जर्मनी : मध्य यूरोपातील औद्योगिक दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या प्रगत राष्ट्र. जर्मनीला ‘यूरोपचे हृदय’ असे म्हणतात. ट्यूटॉनिक भाषा बोलणारे लोक या देशात राहतात. हा देश ४७° १६’ उत्तर अक्षांशापासून ५५° उत्तर अक्षांशापर्यंत व ६° पूर्व रेखांशापासून १५° पूर्व रेखांशापर्यंत पसरला आहे. १९४९ मध्ये या देशाचे प. जर्मनी व पूर्व जर्मनी अशा दोन राजकीय भागांत विभाजन झाले. उत्तर सीमेलगत उत्तर समुद्र, बाल्टिक समुद्र व डेन्मार्क प. सीमेलगत नेदर्लंड्स, बेल्जियम आणि फ्रान्स दक्षिण सीमेलगत स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया व चेकोस्लोव्हाकिया व पूर्व सीमेलगत पोलंड हे देश आहेत. या देशाचे एकूण क्षेत्रफळ ३,५६,७७९ चौ. किमी. असून लोकसंख्या ७,९०,५२,६५१ होती (१९७३). एकूण लोकसंख्येपैकी ७०% ते ७२% लोकसंख्या मोठमोठ्या शहरांत केंद्रित झाली आहे.

भूवर्णन : भूपृष्ठरचनेच्या दृष्टीने जर्मनीचे तीन भागांत विभाजन करता येते. अगदी उत्तरेकडे उत्तर समुद्र आणि बाल्टिक समुद्र यांच्या किनाऱ्यालगत सखल मैदानी भाग पसरलेला आहे. तो फ्रान्सच्या नैर्ऋत्य भागापासून पूर्वेकडे सोव्हिएट रशियापर्यंत पश्चिम-पूर्व असा पसरलेला आहे. उत्तर जर्मनीचा सु. / भाग यात मोडतो. पूर्वेकडे ओडर व पश्चिमेकडील एल्ब या नद्यांच्या मुखाजवळील भाग सुपीक असून इतर भाग रेतीमिश्रित जमिनीचा आहे.

या मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेस दक्षिण जर्मनीतील उंचवट्यांचा पठारी प्रदेश आहे. हा संपूर्ण भाग टेकड्यांनी व्यापलेला असून जंगलांनी आच्छादिलेला आहे. नद्यांच्या खोऱ्यांमुळे हा भाग विदीर्ण झाला आहे.

या देशाचा अगदी दक्षिण भाग उंच अशा पर्वतांनी व्यापलेला आहे. नैर्ऋत्य भागात ब्लॅक फॉरेस्ट नावाचा पर्वत, आग्नेय भागात एर्ट्‌सगबिर्ग (ओर) पर्वत व संपूर्ण दक्षिण भाग बव्हेरियन पर्वतरांगांनी व्यापलेला आहे. या पर्वतीय प्रदेशातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वतमालेतून डॅन्यूब नदी उगम पावते.

उत्तरेकडील किनाऱ्यालगतच्या मैदानी प्रदेशाचे दोन भागांत विभाजन करता येते. हे दोन्ही भाग हिमनदीबरोबर वाहत आलेल्या गाळाच्या संचयनांनी निर्माण झाले आहेत. जटलंड द्वीपकल्पाचा भाग अंत्य हिमोढापासून निर्माण झाला असून रेतीमिश्रित मृदेचा आहे. त्यामुळे नापीक व विरळ लोकसंख्येचा आहे. ब्रेमेनपासून पूर्वेकडे पोलंडच्या सीमेपर्यंतचा मैदानी प्रदेश नद्यांच्या गाळाच्या संचयनाने निर्माण झाला असून तो सुपीक आहे. याच्या अगदी पश्चिम भागात रुर नदीच्या सुपीक खोऱ्याचा समावेश होतो.

जर्मनीच्या मध्यवर्ती उंचवट्याच्या भागाची भूपृष्ठरचना क्लिष्ट स्वरूपाची आहे. या भागात सुप्त ज्वालामुखीशंकू व विदीर्ण पठारे यांचा समावेश होतो. संपूर्ण भाग दाट जंगलाने व्यापलेला आहे व नद्यांच्या खोऱ्यांमुळे या भागातील टेकड्यांच्या रांगा विखंडित झाल्या आहेत. या भागात नद्यांची खोरी सुपीक असून सखोल शेती होते. या भागातील नद्यांच्या आणि सरोवरांतील पाण्यापासून फार मोठ्या प्रमाणावर विद्युत् शक्ती निर्माण केली जाते, तसेच या प्रदेशात खनिज संपत्ती सापडत असल्यामुळे उद्योगधंद्यांची वाढ झाली आहे. सपाट प्रदेशात व नद्यांच्या खोऱ्यांत दाट लोकसंख्या आहे. सॅक्सनी पठारी प्रदेशात लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे. या प्रदेशाच्या पश्चिम, वायव्य आणि पूर्व सीमांलगतच्या भागांत उद्योगधंद्यांची फार वाढ झाली आहे.


 जर्मनी


विभाजनापूर्वी या प्रदेशातून ऱ्हाईन, वेझर, एल्ब आणि ओडर या नद्या व त्यांच्या उपनद्यांमुळे विस्तृत जलप्रणालीचा भाग निर्माण झाला होता. पहिल्या महायुद्धापूर्वी व्हिश्चला ही नदीदेखील जर्मनीच्या हद्दीतूनच वाहत होती. दुसऱ्या महायुद्धानंतर ओडर नदीच्या पूर्वेकडील भाग पोलंडमध्ये समाविष्ट झाला व पोलंड आणि पूर्व जर्मनी यांमधील ही नदी सीमा झाली. ओडर नदीचा खाडीचा भागही आता पोलंडमध्ये समाविष्ट झाला आहे. आता जर्मनीमध्ये वेझर, एल्ब आणि ऱ्हाईन या तीनच नद्यांच्या जलप्रणालीच्या भागाचा समावेश होतो. यांतील वेझर आणि एल्ब या जर्मनीमधून उत्तरेकडे वाहत जाऊन जर्मनीच्या ताब्यात असलेल्या समुद्राला जाऊन मिळतात. ऱ्हाईन ही नदी जर्मनीतून वाहत असली, तरी शेवटी रॉटरडॅम या डच बंदराजवळ समुद्राला जाऊन मिळते. या नद्या मध्यवर्ती उंचवट्याच्या भागातून उगम पावून उत्तरेकडे वाहत जाऊन समुद्राला मिळतात. या भागात भरपूर हिमवर्षाव होत असल्यामुळे या नद्यांना बाराही महिने भरपूर पाणी असते. त्यामुळे या नद्या वर्षभर जलवाहतुकीस उपयुक्त असतात.

ऱ्हाईन ही नदी व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची आहे. या नदीची एकूण लांबी १,२८० किमी. असून तीवरून कच्च्या व पक्क्या मालाची भरपूर वाहतूक चालते. या नदीवर अंतर्गत भागातही व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची बंदरे आहेत. ही सर्व बंदरे अत्याधुनिक आहेत. नदीवर एकूण २० महत्त्वाची शहरे आहेत. त्यांपैकी कोलोन, ड्युसेलडॉर्फ, एसेन आणि हायड्लबर्ग ही शहरे व्यापारी व औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाची आहेत. या नदीच्या खोऱ्यातच यूरोपातील सर्वांत मोठी कोळसा व लोहखनिज उत्पादनक्षेत्रे पसरलेली आहेत.

वेझर आणि एल्ब या नद्यांच्या मुखांवर ब्रेमेन आणि हँबर्ग ही दोन प्रमुख बंदरे आहेत. ब्रेमेन हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख बंदर आहे. एल्ब ही देखील जलवाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची नदी आहे. ही चेकोस्लोव्हाकियामधून उगम पावते व पूर्व जर्मनीतील ड्रेझ्डेन व मॅग्डेबर्ग या शहरांजवळून वाहत जाते. त्यानंतर ही पूर्व व पश्चिम जर्मनीच्या सीमेवरून वाहत जाते आणि शेवटी प. जर्मनीतील हँबर्ग या शहराच्या आग्नेयीकडून वाहत जाते. जर्मनीतील संपूर्ण अंतर्गत जलवाहतूक या नदीतून चालते.

हवामान : जर्मनीच्या उत्तर सीमेलगत समुद्र असला, तरी जर्मनीच्या मध्यवर्ती स्थानामुळे समुद्रसान्निध्याचा फायदा सर्वच भागांना सारख्या प्रमाणात मिळत नाही. पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास समुद्रसान्निध्याचा परिणाम कमीकमी होत जातो. त्यामुळे अगदी पूर्व भागातील हवामान खंडांतर्गत प्रकारचे आहे. हिवाळ्यात या देशात दोन प्रकारचे हवामान आढळते. या वेळी हवेवर उष्णकटिबंधीय सागर भागावरून येणाऱ्या अस्थिर हवेच्या राशींचा व ध्रुवीय प्रदेशाकडून येणाऱ्या थंड व कोरड्या स्थायी हवेच्या राशींचा परिणाम होतो. उत्तर समुद्र किनाऱ्यालगतच्या भागात हिवाळ्यातील सरासरी मासिक तपमान १·७° से. व जुलै महिन्यातील सरासरी मासिक तपमान १५·६° से. इतके असते. वार्षिकसरासरी तपमान कक्षा फारच कमी असते. हँबर्ग येथे तपमान कक्षा –०·६° से.इतकी असते. वर्षभर आकाश ढगांनी व्यापलेले असते व पाऊस पडतो.

