ह्यूरन सरोवर : अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा या देशांच्या सरहद्दीवर असलेल्या पंच महासरोवरांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे सरोवर. ह्यूरन सरोवराच्या पश्चिमेस अ.सं.सं.चे मिशिगन राज्य, उत्तरेस व पूर्वेस कॅनडाचा आँटॅरिओ प्रांत आहे. कॅनडा व अ.सं.सं.ची आंतरराष्ट्रीय सीमा या सरोवरातून जाते. याचे क्षेत्रफळ ५९,६०० चौ. किमी. असून त्यांपैकी ३६,००० चौ.किमी. कॅनडामध्ये व २३,६०० चौ. किमी. अ.सं.सं.मध्ये आहे. सेंट मेरी नदीद्वारे सुपीरिअर सरोवरातील व मॅकिनॅक सामुद्रधुनीद्वारे मिशिगन सरोवरातील पाणी ह्यूरन सरोवरात येते. तसेच सेंट क्लेअर नदी, सेंट क्लेअर सरोवर व डिट्रॉइट नदी यांद्वारे ह्यूरन सरोवरातील पाणी ईअरी सरोवरात वाहत जाते. ह्यूरन सरोवर सस.पासून १७६ मी. उंचीवर आहे. याची ईशान्य-नैर्ऋत्य कमाल लांबी ३३१ किमी. व कमाल रुंदी सु. २९५ किमी. आहे. या सरोवराची सर्वांत जास्त खोली २२९ मी. असून सरासरी खोली ६० मी. आहे. याचे जलवाहनक्षेत्र सु. १,३३,९०० चौ. किमी. असून यामध्ये सरोवराच्या पृष्ठभागाचा समावेश नाही.

ह्यूरन सरोवरात इतर सरोवरांपेक्षा जास्त म्हणजे सु. ३०,००० बेटे आहेत. सरोवरांतील बेटांपैकी अ.सं.सं.च्या मिशिगन राज्यात समाविष्ट असणारे मॅकिनॅक बेट व कॅनडाच्या आँटॅरिओ प्रांतातील मॅनिटूलिन बेट ही प्रमुख व मोठी आहेत. मॅनिटूलिन बेट हे गोड्या पाण्याच्या सरोवरातील सर्वांत मोठे बेट असल्याचे मानतात.

यूरोपियनांनी पाहिलेल्या पंच महासरोवरांपैकी हे पहिले सरोवर आहे. एत्येन ब्रूल हा फ्रेंच समन्वेषक जॉर्जियन उपसागरात सु. १६१० पूर्वी आला होता. तद्नंतर सॅम्यूएल दे कॅम्पलन १६१५ मध्ये आला होता. त्याने यास ला मेर ड्यूस (गोड्या पाण्याचा समुद्र) असे म्हटले होते.नंतर स्थानिक ह्यूरन इंडियनांच्या नावावरून याचे ह्यूरन असे नामकरणझाले आहे. झाक मार्केत या फ्रेंच धर्मगुरू व समन्वेषकाने १६७१ मध्ये मॅकिनॅक सामुद्रधुनीवरील सेंट इग्नस येथे मिशनची स्थापना केली होती. ल्यूई ज्यूल्यट व रॉबर्ट काव्हल्ये हे फ्रेंच समन्वेषक अनुक्रमे १६६९व १६७९ मध्ये ह्यूरन सरोवरात आले होते.

ह्यूरन सरोवर परिसरात युरेनियम, सोने, चांदी, तांबे, सैंधव (खनिज मीठ), चुनखडक इ. खनिजे सापडतात. तसेच किनारी भागात स्प्रूस, पाइन, फर, ओक, पर्च, बीच, मॅपल इ. प्रकारचे वृक्ष तसेच हरिण, अस्वलइ. प्राणी व अनेक पक्षी आढळतात. सरोवरात पाइक, ट्राउट, सॅमन, व्हाईट फिश, पर्च, बास इ. प्रकारचे जलचर आहेत.

याच्या आसमंतात विविध निर्मितिउद्योग, खाणकाम, शेती, मासेमारी, वनोद्योग, दूध संकलन व्यवसाय व गुरे पाळणे इ. उद्योग चालतात. सेंट क्लेअर नदीचा पूर्व किनारा हा कॅनडातील केमिकल व्हॅली म्हणून ओळखला जातो. येथे तेल शुद्धीकरण व खनिजतेल रसायन प्लँट आहेत. जलवाहतुकीच्या दृष्टीने या सरोवरास महत्त्व आहे. हे सरोवर ‘सेंट लॉरेन्स सी वे’ चा एक भाग आहे. तसेच सुपीरिअर व ह्यूरन सरोवरांदरम्यानच्या सॉल्ट स्टी मारी (सू कॅनॉल्स) या कालव्यात पाच वाहतूक मार्ग आहेत. त्यांपैकी चार अ.सं.सं.चे व एक कॅनडाच्या हद्दीत आहे. प्रत्येक मार्गात एक जलपाश आहे. यामुळे सेंट मेरी नदीप्रवाहात असलेल्या धबधब्यांचा अडथळा दूर होऊन जलवाहतुकीस साहाय्य होते. येथून लोह-पोलाद, अन्नधान्ये, चुनखडक, कोळसा इत्यादींची वाहतूक होते. हिवाळ्यात विशेषतः डिसेंबर व मे मध्ये वादळी वाऱ्यामुळे जलवाहतूक धोकादायक असते. ९ नोव्हेंबर १९१३ रोजीच्या वादळात १७ जहाजांचे नुकसान झाले व २८५ लोक दगावले होते.

ह्यूरन किनारी रॉकपोर्ट, रॉजर्झ सिटी, शिबॉइग्न, ॲल्पिना, बे सिटी, हार्बर बीच ही अ.सं.सं.च्या मिशिगन राज्यातील व कॉलिंगवुड, मिडलँड, टिफन पोर्ट, मेनिकोल ही कॅनडाच्या आँटॅरिओ प्रांतातील प्रमुखबंदरे, फ्लिंट आणि सॅग्नॉ ही मिशिगन राज्यातील व सार्नीआ हे आँटॅरिओेतील प्रमुख औद्योगिक शहरे आहेत. सरोवराच्या किनारी भागात राष्ट्रीय उद्याने, अनेक उपाहारगृहे व विश्रामगृहे आहेत. त्यामुळे अनेक पर्यटक याला भेट देतात.

गाडे, ना. स.