जॉर्जिया–१ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी दक्षिण अटलांटिक विभागातील एक राज्य. लोकसंख्या ४५,८९,५७५ (१९७०). क्षेत्रफळ १,५२,४८९ चौ. किमी. पैकी १,५५९ चौ. किमी. पाण्याखाली. ३०° २१’ उ. ते ३५° उ. आणि ८०° ५१’ प. से ८५° ३६’ प. यांदरम्यान. विस्तार पूर्व-पश्चिम ५१२ किमी., दक्षिणोत्तर ४०० किमी. याच्या दक्षिणेस फ्लॉरिडा, पश्चिमेस ॲलाबॅमा, उत्तरेस टेनेसी व नॉर्थ कॅरोलायना, पूर्वेस साउथ कॅरोलायना ही राज्ये आणि पूर्व सीमेच्या दक्षिण भागाला अटलांटिक महासागर आहे.

भूरचना : राज्याच्या ईशान्येस शेजारच्या टेनेसी राज्यातून ॲपालॅचिअन पर्वताची ब्‍ल्यू रिज रांग आलेली आहे. नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने एकाआड एक डोंगररांगांचा व दऱ्यांचा प्रदेश १५५ ते १,४५७ मी. पर्यंत उंचीचा असून त्यात राज्यातील सर्वोच्च (१,४८३ मी.) शिखर ब्रासटाउन बॉल्ड आहे. अगदी वायव्येस कंबर्लंडचे पठार व त्यावरील लुकआउट व सँड डोंगर सु. ६१० मी. उंचीचे आहेत. हा प्रदेश व ब्‍ल्यू रिज यांमधून ऊस्टनॉला नदी वाहते. तिला रोमजवळ एटवा मिळते व त्यांमिळून झालेली कूसा पुढे मेक्सिकोच्या आखातावरील मोबाइल उपसागरास मिळते. अटलांटाच्या पूर्व ईशान्येस २२ किमी.वर जगातील सर्वांत मोठा ग्रॅनाइटी अवशिष्ट शैल ‘स्टोन मौंटन’ आहे. कंबर्लंड पठार व ब्‍ल्यू रिजचा अगदी वायव्य भाग हे टेनेसी नदीच्या खोऱ्यात येतात. या प्रदेशाला दक्षिणेस समांतर सरासरी १५५ ते ३१० मी. उंचीचे डोंगरपायथ्याचे ऊर्मिल पठार असून त्यावर टेकड्या आणि नद्यांच्या अरुंद, खोल दऱ्या आहेत. पठाराच्या दक्षिणेस राज्याच्या ६०% क्षेत्रफळाचा किनारी मैदानी मुलूख, समुद्रसपाटीपासून १५५ मी.पर्यंत उंचीचा आहे. राज्याच्या आग्‍नेय कोपऱ्यात देशातील एक अतिविस्तीर्ण दलदल ‘ओकफनोकी स्वॅम्प’ आहे. तेथे वन्यजीवन संरक्षित प्रदेश आहे. साउथ कॅरोलायनाच्या सरहद्दीवरील सॅव्हाना, ओकोनी व ओकमल्गी मिळून झालेली ॲल्टामाहॉ, आग्‍नेयीकडील सटिला, नैर्ऋत्य कोपऱ्‍यात मिळणाऱ्या फ्लिंट आणि चट्टाहूची या राज्यातील प्रमुख नद्या होत. अटलांटिकला मिळणाऱ्या नद्या सखल प्रदेशात उतरतात, तेथपर्यंत मुखांपासून नौकानयनसुलभ आहेत. ही मर्यादा म्हणजेच प्रपातरेषा होय. कित्येक नद्या अडवून ठिकठिकाणी लहानमोठे जलाशय तयार केले आहेत. महासागर किनाऱ्यावर अनेक बेटे असून त्यांपैकी सात मोठी आहेत.

मृदा : पर्वतभागात निकृष्ट, पठारावर रेतीमिश्रित, लाल व किनारी मैदानात रेतीमिश्रित चिकण हे मातीचे प्रकार आढळतात.  

खनिजे : डोंगराळ प्रदेशात उच्च प्रतीचा संगमरवरी, ग्रॅनाइट आणि चुनखडी दगड (गेरू, काव) असून ऑकर या रंगद्रव्याचा जगातील सर्वांत मोठा साठा आहे. मध्यभागात देशातील ७०% चिनी माती आहे. अन्यत्र अल्प प्रमाणात कोळसा, लोह, सोने, बॅराइट, मँगॅनीज, अभ्रक, ॲस्बेस्टॉस व बॉक्साइट मिळते. 