ऱ्हाईनपासून एल्ब नदीच्या खोऱ्यापर्यंत खंडांतर्गत हवामानाचा सुधारित प्रकार आढळतो. या भागात जानेवारी महिन्याचे सरासरी तपमान –१·१° से. व जुलै महिन्याचे सरासरी तपमान १५·६° से. असते. जुलै महिन्यात या भागात भरपूर सूर्यप्रकाश असतो. या भागातील मॅग्डेबर्ग येथील सरासरी वार्षिक तपमान कक्षा १·१° से. इतकी असते. पाऊस फार थोडा पडतो.

एल्ब नदीच्या पूर्व भागात हिवाळा अतितीव्र परंतु उन्हाळा सौम्य असतो. जानेवारी महिन्यात सरासरी तपमान कक्षा –२.२ से. व उन्हाळ्यात २० से. असते. सखल भागात थोडा पाऊस पडतो परंतु पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त असून उन्हाळ्यात मुसळधार पाऊस पडतो. हिवाळ्यात पावसाचे प्रमाण कमी असते. उन्हाळ्यात अभिसरण पर्जन्य पडतो.

बव्हेरियातील अल्पाइन पर्वतभागात हवामान थंड असते. जानेवारीमध्ये सरासरी तपमान कक्षा –११·७° से. व जुलै महिन्यात १·७° से. असते. हिवाळ्यात भरपूर हिमवृष्टी होते व उन्हाळ्यात पावसाचे प्रमाण जास्त असते.

हिवाळ्यात नैर्ऋत्येकडून ईशान्येकडे आवर्त प्रवास करतात परंतु उन्हाळ्यात ते उत्तरेकडे वळतात. या आवर्तांचाही हवामानावर परिणाम होतो. अल्पाइन खोऱ्यांच्या भागात व मध्यवर्ती उंचवट्याच्या प्रदेशात स्थानिक कारणांमुळे प्रचलित वाऱ्यांची दिशा बदलत असते. वसंत ऋतूत फॉन वाऱ्यांमुळे बव्हेरियन प्रदेशाकडे उष्ण व कोरडी हवा वाहू लागते. यावेळी उंच भागातील हिम वितळू लागते. ऱ्हाईन नदीच्या खोऱ्याकडे वाहणाऱ्या दरीतील वाऱ्यांमुळे वसंत ऋतूत दाट धुके पडते. या धुक्यामुळे फळबागांचे फार नुकसान होते.

पावसाच्या वितरणावर आवर्ताचा व प्राकृतिक भूपृष्ठारचनेचा परिणाम होतो. उत्तर समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रदेशात वार्षिक सरासरी पर्जन्य ७० सेंमी. असून ऱ्हाईन नदीच्या उंच भागाकडे व दक्षिण जर्मनीकडे पावसाचे प्रमाण वाढते. ब्लॅक फॉरेस्ट पर्वतभागात सरासरी पर्जन्य ८७ सेंमी., हार्ट्‌झ भागात १५० सेंमी., बव्हेरियन उंचवट्यांच्या भागात १५० ते २०० सेंमी. व आल्प्स पर्वतभागात २०० सेंमी. पाऊस पडतो. दऱ्यांच्या भागात पावसाचे प्रमाण कमी म्हणजे ७५ सेंमी. असते.

वनस्पती :२७% भाग वनस्पतींनी आच्छादिलेला आहे. यातील ६७% जंगलाचा भाग सूचिपर्णी अरण्याचा. स्प्रूस आणि पाइन वृक्षांची लागवड केली आहे. ऱ्हाईन नदीच्या खोऱ्याच्या मध्यवर्ती भागात व द. जर्मनीमध्ये पानझड वृक्षांची अरण्ये आहेत. सूचिपर्णी अरण्यातील झाडांमध्ये ४५% झाडे स्कॉट पाइनची आहेत. मध्यवर्ती उंचवट्याच्या भागात व दक्षिणेकडील पर्वतीय प्रदेशात सूचिपर्णी अरण्ये असतात. ब्लॅक फॉरेस्ट व बव्हेरियन आल्प्स भागात १,२०० मी.ते १,५०० मी. उंचीपर्यंतच्या भागात सूचिपर्णी अरण्यात स्प्रूस, बीच आणि सिल्व्हर फर वृक्षांची जंगले आहेत.

सखल प्रदेशात खुरटी वनस्पती आढळते. फेन, मार्श बॉग आणि फर या प्रकारच्या वनस्पती उत्तर भागातील दलदलीच्या भागात आढळतात. उत्तर समुद्र किनाऱ्यालगतचे दलदलीचे भाग सुधारून त्यांवर गवताची लागवड केली आहे. तसेच काही भागातील जंगले तोडून त्या भागात गवताची कुरणे आढळतात. अल्पाइन खोऱ्याचे भाग, हर्सिनियन उंचवट्याचा प्रदेश व बव्हेरियन डोंगराळ भागात उतारावर गवताची विस्तीर्ण कुरणे पसरलेली आहेत. एल्ब आणि ओडर नद्यांच्या दरम्यानच्या भागातही या प्रकारची गवताची कुरणे आढळतात.

मृदा :जर्मनीमध्ये पॉडसॉल (पडझोल) जंगलातील पिंगट मृदा, चेर्नोसेम (चेर्नोझम), गाळाची मृदा व क्षारयुक्त मृदा इतके मृदांचे प्रकार आढळतात.

उत्तरेकडील सखल प्रदेशात व दक्षिणेकडील उंचवट्याच्या भागात पॉडसॉल मृदा आढळते. ही राखी रंगाची मृदा जर्मनीच्या बऱ्याचशा भागात आढळते. या प्रकारच्या मृदेत स्कॉट पाइन वृक्षांची चांगली वाढ होते. द. जर्मनीत ब्लॅक फॉरेस्ट भागात या प्रकारची मृदा रेतीमिश्रित आहे. एल्ब नदीच्या पूर्व भागात व बव्हेरियन पठारी भागात पिंगट मृदा आढळते. ही मृदा हिमोढांपासून तयार झाली आहे. पानझड वृक्षांच्या जंगल भागातही या प्रकारची मृदा आढळते.


चेर्नोसेम ही काळ्या रंगाची मृदा जर्मनीच्या जवळजवळ सर्व भागांत आढळते. या मृदेत चुनखडीचे प्रमाण जास्त असते व ही लोएस मृदेसारखीच असते. या प्रकारच्या  मृदेचे भाग गवताने आच्छादिलेले आहेत. ऱ्हाईन व डॅन्यूब नद्यांच्या मैदानी भागात गाळाची मृदा आढळते.ऱ्हाईन नदीच्या खालच्या टप्प्यात कोलोनपासून डच सीमेपर्यंत ही मृदा पसरलेली आहे. त्याचप्रमाणे उत्तर समुद्र किनाऱ्यालगतच्या भागात या प्रकारची मृदा आढळते.

उत्तर समुद्र किनाऱ्यालगतच्या दलदलीच्या भागात क्षारयुक्त मृदा आढळतात. एम्स, वेझर आणि एल्ब नद्यांच्या मुखालगतच्या भागात या प्रकारची मृदा विस्तृत प्रमाणात आढळते. या प्रकारच्या मृदेच्या भागात गवताची कुरणे आढळतात.

खनिजसंपत्ती : कोळसा, लोहधातू, तांबे, निकेल व जस्त, पोटॅश आणि इतर क्षारखनिजे सापडतात. याशिवाय थोड्याफार प्रमाणात खनिज तेलाचे व नैसर्गिक वायूचे उत्पादन होते.

यूरोप खंडात जर्मनीमध्ये डामरी कोळशाचे भरपूर साठे आहेत. उद्योगधंद्यांच्या दृष्टीने कोळसाखाणकामास महत्त्वाचे स्थान आहे. रुर नदीच्या खोऱ्यात सु. ३,२०० चौ. किमी. क्षेत्रात उच्च प्रतीच्या डामरी कोळशाचे भरपूर साठे आहेत. रुर खोऱ्यातील वेस्टफेलिया कोळसा उत्पादनक्षेत्रात जर्मनीच्या कोळशाच्या एकूण साठ्याच्या ९०% कोळशाचे साठे आहेत. ८६% कोळशाचे उत्पादन या एका प्रदेशातून येते. या प्रदेशातील रुर नदीच्या खोऱ्यात कोळशाच्या खाणीजवळ लोखंडपोलाद व इतर आधुनिक कारखाने स्थापन झाले आहेत. झार कोळसा उत्पादक क्षेत्र पश्चिम जर्मनीतील दुसरे महत्त्वाचे कोळसा उत्पादक क्षेत्र आहे. या क्षेत्रातून एकूण उत्पादनाच्या १२% कोळशाचे उत्पादन होते.

पूर्व जर्मनीत डामरीकोळशाचे अल्पसे साठे आहेत. सॅक्सनीच्या दक्षिण भागात टेकड्यांच्या पायथ्यालगतच्या भागात कोळशाचे साठे आहेत. या प्रदेशातील ड्रेझ्डेनच्या नैर्ऋत्येस असलेले क्षेत्र कोळशाच्या उत्पादनात महत्त्वाचे आहे. याशिवाय थुरिंजियन फॉरेस्ट भागात व बर्लिनच्या आग्नेय भागात लहान कोळसा उत्पादनक्षेत्रे पसरलेली आहेत.

