित्झर्लंडच्या जिनीव्हा कँटनची आंतरराष्ट्रीय महत्त्वाची राजधानी. लोकसंख्या १,७३,६१८ (१९७०) असून उपनगरांसह ३,२१,१०० आहे. जिनीव्हा सरोवरातून ऱ्होन नदी जेथे निघते, तेथे हे शहर असून ‘लघु नगरींची राणी’ असे जिनीव्हाचे सार्थ वर्णन करण्यात येते. स्वित्झर्लंडच्या भूमीवर आहे म्हणूनच याला स्विस नगर म्हणावयाचे. एरवी जिनीव्हा आंतरराष्ट्रीय नगर आहे. आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस, आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटना, जागतिक आरोग्य संघटना व एतत्समान अन्य संघटनांची मुख्य कार्यालये येथे आहेतच. शिवाय १९२० पासून राष्ट्रसंघाची कचेरी येथे होती व आता संयुक्त राष्ट्र संघटनेचे यूरोपीय कार्यालय जिनीव्हालाच आहे. येथील लोकांत १९७० मध्ये ३४% परदेशी, मूळचे जिनीव्हातील ३०% व बाकीचे इतर स्विस कँटनमधून आलेले होते. नेहमीच्या इटली आणि फ्रान्समधून आलेल्यांशिवाय स्पेन व पोर्तुगाल, अमेरिका, आशिया, आफ्रिका, येथूनही आलेले आप्रवासी होते. पूर्वीचे ‘प्रॉटेस्टंट रोम ’ हे वैशिष्ट्य जाऊन आता कॅथलिकांचीच संख्या जास्त आहे. आल्प्स व जूरा पर्वतांदरम्यानच्या वाटेवर प्रभुत्व ठेवणारे व इटलीत जाणाऱ्या अनेक खिंडींचे केंद्र, असे मोक्याचे स्थान जिनीव्हाला मिळालेले आहे. जिनीव्हा सरोवराचे सान्निध्य, ऱ्होनचा स्वच्छ निळसर खळखळणारा प्रवाह, त्यावरील सुंदर पूल, शहराच्या पार्श्वभागी असलेले सालेव्हचे उंचच उंच सुळके व जूरा पर्वताची रांग, दूरवर शामॉनी खोऱ्यात दिसणारे ‘माँ ब्‌लां’ किंवा मौंट ब्‍लँक हे आल्प्सचे सर्वोच्च शिखर, नदीच्या पात्रात विहार करणाऱ्या लहान लहान नौका आणि सरोवरातील लहानमोठ्या बोटी इत्यादींमुळे जिनीव्हाला आगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे.

शहराचे शांत, निःशब्द वातावरण व त्याच्या परिसरातील अप्रतिम सृष्टीसौंदर्य यांमुळे अनेक आंतरराष्ट्रीय सभा, परिषदा, जिनीव्हाला भरतात. १९५४ ची कोरिया-इंडोचायना युद्धसमाप्ती परिषद, १९५५ ची शीतयुद्ध थांबविण्यासाठी झालेली शिखर परिषद, १९६२–६३ ची निःशस्त्रीकरण व अण्वस्त्रचाचणी संबंधीची परिषद इ. परिषदा यांत प्रमुख होत. 

स्वित्झर्लंडमधील शासकीय व आर्थिक केंद्र व जागतिक सांस्कृतिक केंद्र म्हणून जिनीव्हाला महत्त्व आहे. त्यामुळे जिनीव्हाशी संबंध नाही असा आधुनिक साहित्यिक वा कलाकार क्वचितच सापडेल. 

जिनीव्हा स्वित्झर्लंडचे प्रमुख औद्योगिक केंद्र आहे. येथे अनेक बँका व अन्य आर्थिक व्यवसाय केंद्रे असून घड्याळे, मोटारी, सायकली, ॲल्युमिनियम इत्यादींचे मोठमोठे कारखाने आहेत. कापडचोपड, वस्त्रप्रावरणे, अलंकार, आभूषणे इत्यादींचे व्यवसायही येथे चालतात. अलीकडे जलविद्युत्‌ उत्पादनासाठी लागणारी टर्बाइन्स व आल्टर्नेटर, विद्युत्‌ सामग्री, यंत्रहत्यारे, काटेकोर यंत्रे व उपकरणे यांचे उत्पादन वैशिष्ट्यपूर्ण आहे.

जिनीव्हातील सुंदर इमारतींत तेराव्या शतकातील सेंट पीटर कॅथीड्रल, सोळाव्या शतकातील नगरभुवन, अठराव्या शतकातील न्यायालय व आधुनिक काळातील राष्ट्रसंघ भवन इत्यादींची गणना होते. येथे रमणीय उद्याने, भव्य स्मारके, वेधशाळा, प्राणी आणि वनस्पती संग्रहालये आहेत. जिनीव्हा ऐतिहासिक शहर आहे. प्राचीन काळच्या अल्लोब्रोजेस टोळीचा पराभव करून रोमनांनी हे ठाणे काबीज केले. रोमनांनंतर पवित्र रोमन साम्राज्यातील सरंजामी सरदारांची सत्ता येथे होती. धर्मसुधारणेच्या चळवळीत येथे कॅल्व्हिनचा प्रभाव वाढला. त्याने सुरू केलेल्या अकादमीचेच रूपांतर जिनीव्हा विद्यापीठात झाले. रूसो, व्हॉल्तेअरसारख्या विचारवंतांचे निवासस्थान असल्याने प्रागतिक विचारांचे केंद्र म्हणून एकोणिसाव्या शतकात जिनीव्हा ख्यातनाम झाले. व्हिएन्ना परिषदेनंतर याला स्वतंत्र कँटनचा दर्जा मिळाला व १८४२ मध्ये हल्लीचे संविधान स्वीकारण्यात येऊन जिनीव्हाच्या आधुनिक इतिहासाला प्रारंभ झाला.                                                                      

ओक, द. ह.