हवामान : उबदार, समशीतोष्ण, पर्वतप्रदेशात थंड असून जानेवारी तपमान डोंगराळ भागात ४·४° से., सखल भागात १२·२° से., जुलै महिन्यात २३·३° से. ते २७·७° से., सरासरी १४° से. ते २०° से. असते. वार्षिक सरासरी पर्जन्य १२५ सेंमी. आहे. पर्वतप्रदेशात हिम पडते.  

वनस्पती : राज्याची ६७% भूमी वनाच्छादित असून वनस्पतींच्या २५० जाती आहेत. ९०% वनस्पती व्यापारोपयोगी आहेत. मुख्य वृक्षराजी पाइन, ओक व सायप्रस आहेत. सर्वत्र अनेक जातींची फुलझाडे बहरलेली दिसतात. चेरोकी रोझ हे पिवळ्या गाभ्याचे छोटेसे पांढरे फूल राज्यफूल आहे.  

प्राणी : अमेरिकेच्या समशीतोष्ण प्रदेशातील ठराविक पशुपक्षी येथे असून, दलदलीत सुसरी, सागरकिनारी कासवे, कवचीचे जलचर, नद्यांत विविध खाद्योपयुक्त मासे आहेत. अनेक पाणपक्षी, अस्वले, हरणे, ऑटर, वीझल, बीव्हर, ससा, खोकड इ. प्राणी आहेत. 