लिग्नाइट कोळशाच्या उत्पादनात जगात जर्मनी हा देश अग्रेसर आहे. पूर्व जर्मनीमध्ये अशा कोळशाचे विशाल साठे पसरले आहेत. भूपृष्टापासून १५ मी. ते ३० मी. खोलीवर हा कोळसा सापडतो. उत्तर भागात या प्रकारच्या कोळशाचे बरेच साठे आहेत. प. जर्मनीमध्ये ऱ्हाईन नदी व बेल्जियम सीमेचा भाग यांच्या दरम्यान लिग्नाइट कोळशाचे साठे आढळतात. पूर्व जर्मनीत लिग्नाइट कोळशाचे साठे असलेली दोन विस्तृत क्षेत्रे आहेत. पहिले क्षेत्र लाइपसिक शहराच्या सभोवताली ३,२०० चौ. किमी. क्षेत्रात पसरलेले आहे व दुसरे क्षेत्र एल्ब नदीच्या पूर्व भागात १,९०० चौ. किमी. क्षेत्रात पसरलेले आहे. हे क्षेत्र ड्रेझ्डेनपासून ओडर नदीपर्यंत आहे. जर्मनीमध्ये या कोळशाचा विद्युत् शक्ती निर्माण करण्यासाठी फार उपयोग करतात. तसेच या कोळशापासून डामर व इतर रासायनिक पदार्थ तयार केले जातात.

या देशात लोहखनिजाचे साठे असले, तरी एकूण गरजेच्या मानाने उत्पादन कमी पडते. मध्यवर्ती उंचवट्याच्या प्रदेशात उच्च प्रतीच्या लोहधातूंच्या खाणी आहेत. कोलोनच्या पूर्वेस असलेल्या झाउअरलांट भागात व तसेच थुरिंजियन व बोहीमियन उंचवट्याच्या प्रदेशात लोखंडाचे साठे आहेत. सॅक्सनीच्या दक्षिण भागात ओर पर्वतभागातही लोहखनिज सापडते. हलक्या प्रतीच्या लोहधातूचे साठे उत्तर भागातील मैदानी प्रदेशात सापडतात. हॅनोव्हर आणि ब्रंझविक येथील खाणींतील लोखंड जवळच उभारण्यात आलेल्या कारखान्यांत शुद्ध केले जाते. पूर्व जर्मनीत लोहधातूचे साठे फारच कमी आहेत. प. जर्मनीचे लोहधातूचे उत्पादन २५ लक्ष टन इतके आहे.

अलोह धातूंच्या उत्पादनात फार पूर्वीपासून हा देश प्रसिद्ध आहे. पूर्व जर्मनीत हार्ट्‌झ पर्वताजवळ मॅन्सफील्ड येथे तांब्याच्या खाणी आहेत. त्याचप्रमाणे याच भागात शिसे, जस्त आणि चांदी सापडते.

पोटॅशच्या उत्पादनात जर्मनीला महत्त्वाचे स्थान आहे. सॅक्सनी प्रदेशात पोटॅशचे भरपूर साठे आहेत. पोटॅशच्या जागतिक उत्पादनाच्या ४०% पोटॅशचे उत्पादन एकट्या जर्मनीतून होते. पोटॅशचे एकूण उत्पादन ४७ लक्ष टन असून सैंधवाचे उत्पादनही भरपूर आहे. मध्यवर्ती पठारी प्रदेशाच्या उत्तर सीमेजवळ सैंधवाचे साठे आहेत. त्यांचा रासायनिक पदार्थ व खते तयार करण्यासाठी उपयोग करतात.

जर्मनीमध्ये खनिज तेलाचे साठे फारच कमी आहेत. दुसऱ्या महायूद्धापूर्वी हॅनोव्हर आणि ब्रंझविकजवळ असलेल्या खनिज तेल क्षेत्रातून खनिज तेलाचे उत्पादन होत होते. हल्ली एम्स नदीचे खोरे व थुरिंजिया प्रदेश, बव्हेरिया व उत्तर समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या ब्रेमरहेवेनजवळील क्षेत्रातून खनिज तेलाचे उत्पादन होते. वार्षिक उत्पादन ७० लक्ष मे. टन. नैसर्गिक वायूचे उत्पादन ९१·५ कोटी घ. मी. इतके होते.

जर्मनीमध्ये विद्युत्‌शक्तीचा जास्तीत जास्त विकास झाला आहे. औष्णिक विद्युत्‌शक्तीचे उत्पादन जास्त. विजेच्या एकूण उत्पादनाच्या १५% उत्पादन जलविद्युत्‌शक्तीचे. प. जर्मनीमधील रुर कोळसा उत्पादक प्रदेशात औष्णिक विद्युत्‌शक्ती निर्माण करणारी अनेक केंद्रे उभारण्यात आली आहेत. बव्हेरियन आल्प्स पर्वतभागात जलविद्युत्‌शक्ती केंद्रे उभारण्यात आली आहेत.

शेती : सु. ५०% जमीन शेतीस उपयुक्त आहे. सामुदायिक शेतीपद्धतीचा व मिश्र शेती पद्धतीचा अवलंब केला जातो. सखोल पद्धतीने शेती केली जाते. उत्तर जर्मनीच्या मध्यवर्ती भागात लोएस मातीच्या प्रदेशात सखोल पद्धतीने शेती केली जाते. उत्तर भागातील सुपीक व मैदानी प्रदेशात गहू, बीट आणि बटाटे  ही पिके  विपुल प्रमाणात काढली जातात. या प्रदेशात आधुनिक यंत्रांचा व रासायनिक खतांचा वापर करून शेती केली जाते. काही भागात शेतीयोग्य जमिनीचे भाग कुरणासाठी राखून ठेवलेले आहेत. ऱ्हाईन नदीच्या वरच्या टप्प्यातील प्रदेशात मिश्र शेती होते. गहू, मक्का, तंबाखू आणि फळफळावळ ही मुख्य पिके काढली जातात. ब्लॅक फॉरेस्ट व बर्गस्ट्रासी भागात द्राक्षाचे मळे आहेत.

शेतीयोग्य जमिनीच्या ६०% जमीन अन्नधान्याच्या पिकांसाठी वापरली जाते. गहू, राय, ओट आणि बार्ली ही महत्त्वाची पिके. यांशिवाय मका आणि बटाटे ही पिके घेतली जातात. अन्नधान्याच्या पिकांत रायचे उत्पादन जास्त. बटाट्याच्या उत्पादनात हा देश जगात अग्रेसर आहे. खाद्यपदार्थ व डुकराचे खाद्य म्हणून याचा फार उपयोग होतो. एल्ब नदीच्या वरच्या टप्प्यात बटाट्याची विस्तृत प्रमाणावर लागवड होते, त्याचप्रमाणे दक्षिण जर्मनीमध्ये ऱ्हाईन नदीच्या खोऱ्यातही केली जाते.

नेपोलियन युद्धाच्या काळात या देशात बीटच्या लागवडीस प्रारंभ झाला. बीटपासून साखर तयार केली जाते त्याचप्रमाणे जनावरांचे खाद्य म्हणूनही त्याचा वापर केला जातो. ज्या भागात गव्हाची शेती होते, त्या भागात आलटून पालटून बीटची लागवड केली जाते. याशिवाय कोरड्या हवामानाच्या प्रदेशातील मेक्लनबुर्क, क्रचगॉ आणि नेकार भागांत बीटची लागवड होते.

मोझेल व ऱ्हाईन नद्यांच्या खोऱ्यांत उतारावरील भागात व बर्गस्ट्रासी भागात द्राक्षांची विस्तृत प्रमाणावर लागवड केली जाते. नैर्ऋत्य व दक्षिण भागांत तंबाखूची लागवड केली जाते. ऱ्हाईन नदीच्या वरच्या टप्प्यातील भरपूर सूर्यप्रकाश मिळणाऱ्या भागात फळांची लागवड होते. याशिवाय मोझेल, नेकार, बामबेर्क या भागांतही फळफळावळ होते.

दाते, सु. प्र.


इतिहास : जर्मनी या शब्दाची व्युत्पत्ती किंवा त्याचा इतिहास स्पष्ट नाही. जर्मन हे नाव मूलतः ऱ्हाईन नदीच्या पूर्वेकडील केल्टीक टोळ्यांच्या संदर्भात वापरले असावे. नंतर ट्यूटॉनिक टोळ्या त्याच प्रदेशात स्थायिक झाल्यानंतर त्यांच्या संदर्भातही तीच संज्ञा वापरली असावी, असा अंदाज आहे. अतिप्राचिन मानवाच्या तेथील अस्तित्वाविषयी काही खुणा सापडल्या आहेत. होमो हायडेलबर्गेनसिस नावाचा मानववंशीय नमुना जर्मनीत अतिप्राचीन काळी मानवी अस्तित्व असल्याचे सिद्ध करतो. इसवी सनाच्या आसपास जर्मनीचा बहुतेक भाग निरनिराळ्या टोळ्यांनी व्यापलेला होता. ज्यूलियस सीझरने जर्मनीचा काही भाग जिंकला होता. पुढे तो या भागावर सुभेदार होता.

इसवी सनाच्या आरंभापासून सु. २५० वर्षांचा काळ म्हणजे जर्मन टोळ्यांच्या आपसांतील व रोमन सम्राटांशी झालेल्या लढायांचा काळ होय. त्यांत कधी टोळ्यांचा, तर कधी सम्राटांचा विजय होई. पाचव्या शतकात हूण व इतर टोळ्यांचे जर्मनीत वर्चस्व होते. याच काळात जर्मनीचे ख्रिस्तीकरण मोठ्या प्रमाणात झाले. आठव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत तेथे मेरोव्हिंजिअन घराण्यातील राजपुरुषांचे प्राबल्य होते. नंतर कॅरोलिंजिअन घराण्यातील राजपुरुष पुढे आले. त्या सर्वांत शार्लमेन हा अतिशय प्रख्यात राजा होऊन गेला. त्याने सॅक्सनेतर टोळ्यांचाही पराभव केला होता, त्याच्या नंतर त्या घराण्यास उतरती कळा लागली. ९११ पासून पुढे जर्मनीत राजा निवडण्याची पद्धत सुरू झाली. येथपर्यंतच्या काळातही रोमन सम्राट व जर्मन राजे यांमध्ये सत्तास्पर्धा एकसारखी चालू होती. दहाव्या शतकाच्या आरंभी सॅक्सन घराणे पुढे आले. त्यातील राजांनी सु. शंभर वर्षे राज्य केले. या घराण्याच्या काळात जर्मन साम्राज्याला पवित्र रोमन साम्राज्य हे नाव मिळाले (९११–१०२४). नंतर फ्रँकोनिअन घराणे पुढे आले. त्याचे राज्य सु. २५० वर्षे जर्मनीवर होते (१०२४–१२७३). त्यानंतर हॅप्सबर्ग, लक्सेंबर्ग, बव्हेरिया इ. ठिकाणी राजांनी सु. १५० वर्षे राज्य केले (१२७३–१४३८). नंतर ऑस्ट्रियातील घराणे उदयास आले. त्या घराण्याची सत्ता सु. ३५० वर्षे होती (१४३८–१७९२). ऑस्ट्रियन घराण्यातील पहिला मॅक्सिमिलिअन याच्या कारकीर्दीत मार्टिन ल्यूथर पूढे आला. त्याने ख्रिस्ती धर्मसुधारणेची मोठी चळवळ केली. तीसाठी तीस वर्षांचे युद्धही झाले (१६१८–४८). तरीही बरीच वर्षे जर्मनीत त्याच्या प्रॉटेस्टंट पंथाने मूळ धरले नाही. त्याच्या पंथाचा प्रसार मुख्यतः त्याच्या मृत्यूनंतर उपर्युक्त युद्धानंतर झाला.

उपर्युक्त युद्धामुळे राज्याची घडी विस्कळित झाली होती. प्रॉटेस्टंट चळवळ व युद्ध यांमुळे निर्माण झालेली राष्ट्रीय भावना परस्पर हेवेदावे यामुळे नाहीशी झाली. परिणामी सतराव्या शतकाच्या अखेरीस जर्मनीत अनेक छोटीमोठी राज्ये अस्तित्वात आली. धार्मिक भावनाभिन्नत्वामुळे एकवाक्यता नव्हती. पवित्र रोमन साम्राज्याचे अस्तित्व तात्त्विक होते. प्रत्यक्षात प्रत्येक राज्य स्वयंपूर्ण आणि सार्वभौम होते. ऑस्ट्रिया, बव्हेरिया, सॅक्सनी, हॅनोव्हर, ब्रांडनबुर्क, प्रशिया ही त्यांपैकी काही महत्त्वाची राज्ये होती. ऑस्ट्रियाची जर्मन राज्यातील भूमिका दिवसेंदिवस गौण होऊ लागली. ऑस्ट्रियाच्या पश्चिमेस उत्तर डॅन्यूबवर असलेल्या बव्हेरियात व्हिटेल्सबाख घराणे राज्य करीत होते. जर्मन राजकारणात याचे स्थान दुय्यम राहिले.

सॅक्सनीचे राज्य उत्तर एल्बवर बोहीमिया व ब्रांडनबुर्क यांच्यामध्ये वसले होते. भौगोलिक दृष्ट्या हे जर्मनीचे केंद्रस्थान असून येथील व्हेटीन हे राजघराणे प्रॉटेस्टंट असून फ्रीड्रिखने (१४६३–१५२५) मार्टिन ल्यूथरला आश्रय आणि संरक्षण दिले होते. सतराव्या शतकात अनेक गुणी परंतु निर्बल राजांनी सॅक्सनी आणि ऑस्ट्रिया यांच्यात समझोता घडवून आणला. पहिला फ्रीड्रिख ऑगस्टस (१६९४–१७३३) याने तर पोलंडचे राज्य मिळविण्यासाठी कॅथलिक पंथ स्वीकारला. बहुतेक उत्तर जर्मनी प्रॉटेस्टंट होता. त्यांवरील सॅक्सनीचे वर्चस्व नाहीसे होऊन नेतृत्वपदी ब्रांडनबुर्क घराणे येऊन प्रशियाने पदार्पण केले.

हॅनोव्हर घराणे प्रॉटेस्टंट होते. इंग्लंडचे घराणे व जर्मनीचे नियुक्त राजे या युतीमुळे जर्मन राजकारणात इंग्लंडचे महत्त्व वाढले. तथापि हॅनोव्हर घराणे हे जर्मन राजकारणाचे केंद्र कधीच नव्हते.

उत्तर जर्मनीत ओडर नदीकाठी बर्लिन शहराभोवती केंद्रित झालेला ब्रांडनबुर्कचा परगणा मुलतः पवित्र रोमन साम्राज्याच्या सरहद्दीचा प्रांत म्हणून निर्माण झाला होता. १४१५ मध्ये त्यास निर्वाचक प्रदेशाचा दर्जा देण्यात येऊन तो नवीनच होहेंझॉलर्न घराण्याकडे गेला. सोळाव्या शतकात ब्रांडनबुर्कच्या राजाने ल्यूथरची शिकवण अंगिकारली. त्यामुळे त्याचे राजकीय स्वातंत्र्य वाढून चर्चच्या संपत्तीची राजसंपत्तीत भर पडली. त्रिदशसांवत्सरिक युद्धाच्या प्रारंभी या राजांना विवाहसंबंधातून कॅलव्हचा परगणा मिळाला. १६१८ मध्ये त्यांना पूर्व प्रशियाचा भाग मिळाला. तेराव्या शतकात प्रशियाचे राज्य ट्यूटॉनिक शिलेदार ह्या कॅथलिक धार्मिक संघटनेने निमार्ण केले. त्यांनी जर्मन संस्कृती व ख्रिस्ती धर्म यांचा प्रचार केला. सोळाव्या शतकात त्यांच्या पुढाऱ्याने प्रॉटेस्टंट पंथाचा स्वीकार केला व प्रशियात वंशपरंपरागत राज्य सुरू झाले. १६१८ मध्ये होहेंझॉलर्न घराणे नामशेष झाल्यापासून हे राज्य ब्रांडनबुर्कच्या राजास मिळाले. त्यापूर्वी पोलंडशी झालेल्या युद्धात पश्चिम प्रशियाचा भाग पोलंडमध्ये समाविष्ट करण्यात येऊन पूर्व प्रशियास मांडलिकाचे स्थान दिले गेले. वेस्टफेलियाच्या तहान्वये ब्रांडनबुर्कला हाल्बरस्टाट, मिंडन आणि मॅग्डेबर्ग हे प्रांत व पॉमेरेनीयाचा पूर्व भाग मिळाला. कित्येक वर्षे चाललेल्या युद्धाच्या उत्तरार्धात ब्रांडनबुर्कच्या गादीवर आलेल्या फ्रीड्रिख विल्यम (द ग्रेट इलेक्टर) ह्याने जर्मनीतील वर्चस्व वाढविले. स्वीडन-पोलंड युद्धाचा फायदा घेऊन पूर्व प्रशियावरील पोलंडचे सार्वभौमत्व झुगारून दिले. फ्रान्सच्या चौदाव्या लूईने पुकारलेल्या डच युद्धात त्याने फ्रान्सविरुद्ध भाग घेतला व स्वीडनचा पराभव केला. युद्धविरामानंतर जिंकलेले प्रांत त्यास परत करावे लागले, तरी ब्रांडनबुर्क-प्रशियाचे महत्त्व यूरोपभर पसरले. त्याने राज्यात अंतर्गत सुधारणा घडवून आणून अनियंत्रित सत्तेस सुरुवात केली. राज्यात एकसूत्रीपणा आणून आर्थिक सत्ता आपल्या हाती ठेवली. धर्मसहिष्णुतेचे धोरण स्वीकारून आर्थिक उन्नत्तीकडे लक्ष दिले. फ्रेंच राजांनी हाकलून दिलेल्यांना आपल्या राज्यात स्थायिक करून घेतले. खडे सैन्य ठेवून त्याची कार्यक्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला. यूरोपीय इतिहासात प्रथमतः त्यानेच लष्करी अधिकाऱ्यांना सर्वांगीण शिक्षण दिले व कर्तृत्व आणि गुण ह्या अटी बढतीसाठी ठेवल्या. प्रशियाची प्रगती झपाट्याने होऊ लागली.

त्याचा मुलगा तिसरा फ्रीड्रिख ह्याच्या काळात (१७०१) प्रशियाच्या सामंतांना राजा हा किताब सम्राट लेओपोल्टने बहाल केला. अठराव्या शतकात प्रशियाचे सामर्थ्य वाढीस लागले. पहिला फ्रीड्रिख विल्यम ह्याने प्रशियाचे आर्थिक व लष्करी सामर्थ्य वाढविले. सैन्य ३८,००० वरून ८०,००० वर नेले. राज्यात कडक लष्करी शिस्त निर्माण केली. १७४० मध्ये त्याचा मुलगा दुसरा फ्रीड्रिख (१७१२–८६) गादीवर आला. हाच फ्रीड्रिख द ग्रेट या नावाने प्रसिद्ध पावला. त्याच्या कारकीर्दीत प्रशियाचे महत्त्व वाढले. पोलंडची फाळणी करून, ऑस्ट्रियाशी युद्ध करून, फ्रीड्रिखने पूर्व व पश्चिम प्रशिया एकत्रित केले. प्रशियन प्रदेशाचा विस्तारही केला. ⇨ ऑस्ट्रियन वारसा युद्धामध्ये भाग घेऊन प्रशियाच्या लष्करी सामर्थ्याची जाणीव त्याने यूरोपला करून दिली. १७७८–७९ मध्ये निर्माण झालेल्या बव्हेरियन वारसाच्या वादात त्याने ऑस्ट्रियाविरोधी धोरण स्वीकारून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. १७८५ मध्ये ऑस्ट्रियन सम्राट दुसरा जोझेफ याच्याविरुद्ध केलेल्या जर्मन सत्ताधीशांच्या संघाचे नेतृत्व फ्रीड्रिखकडे गेलेले दिसते.१७८६ मध्ये दुसरा फ्रीड्रिख विल्यम गादीवर आला. १७८६–९७ ह्या त्याच्या कारकीर्दीत जर्मनीत आणि यूरोपभर फ्रेंच राज्यक्रांतीमुळे वेगळेच वातावरण निर्माण झाले.


फ्रेंच राज्यक्रांतीच्या प्रारंभी जर्मनीची स्थिती ‘ईश्वरनिर्मित गोंधळ’ अशा शब्दात वर्णिली जाते. पवित्र रोमन साम्राज्य नाममात्रच राहिले होते. ऑस्ट्रिया, प्रशिया, बव्हेरिया, हॅनोव्हर आदी प्रबळ सामंत राज्यांनी आपली सत्ता वाढविल्यामुळे मध्यवर्ती सत्ता कमकुवत झाली होती.एकोपा किंवा राष्ट्रीय भावना अस्तित्वात नव्हती. पश्चिम व पूर्व जर्मनीच्या सामाजिक जीवनातही महत्त्वाचे फरक होते. शेतकरीवर्गाची स्थिती अनुकंपनीय व शेतीपद्धती अवभृत होती. सरदार वा सामंतवर्गाने व्यापारउदीम करणे शिष्टसंमत नव्हते. लष्करभरती निरनिराळ्या राज्यांतून होई. त्यामुळे लष्करात स्वामिनिष्ठेऐवजी धंदेवाईकपणा आला होता. संधिसाधुत्वामुळेजर्मनसामंतांमध्येतेढवाढलीहोती. प्रजा प्रवाहपतित व प्रगतीपराङ्‌मुख होती. नेपोलियनच्या हस्ते पराभवाचे तडाखे बसल्यानंतर ही परिस्थिती काहीशी बदलली.

१७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीचा उठाव झाला. त्या वेळी जर्मन विचारवंतांनी तिचे स्वागत केले. सामंतांची प्रतिक्रिया मात्र वेगवेगळी झाली. राजघराण्याशी असलेल्या आपल्या संबंधामुळे साहजिकच ऑस्ट्रिया, फ्रेंच क्रांतिकारकांच्या घातपाती कृत्यासंबंधी साशंक झाला. सामान्य जनतेच्या उठावाविरुद्ध प्रतिक्रिया राजेशाहीच्या तत्त्वज्ञानातून निर्माण झाली. ती सर्वत्र सारखीच होती. विशषतः १७९१ च्या जूनमध्ये फ्रेंच राजा सोळावा लूई याच्या पलायनाच्या अयशस्वी प्रयत्नानंतर ती अधिक तीव्र झाली. २७ ऑगस्ट १७९१ रोजी ऑस्ट्रियाचा राजा दुसरा लेओपोल्ट व प्रशियाचा दुसरा फ्रीड्रिख विल्यम यांची पिल्निट्स येथे भेट होऊन त्यांनी जर सर्व यूरोप तयार असेल, तरच आपण फ्रान्समध्ये हस्तक्षेप करू असा फतवा काढला. ७ फेब्रुवारी १७९२ रोजी त्यांनी फ्रान्सविरुद्ध करार केला. फ्रान्सने ऑस्ट्रिया आणि प्रशियाविरुद्ध युद्ध पुकारले. विकल अशा फ्रान्सचा आपण पराभव करू ही भावना होती परंतु फ्रेंच क्रांतिकारी लष्कराने प्रशियाचा २० सप्टेंबर १७९२ रोजी व्हाल्मी येथे पराभव केला. प्रशियन सैन्याने लाजिरवाणी माघार घेतली. फ्रेंच सेनानी क्यूस्टीन याने माइन्त्स मेट्स, श्पायर आणि फ्रँकफुर्ट जिंकून घेतले. १७९३ मध्ये इंग्लंड, हॉलंड व स्पेन यांविरुद्ध फ्रेंचांनी युद्ध पुकारले. त्यांत सर्व आघाड्यांवर फ्रान्सचा विजय झाला. १७९५ मध्ये प्रशियाने फ्रान्सशी बाझेल येथे तह करून युद्ध संपुष्टात आणले. त्याचप्रमाणे सॅक्सनी, हॅनोव्हर, एसेन व कासेल या जर्मन राज्यांनी फ्रान्सशी तह केला. ह्या तहान्वये ऱ्हाईन नदीचा पश्चिम भाग अंतिम तहापर्यंत फ्रान्सकडे रहावा फ्रान्सने पूर्व भाग सोडून द्यावा व उत्तर जर्मनीने तटस्थ रहावे असे ठरले. पण गुप्त कलमान्वये प्रशियाने पश्चिम ऱ्हाईन किनारा फ्रान्सला देण्यास मान्यता दिली. त्याच्या बदल्यात प्रशियास पूर्व किनाऱ्यावरील छोट्या धर्म संस्थानांचा प्रदेश मिळावा असे ठरले. १७ ऑक्टोबर १७९७ रोजी नेपोलियन बोनापार्टशी केलेल्या तहात ऑस्ट्रियाने फ्रान्सला पश्चिम ऱ्हाईन किनारा देण्याचे कबूल केले. त्याबद्दल ऑस्ट्रियास जर्मनीचा काही भाग मिळणार होता. १८०१ मध्ये झालेल्या ऑस्ट्रिया-फ्रान्स यांच्यातील तहान्वये फ्रान्सने पश्चिम ऱ्हाईनचा प्रदेश ताब्यात घेतला आणि ऱ्हाईनपर्यंत आपली सरहद्द आणली. ह्यामुळे नुकसान झालेल्या राजांना जर्मनीचे प्रदेश देऊन नुकसानभरपाई देण्यात आल्याने जर्मनीचा सुमारे सु. ६५,२१८ चौ. किमी. चा प्रदेश आणि ३५,००,००० रहिवासी इतर राष्ट्रांच्या हाती गेले. १८०३ मध्ये ह्या तहाची अंमलबजावणी होऊन जर्मनीचे विभाजन करण्यात आले. ह्यात सर्व महत्त्वाच्या जर्मन राजांचा फायदा झाला परंतु उरलासुरला एकोपा नाहीसा होऊन व्यक्तिगत लालसा बळावली. ऑस्टरलिट्झच्या २ डिसेंबर १८०५ च्या लढाईनंतर प्रशियाने नेपोलियनशी करार करून ऱ्हाईनच्या पश्चिम किनाऱ्यावरील आपला सर्व भाग फ्रान्सला दिला व हॅनोव्हरचे राज्य मिळविले. २६ डिसेंबरच्या तहान्वये ऑस्ट्रियाने बव्हेरिया, वर्टम्बर्ग, बाडेन आदी जर्मन भागांना प्रदेश दिला. १२ जुलै १८०६ रोजी ऱ्हाईन संघ अस्तित्वात आला. ह्यामध्ये प्रिन्स प्रायमेट, बव्हेरिया, वर्टम्बर्गचे राजे तसेच बाडेन, एसेन, डार्मस्टाट इत्यादींचे अमीर-उमराव अंतर्भूत होते. पुढे ऑस्ट्रिया, प्रशिया, ब्रंझविक, एसेनचा इलेक्टर वगळता बाकी सर्व राजे ह्या संघात सामील झाले. नेपोलियन ह्या संघाचा संरक्षक असल्यानेबहुतेक सर्व जर्मन प्रदेश फ्रान्सच्या वर्चस्वाखाली गेला. पवित्र रोमन साम्राज्य बरखास्त झाले. १८०६–०७ मध्ये झालेल्या प्रशिया-फ्रान्स युद्धात फ्रान्सने प्रशियाचा येना आणि आउअरश्टेट येथे संपूर्ण पराभव केला. टिल्झिट तहान्वये प्रशियाने ऱ्हाईन आणि एल्ब यांच्यामधील सर्व प्रदेश फ्रान्सला दिला आणि इंग्लंडशी व्यापार बंद केला. येना आणि आउअरश्टेटच्या युद्धानंतर प्रशिया-जर्मनीत फ्रान्सविरोधाची प्रचंड लाट निर्माण झाली आणि खऱ्या अर्थाने जर्मन राष्ट्रवादाचा उदय झाला. टूगेंटबूंट नामक राष्ट्रीय संघटना निर्माण झाली. १८०९ मध्ये जर्मनीत झालेले उठाव नेपोलियनने कडकपणे मोडून काढले. ह्या नव्या राष्ट्रीय उद्रेकाचा परिणाम राजकीय घडामोडींवर होऊन प्रशिया-रशिया युतीने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले. १८ ऑक्टोबर १८१३ रोजी लाइपसिक येथे लढाई होऊन नेपालियनचा पराभव झाला. १८१५ मध्ये नेपोलियनचा पाडाव झाल्यावर व्हिएन्ना येथे भरलेल्या सर्वराष्ट्रीय परिषदेने जर्मनीची राजकीय पुनर्रचना केली. त्यामुळे ऑस्ट्रिया, प्रशिया वगैरे जर्मन भुभागांचा फायदा झाला. त्याबरोबरच बरखास्त झालेल्या पवित्र रोमन साम्राज्याची जागा घेण्यासाठी जर्मन संघ निर्माण करण्यात आला. ह्या संघात ३९ प्रमुख जर्मन भूप्रदेशांचा समावेश होता. इतर जर्मन भूप्रदेशांना दुय्यम स्थान देण्यात आले होते. जर्मन संघात ऑस्ट्रियन साम्राज्याला वरिष्ठ मान राहिला. तो टिकविण्याचे श्रेय मेटरनिखकडे जाते. प्रशियात लोकाभिमुख सुधारणा होऊन देश घटनात्मक राजवटीचा होईल, अशी उदारमतवाद्यांची कल्पना होती. परंतु हारडनबेर्खनंतरचे मंत्री पुराणमतवादी निघाले. फक्त बव्हेरिया, बाडेन आणि सॅक्सवायमारमध्ये उदारमतवादाचा पुरस्कार झाला.

उदारमतवादाचा पुरस्कार झपाट्याने होऊन नवी पिढी भारावून गेली परंतु मेटरनिखच्या दहशतवादी धोरणामुळे उदारमताला थारा मिळेनासा झाला. हा सर्वच काळ ऑस्ट्रिया आणि मेटरनिख यांच्या वर्चस्वाचा होता. जुलै १८१९ मध्ये बाखच्या हुकुमान्वये उदारमतपुरस्कारावर कडक निर्बंध घालण्यात आले.

प्रशियाने जकात संघटना निर्माण करून ऑस्ट्रियाच्या वाढत्या वर्चस्वाला आळा घालण्याचा प्रयत्न केला. १८२९ च्या मेपर्यंत ऑस्ट्रिया, हॅनोव्हर, ओल्डेनबर्ग, मेक्लनबुर्क सोडून जवळजवळ सर्व जर्मनीने जकात संघात प्रवेश केला. या संघाच्या निमित्ताने बहुतेक जर्मन संघाच्या राजांत आर्थिक एकोपा घडवून प्रशियाने ऑस्ट्रियावर मोठा विजय मिळविला. १८३० मधील उदारमतवादी वादळ अशा रीतीने नेस्तनाबूत केले गेले.

१८०० मध्ये प्रशियाच्या गादीवर चौथा फ्रीड्रिख विल्यम आला. त्याच्या २१ वर्षांच्या राजवटीत प्रशियात काही उदारमतवादी प्रयोग झाले परंतु हॅप्सबर्ग घराण्याच्या वर्चस्वामुळे त्याचे जर्मनीतील वर्चस्व कमी झाले. १८४८ च्या क्रांतिपर्वाचे परिणाम सर्व जर्मनीवर झाले. सर्व प्रयत्न मोडून काढले गेले. परंतु ह्या चळवळीने संसदीय पद्धतीखाली जर्मनीचे एकीकरण करण्याचा प्रयत्न केला. १८४९ मध्ये फ्रँकफुर्ट घटना तयार करून (२७ मार्च) सर्व जर्मनीचे एक संघराज्य निर्माण करण्यात आले. प्रशियाच्या राजास सम्राटपद देण्याचा प्रस्ताव रशियन राजाने मांडला पण तो अमान्य झाला.


एकीकरणाचेप्रयत्न:प्रशियाची महत्त्वाकांक्षा आणि जर्मन लोकांची इच्छा यांचा समन्वय होऊन जर्मन एकीकरणास प्रोत्साहन मिळाले. १८४८ च्या क्रांतिकारकांनी फ्रँकफुर्ट संसद स्थापून सर्व जर्मन उदारमतवाद्यांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ तयार केले. त्याला जवळजवळ सर्व जर्मन राजांची संमती होती. जर्मन संघाची संसद बरखास्त केली गेली. नव्या घटनेनुसार प्रशियाच्या राजास सम्राटपद द्यावे असे ठरले परंतु त्याने ते नाकारले. त्यामुळे हा लोकशाहीप्रधान प्रयोग फसला. यूरोपीय संघाची कल्पना त्यात मांडली. त्यात ऑस्ट्रियाचाही समावेश होता. त्याबरोबरच अंतर्गत संघराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न झाला. त्यालाच प्रशियन संघ असेही म्हणतात. त्यात प्रशिया, सॅक्सनी आणि हॅनोव्हर सामील झाले. प्रशियाच्या भीतीने अनेक छोट्या जर्मन भूप्रदेशांच्या सत्ताधाऱ्यांनी मान्यता दिली. एर्फुर्ट येथे राष्ट्रीय सभेची बैठक बोलावण्यात आली परंतु आपले वर्चस्व कमी होईल या भीतीने ऑस्ट्रियाने १८१५ च्या जर्मन संघास उचलून धरले. जेव्हा एसेनच्या इलेक्टरने आपल्या पार्लमेंटविरुद्ध जर्मन संघ-सभेकडे मदत मागितली, तेंव्हा एसेन प्रशियन संघाचा सभासद आहे, ह्या आधारावर प्रशियानेही त्यास मदत म्हणून एसेनमध्ये फौज पाठविली. ऑस्ट्रियन फौजा जर्मन संघाच्या वतीने हजर झाल्या. रशियाने आस्ट्रियास मदत देण्याचे कबूल केले. तेव्हा प्रशियन सैन्याने माघार घेतली आणि ऑलॉमोत्स येथील बैठकीत प्रशियाने प्रशियन संघ बरखास्त करून जुन्या जर्मन संघास मान्यता दिली. प्रशियन इतिहासकार ह्यास ‘ऑलॉमोत्सचा अपमान’ असे संबोधतात. असा रीतीने १८५० मध्ये जर्मनीच्या एकीकरणातील पहिले पर्व संपले.

ऑलॉमोत्सनंतर मात्र जर्मन एकीकरणाचे प्रयत्न चालू राहिले. जर्मन जकात संघात प्रवेश करण्याचा ऑस्ट्रियाचा प्रयत्न प्रशियाने हाणून पाडला. त्याचबरोबर जकात इतकी कमी करण्यात आली की, ऑस्ट्रियन उद्योगधंद्यांवर त्याचा विपरीत परिणाम घडू लागला. १८५३ मध्ये हॅनोव्हर, ब्रंझविक आणि ओल्डेनबर्ग जकात संघात सामील झाले. ऑस्ट्रियाखेरीज सर्व जर्मनी आर्थिक दृष्ट्या एकत्र करण्यात आला. ह्या काळात प्रशियाचे अंतर्गत धोरण मात्र दडपशाहीचे होते. सर्व उदारमतवाद्यांचा निःपात करण्यात आला. १८५८ मध्ये फ्रिड्रिख विल्यमचा भाऊ पहिला विल्यम हा प्रथम पालक म्हणून व १८६१ नंतर राजा म्हणून प्रशियन गादीवर आला. फ्रान्सच्या ऱ्हाईन किनाऱ्याच्या धोरणाला शह म्हणून लष्करी सुधारणा घडवून आणण्याची त्याची योजना पार्लमेंटने धुडकावून टाकली. त्याने प्रशियाचा फ्रान्समधील राजदूत ⇨ऑटो फॉन बिस्मार्क  यास मंत्रिमंडळ बनविण्यास पाचारण केले (सप्टेंबर १८६२). १८९० पर्यंतचा त्याच्या मंत्रिपदाचा काळ हा बिस्मार्क-पर्व म्हणून ओळखला जातो. ह्या काळात प्रशियाच्या नेतृत्वाखाली जर्मनीचे एकीकरण होऊन १८७१ मध्ये जर्मन राज्य अस्तित्वात आले.

जर्मनीमध्ये एकसूत्रीपणा येऊन समाजवादाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झालेला दिसतो. बिस्मार्कने वेगवेगळ्या पक्षांशी वेळोवेळी संगनमत करून आपले वर्चस्व कायम ठेवले. परंतु १८९० मध्ये ⇨दुसरा विल्यम कैसर  गादीवर आल्यावर त्याचे व बिस्मार्कचे पटेनासे झाले. १८ मार्च १८९० रोजी बिस्मार्कने राजीनामा दिला.

१८९० ते १९१४ हा कालखंड सर्व दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या काळात जर्मनीने वसाहतींकडे लक्ष वळविले आणि नौदलाच्या वाढीस सुरुवात केली. दुसरा विल्यम कैसर याने कामगारांसाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या. एकंदरीत धोरण कामगार कल्याणाचे होते. ह्या धोरणामुळे कामगार समाजवादापासून दूर जातील, असे त्याला वाटले.

बिस्मार्कच्या तहामुळे जर्मनीच्या आंतरराष्ट्रीय संबंधात अनेक गोंधळ निर्माण झाले होते. फ्रान्स व रशिया जर्मनीपासून दूर जाऊ लागले होते. दुसऱ्या कैसरच्या काळात हे संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याचे अनेक प्रयत्न झाले. जर्मनीने इंग्लंडशी वसाहत करार करून, इंग्लंडला पूर्व आफ्रीकेतील बराचसा मुलूख देऊन हेल्गोलँडचे बेट घेतले. ह्या निरुपयोगी बेटाच्या व्यापाराचे केवळ इंग्लंडशी संबंध सुधारण्याची इच्छा स्पष्ट झाली. रशियाने फ्रान्सची बाजू घेतल्यामुळे ६ मे १८९१ रोजी त्रिराष्ट्र-मैत्री-करार पुन्हा एकदा बदलून जर्मनीने इतरांच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी स्वीकारली. फ्रान्स व रशिया यांचे संबंध दिवसेंदिवस घनिष्ठ होऊ लागले. १८९३ मध्ये जर्मन लष्करी कायदा संमत झाल्यावर परस्परसंबंध बळकट करणे फ्रान्स व रशिया यांस आवश्यक वाटले. १८९३ च्या डिसेंबरमध्ये रशिया-फ्रान्स यांच्यात (जर्मनीविरुद्ध) लष्करी करार झाला. परंतु १८९४ च्या मार्चमध्ये रशियाने जर्मनीशी जकात करार करून संबंध टिकविण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे १८९५ च्या एप्रिलमध्ये जपानवर दबाव आणण्यात जर्मनीने रशियास मदत केली. ऑगस्टमध्ये जर्मन सम्राट व सॉल्‌झबरी यांची भेट होऊन पूर्व समस्येवर चर्चा झाली. जर्मनांचा गैरसमज झाल्याने ह्या भेटीचा परिणाम विपरीत झाला. १८९७ मध्ये जर्मनीने चीनचा काही प्रदेश ताब्यात घेऊन आपले वसाहतवादाचे धोरण स्पष्ट केले. २८ मार्च १८९८ रोजी जर्मनीने पहिला नाविक कायदा संमत केला. त्या अन्वये नाविक दल वाढवून इंग्लंडशी टक्कर देण्याची ईर्षा व्यक्त झाली. इंग्लंडची प्रतिक्रिया प्रतिकूल असली, तरी धोरण समझोत्याचे होते. जर्मनी-इंग्लंड यांतील आफ्रिकेतील पोर्तुगीज वसाहतींच्या समझोत्यामुळे अनेक गैरसमज झाले. आपल्या कडक धोरणास फळे येऊ लागल्याचा विश्वास जर्मनीस उत्पन्न झाला. २५ नोव्हेंबर १८९९ रोजी तुर्कस्थानने जर्मनीस बगदाद रेल्वे बांधण्याचे अधिकार दिले. जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, रशिया हे स्पर्धक होते. जर्मनीच्या मुत्सद्याने सर्वांवर मात केली. त्यामुळे इतर तिन्ही राष्ट्रांत जर्मनीविषयी वैरभाव निर्माण झाला. १९०० नंतर जर्मनी व इंग्लंड यांचे संबंध अधिक बिघडले. चीनमधील वसाहतीसंबंधात ते सुधारतील असा अंदाज होता, परंतु तो चुकला. जर्मनीचे परराष्ट्रधोरण फ्रान्स व इंग्लंड यांचे परस्परविरोधी संबंध लक्षात घेता दोघांशी मैत्री ठेवणे या पद्धतीने आखले होते. वसाहतीचे धोरण, नाविक दलाची वाढ व बाल्कन प्रश्नात ऑस्ट्रियाचे धोरण यांमुळे इंग्लंडशी स्नेहसंबंध दुरावले. वसाहतीच्या धोरणातील वाढत्या यशाबरोबरच इतर वसाहतवादी राष्ट्रांचे जर्मनीशी वैर वाढू लागले. प्रबळ इच्छा असूनही जर्मनीला आपले संबंध इतर राष्ट्रांशी मैत्रीचे ठेवता आले नाहीत. जर्मन लोकांची साम्राज्याची इच्छा आणि जर्मन मुत्सद्यांचे धरसोडीचे धोरण, ह्याची परिणती पहिल्या महायुद्धात झाली. प्रथमतः विजय मिळूनही १९१७ नंतर जर्मनीची पीछेहाट झाली.

सम्राट कैसर ह्याने ९ नोव्हेंबर १९१८ रोजी राज्यत्याग केल्याची घोषणा प्रिन्स मॅक्सिमिलिअनने बर्लिनमध्ये केली आणि जर्मनीतील राजसत्ता संपुष्टात आली. जर्मनीमध्ये प्रजासत्ताकाची घोषणा करण्यात आली. रोझा लक्सेंबर्ग आणि कार्ल लीपकनेख्ट यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय घटना परिषद बोलावण्याची  कल्पना मंजूर झाली. बर्लिनमध्ये १९१९ च्या जानेवारीत झालेल्या दंगलीत लक्सेंबर्ग व लीपकनेख्ट यांचा वध झाला. १९ जानेवारीत निवडणुका होऊन ६ फेब्रुवारीस घटना परीषदेची बैठक वायमार येथे भरली व फ्रीड्रिख एबर्ट याची जर्मन प्रजासत्ताकाचा पहिला अध्यक्ष म्हणून निवड झाली. ह्याच सुमारास बर्लिनमध्ये कम्युनिस्टांनी बंड केले. ते मोडून काढण्यात आले. तसेच बव्हेरियात सोव्हिएट प्रजासत्ताकाची स्थापना झाली, तीही मोडून टाकण्यात आली. ऱ्हाईनलँड प्रजासत्ताक फ्रान्सच्या चिथावणीने निर्माण झाले. नागरिकांच्या विरोधामुळे ते कोलमडून पडले. २३ जून १९१९ रोजी जर्मनीने व्हर्सायचा तह मान्य केला. ३१ जुलै १९१९ रोजी वायमार घटना अंमलात आली. कम्युनिस्टांचे वर्चस्व आणि त्यास वाढता विरोध ह्या दोन प्रेरणा स्पष्ट दिसू लागल्या. मार्चमध्ये रुर प्रांतात बंड झाले. ते मोडून काढण्यात आले. वायमार घटनेनुसार जर्मनी प्रजासत्ताक राष्ट्र झाले. अध्यक्षाचीनिवडणूकराष्ट्रीयपातळीवरहोऊनत्याचीमुदतसातवर्षांचीहोती. अध्यक्षाने चॅन्सलरची व चॅन्सलरने मंत्रिमंडळाची नेमणूक करावी. मंत्रिमंडळास संसदेचा पाठिंबा असावा. संसदेत अठरा प्रांतांचे प्रतिनिधी असावेत. कुठल्याही प्रांतास /पेक्षा अधिक प्रतिनिधी असू नयेत. निवडणुका प्रांतिक अथवा जिल्हा पातळीवर व्हाव्यात असे ठरले.


वायमार घटनेस कार्य करण्याची योग्य संधीच मिळाली नाही. वायमारच्या मुत्सद्यांवर व्हर्सायचा तह मान्य केल्याबद्दलचा राग होता. त्यामुळे घटनाविरोधी मनोभूमिका तयार होती. व्हर्सायच्या तहाने जर्मनीची केलेली नाकेबंदी, तहातील अपमानास्पद अटी व फ्रान्सच्या सूडभावनेने ह्यावर केलेला कळस, ह्यांमुळे लष्करी पक्षाची जोपासना होऊ लागली. बिस्मार्कने निर्माण केलेले जर्मन राष्ट्र धुळीस मिळाले व त्यास समाजवादी लोकपक्ष, सेंटरपक्ष वगैरे राजकारणी पक्ष कारणीभूत आहेत, अशी हाकाटी करण्यात आली. गुस्टाव्ह श्ट्रेझमान याने आपल्या मुत्सद्दीपणाने व्हर्साय तहातील अनेक अटी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जर्मनीस युद्धदंड भरावयास व अंतर्गत आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी परदेशी बाजारपेठांची आवश्यकता आहे, हे जाणून अमेरिकेची संयुक्त संस्थाने व इंग्लंड यांच्याशी याने चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. १९२३ ते १९२९ च्या प्रत्येक सरकारात श्ट्रेझमानचा समावेश होता. ११ जानेवारी १९२३ रोजी फ्रेंच व जर्मन फौजांनी रुर प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणात श्ट्रेझमानने आपली बाजू प्रभावीपणे मांडली आणि १९२५ पर्यंत परकी सेना ह्या प्रांतातून परत गेल्या. १९२४ मध्ये जर्मनीने डॉझ योजना मान्य केली. तीनुसार जर्मनीमधील राष्ट्रीय बँकेची पुनर्रचना करण्यात आली. जर्मनीस इतर देशांतील पैसा कर्जाऊ द्यावा असे ठरले. १९२५ मध्ये श्ट्रेझमानने लोकार्नो करारास जर्मनीची संमती मिळविली. त्या करारान्वये फ्रान्स, बेल्जियम व जर्मनी यांनी आपल्यामधील सीमारेषांचे पालन करण्याचे अभिवचन दिले आणि जर्मनीने पोलंड, चेकोस्लोव्हाकिया, बेल्जियम, फ्रान्स यांच्यात वेगवेगळे लवाद-करार केले. १९२६ च्या मार्चमध्ये जर्मनीने राष्ट्रसंघात प्रवेश मिळविला. २८ फेब्रुवारी १९२५ रोजी जर्मन प्रजासत्ताकाचे अध्यक्ष एबर्ट मृत्यू पावले. त्या जागी फील्ड मार्शल हिंडनबुर्ख यांची निवड झाली. जर्मनीच्या पुनरुत्थानाची ही सुरुवात होय. १९२७ मध्ये हिंडनबुर्खने जर्मनी युद्धास जबाबदार होती, हे म्हणणे साफ नाकारले. तत्पूर्वी नॅशनल सोशॅलिस्ट पार्टी (नाझी) ने बव्हेरियात उठाव करण्याचा प्रयत्न केला तो अयशस्वी झाला. तेव्हापासूनच ⇨ हिटलरचा उदय झाला. १९२९ मध्ये श्ट्रेझमानचा मृत्यू झाला. १९३० च्या निवडणुकांत हिटलरच्या नाझी पक्षास बहुमत मिळाले. त्या पक्षाचा व्हर्सायच्या तहास विरोध असल्याने त्याची लोकप्रियता वाढली. कम्युनिस्टविरोध हेही एक तत्त्व होतेच. एकसूत्रीपणा आणण्यासाठी म्हणून नाझी पक्षाने दहशतवादास सुरुवात केली. १९३२ मध्ये त्यावरील निर्बंध उठविल्यानंतर नाझी पक्षाची वाढ झपाट्याने झाली. १९३३ च्या जानेवारीत हिंडनबुर्खने हिटलरला चॅन्सलर नेमले. नाझी कामगार संघटनेने कामगारांमध्ये वंशभेदाच्या आणि राष्ट्रीय प्रश्नांवर भावना भडकवून वर्चस्व मिळविले. १९२९ पासूनच्या जागतिक आर्थिक मंदीचे दुष्परिणाम जर्मनीस मोठ्या प्रमाणावर भोगावे लागले. रुर, झारलँड, ऱ्हाईनलँड हे प्रांत परकीयांच्या हाती गेल्याने, तसेच खंडणीचा भार वाढल्याने, सामान्य जनता थोडी विरोधी बनली होती. व्हर्सायचा तह हा राष्ट्रीय अपमान आहे, ही भावना नाझींनी दृढ केली. हिटलरने कम्युनिस्ट पक्ष बेकायदा ठरवला. कामगारांचे नेतृत्व एकट्या नाझी पक्षाकडे आले. १९३३ च्या मार्चच्या निवडणुकांत नाझींचे बहुमत झाले. १३ मार्चला संसदेने सरकारला हुकूमशाही अधिकार देणारा कायदा संमत केला. त्या अन्वये १ एप्रिल १९३७ पर्यंत सरकारला अनिर्बंध अधिकार देण्यात आले. ह्या नाझी क्रांतीचे परिणाम फार दूरगामी झाले. जर्मनीत नाझी हा एकच पक्ष अस्तित्वात राहिला. [→ नाझीवाद].

१९३३ च्या मेमध्ये डॅन्झिग शहराच्या निवडणुकीत नाझींना बहुमत मिळाले. ऑक्टोबरमध्ये जर्मनी राष्ट्रसंघाच्या बाहेर पडली. जर्मनीचे स्वतंत्र परराष्ट्रीय धोरण सुरू झाले. २ ऑगस्ट १९३४ रोजी हिंडनबुर्खचा मृत्यू झाला. १९ ऑगस्ट रोजी हिटलरची अध्यक्षपदी निवड झाली. झारलँडमध्ये जर्मनीशी एकीकरणाच्या बाजूने निकाल लागला. हिटलरचे महत्त्व वाढले. १६ मार्च १९३५ रोजी हिटलरने व्हर्सायचा तह झुगारून देऊन लोकार्नो करारही धुडकावून लावला. मध्यंतरात इंग्लंडशी नाविक करार करून इंग्लंडच्या ३५ टक्के आपले दल ठेवण्याची कबुली दिली. त्यापूर्वी जर्मनी व ऑस्ट्रिया एकत्र आणण्यासाठी नाझी पक्षाने कट करून चॅन्सलर डोलफूस याचा खून केला परंतु इटलीच्या धोरणामुळे जर्मनीस ऑस्ट्रिया बळकावता आला नाही. पुनश्च लष्करीकरणास प्रारंभ झाला. १६ मार्च १९३५ च्या कायद्यान्वये सक्तीचे लष्करी शिक्षण देण्यास सुरुवात झाली. १९३८ मध्ये जर्मनीजवळ प्रबळ सेना, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व सुसज्ज विमानदळ होते.

१९३८ च्या मार्चमध्ये जर्मनीने ऑस्ट्रिया जिंकून आपल्या प्रदेशास जोडला. चेकोस्लोव्हाकियातील जर्मनांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने जर्मनीने तेथे हस्तक्षेप करण्यास प्रारंभ केला. सप्टेंबरमध्ये सुडेटन भागातील जर्मनांवर वर्चस्व प्रस्थापिले. १९३९ च्या मार्चमध्ये बोहीमिया व मोरेव्हिया हे प्रदेश व्यापले. पोलंडशी अनधिकृत युद्ध सुरू केले. ३ सप्टेंबर १९३९ रोजी पोलंडचे संरक्षक ह्या नात्याने इंग्लंड व फ्रान्स ह्यांनी जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धास प्रारंभ झाला.

हिटलरच्या आंतरराष्ट्रीय धोरणानुसार जर्मनीने रशियाशी तह केला होता त्यामुळे प्रारंभी जर्मनीस फक्त फ्रान्स व इंग्लंड ह्याच दोन प्रबळ राष्ट्रांशी युद्ध करावे लागले. वरवर पाहता बर्लिन–रोम–टोकिओ मैत्री लष्करी दृष्ट्या अत्यंत प्रभावी होती परंतु जसे युद्ध रेंगाळू लागले, तशी ह्या मित्रराष्ट्रांची आर्थिक व अन्नविषयक परिस्थिती बिघडू लागली. फ्रान्स व इंग्लंड ह्यांना त्यांच्या वसाहतींमुळे जवळजवळ सर्व जगातून अन्न व लष्कर पुरवठा होत होता. अमेरिकेची सहानुभूती इंग्लंडकडेच असल्याने इंग्लंडला युद्धसामग्रीचाही तुटवडा पडला नाही. फ्रान्सचा जरी संपूर्ण पराभव झाला, तरीही २२ जून १९४४ रोजी रशियावर स्वारी करून जर्मनीने पुर्वेकडे नवी आघाडी उघडली. जर्मनीचा दोस्त जपान ह्याने ७ डिसेंबर १९४१ रोजी पर्ल हार्बरवर हल्ला करून अमेरिकेशी युद्ध सुरू केले. ११ डिसेंबर रोजी जर्मनीने अमेरिकेशी युद्ध पुकारले. अमेरिकेकडून सतत वाहणारा युद्धसामग्रीचा ओघ बंद करणे जर्मनीस अशक्य झाले. ६ जून १९४४ रोजी दोस्त राष्ट्रांच्या फौजा नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर उतरल्या. तेथून पूढे जर्मनीचा पराभव झपाट्याने झाला. १९४५ च्या मेमध्ये दोस्त राष्ट्रांनी जर्मनीचा आणि बर्लिन शहराचा ताबा घेतला. 

हिटलरने ३० एप्रिल १९४५ रोजी आत्महत्या केली. तत्पूर्वी ॲडमिरल डनिट्‌स ह्याला त्याने आपला वारसदार नेमले होते. ८ मे रोजी इंग्लंड व अमेरिका आणि ९ मे रोजी रशिया यांनी युद्ध संपल्याचे जाहीर केले. जर्मनीच्या शरणागतीनंतर तिची राजकीय व्यवस्था लावणे महत्त्वाचे होते. दोस्त राष्ट्रांच्या नियामक समितीत आयझनहौअर, फील्ड मार्शल माँटगोमेरी आणि मार्शल झूकॉव्ह यांचा समावेश करण्यात आला. जर्मनीचे चार भाग पाडण्यात आले. ते अमेरिका, रशिया, इंग्लंड व फ्रान्स यांनी व्यापले. आपापल्या भागात सेनानींनी संपूर्ण अधिकार हाती घेतले. तरीही पॉट्‌सडॅम करारान्वये (१७ जुलै ते २ ऑगस्ट १९४५) हे विभक्तीकरण नव्हते. जर्मनीच्या सीमा ३१ डिसेंबर १९३७ च्याच कायम ठेवल्या. २५ फेब्रुवारी १९४७ रोजी दोस्तांनी प्रशियाचे राष्ट्र बरखास्त केले. त्या जागी सॅक्सनी, आनहाल्ट, ब्रांडनबुर्क, मेक्लनबुर्क व थुरिंजिया ही राज्ये निर्माण केली.

बर्लिन शहर चारी दोस्तांनी व्यापले. १ जुलै १९४५ रोजी अमेरिकन, ब्रिटिश व फ्रेंच फौजांनी तेथे प्रवेश केला. ११ जुलैला दोस्तांनी एक बर्लिन नियामक समिती स्थापिली. १९ जुलै १९४८ रोजी सोव्हिएट प्रतिनिधींनी यातून अंग काढून घेतले. पूर्व बर्लिन सोव्हिएट वर्चस्वाखाली राहिले आणि पश्चिम बर्लिन पश्चिम जर्मनीकडे राहिले. जर्मनीची दोन स्वतंत्र राष्ट्रे झाली.

देशपांडे, अरविंद

संदर्भ : 1. Flenley, Ralph, Modern German History, Londan, 1964.

            2. Simon, W. M. Germany, New York, 1969.

            3. Winch, Michael, Introducing Germany, London, 1967.