इतिहास व राज्यव्यवस्था : मातीच्या उंच ढिगांखालच्या समाधी या प्रदेशातील प्रागैतिहासिक आदिवासींच्या वस्तीचे पुरावे देतात. नंतरच्या काळात चेरोकी व क्रीक जमातींची ही भूमी होती. १५४० मध्ये द सोनोने हा प्रदेश ओलांडला. १५६५ साली द अविलेस याने इकडील सबंध प्रदेशाच्या संरक्षणार्थ फ्लॉरिडात सेंट कॅथरिन्झ बेटावर किल्ला बांधला. त्याच्या आसपास अटलांटिक किनाऱ्यावरच्या इतर कित्येक बेटांवर फ्रान्समधून धर्मच्छळाला कंटाळून आलेले ह्युजेनॉट लोक स्थायिक झाले. नंतर इंग्रजांनी १६२९ मध्ये मिळालेल्या कॅरोलायनाच्या सनदेखाली जॉर्जियावरही हक्क सांगितला. आपले हितसंबंध सांभाळण्यासाठी इंग्रजांनी ॲल्टामाहॉ नदीमुखाशी सध्याच्या डेरीएनजवळ फोर्ट किंवा जॉर्ज किल्ला बांधला. इंग्‍लंडच्या दुसऱ्या जॉर्ज राजाने ऑगलथॉर्प नावाच्या परोपकारी समाजसुधारकास व एका विश्वस्त मंडळास जॉर्जिया वसाहत स्थापण्याची सनद दिली व १७३३ मध्ये जॉर्जिया वसाहतीची स्थापना झाली. इंग्‍लंडमधील गरीब आणि छळलेल्या लोकांना इकडे बसविण्याची ऑगलथॉर्पची योजना होती. लवकरच इकडे स्कॉटलंड, जर्मनी आणि इतर यूरोपीय देशांचे आणखी वसाहतकरी आले. १७४२ मध्ये ब्‍लडी मार्शच्या लढाईनंतर ही वसाहत शाही प्रांत झाली. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिशांनी प्रथम १७७८ मध्ये सॅव्हाना व नंतर बहुतेक सर्व वसाहत जिंकली होती. तथापि नंतर देश स्वतंत्र झाला व १७७८ साली संघराज्याच्या घटनेला सुरुवातीसच या राज्याने मान्यता दिली. १८०२ मध्ये जॉर्जियाने चट्टाहूची नदीपलीकडचा मुलूख केंद्र शासनाला विकला. तोच नंतर ओक्लाहोमा प्रदेश झाला. राज्यात वस्ती वाढू लागल्यावर क्रीक आणि चेरोकी जमातींच्या मालकीच्या जमिनींसाठी शासनावर गोऱ्यांचे दडपण येऊ लागले. प्रथम तडजोडी झाल्या, त्या मोडल्या आणि अखेर १८३८ साली आजच्या ओक्लाहोमा राज्यप्रदेशात सगळे इंडियन ढकलण्यात आले. १७४९ गुलामांची आयात सुरू झाल्यापासूनच जॉर्जियात गुलामांचा वापर होत होता व्हिटनीने ‘कॉटन जिन’चा शोध लावून कपाशीतील सरकी जलद काढून तिची कताई सुलभ केल्यामुळे कपाशीची मागणी एकदम वाढली. मळेपद्धतीने कापसाची लागवड प्रचंड प्रमाणावर चालू झाली आणि गुलामांचा उपयोग जॉर्जियाला फारच फायदेशीर होऊ लागला. लिंकन राष्ट्राध्यक्ष झाला, तेव्हा गुलामगिरीच्या पद्धतीवर आणि पर्यायाने आपल्या उपजीविकेवरच घाला येणार, या भयाने जॉर्जिया संघराज्यातून फुटून निघाले. यादवी युद्धात १८६३ साली राज्याच्या वायव्य कोपऱ्यात चिकमॉग येथे दक्षिणेच्या बंडखोरांनी एक लढाई जिंकली, पण पुढल्याच वर्षी उत्तरेच्या सेनापती शेर्मनने ॲटलांटा शहर जाळले आणि किनाऱ्याकडे मोर्चा वळवून १८६४ मध्ये सॅव्हाना जिंकले. १८६५ च्या अखेर दक्षिणेच्या कान्फेडरेट सरकारचा अध्यक्ष जेफर्सन डेव्हिस याला फिट्‍झजेराल्ड येथे पकडण्यात आले. पुनर्रचनेच्या काळात इतर राज्यांच्या मानाने जॉर्जियाला कमी  झळ लागली. नवी राज्यघटना संमत होईना, तेव्हा १८६७ मध्ये लष्करी अंमल आला पण पुन्हा प्रयत्न होऊन १८७० मध्ये राज्याला संघराष्ट्रात पुन्हा प्रवेश मिळाला व केंद्रीय लष्कर मागे घेण्यात आले. यादवी युद्धाच्या नुकसानीतून हळूहळू बाहेर पडताना, कपाशीच्या एकाच पिकावर अवलंबून राहण्याची बेभरवशाची अर्थव्यवस्था बदलून शेंगदाणा, बटाटा, रताळी वगैरे अनेक पर्यायी पिके काढण्यास शेतकऱ्‍यांना प्रवृत्त करण्यात आले. न्यू इंग्‍लंड भागातील कापडगिरण्याही इकडे कच्च्या मालाजवळ आल्या. पहिल्या महायुद्धात १,०३,४९८ आणि दुसऱ्यात ३,२४,३७३ लोक राज्यातून दाखल झाले. शेती व कारखाने यांचीही मदत भरपूर झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अनेक सैनिकांनी विमानवाहित पायदळाचे आदिस्थान फोर्ट बेनिंग येथे प्रशिक्षण घेतले. १९४३ मध्ये सर्व राज्यांच्या आधी जॉर्जियाने मतदानाचे वय १८ वर आणले. मतदारांनी साक्षरतेच्या कसोटीस उतरले पाहिजे, असा दंडक या राज्यात आहे. युद्धोत्तर काळात कृषिउद्योगापेक्षा कारखानदारीचे महत्त्व वाढले. कपाशीच्या पायावर उभा राहिलेला कापडगिरणी धंदा शेतमालाच्या तिप्पट कमाई करू लागला.


संविधानाप्रमाणे राज्याच्या जनरल असेंब्‍लीवर १९४५ च्या सेनेटचे ५६ व प्रतिनिधिगृहाचे १८० सभासद आहेत. त्यांची मुदत २ वर्षे असते. देशाच्या काँग्रेसवर जॉर्जियाचे २ सीनेटर व १० प्रतिनिधी आहेत. गव्हर्नर व लेफ्टनंट गव्हर्नर ४ वर्षांसाठी निवडले जातात. विधिसभा वर्षातून ४० दिवस भरतात. राज्याच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, त्याचे सहा सहकारी, नऊ न्यायाधीशांचे अपील कोर्ट यांची मुदत ६ वर्षे असते.  

आर्थिक व सामाजिक स्थिती : कृषी, वनोद्योग व मच्छीमारीत १०% लोक, मुख्य कृषी उत्पादन धान्ये, फळे, कोंबड्या व अंडी, डुकरे, मांसासाठी पोसलेली जनावरे व दूधदुभते असे आहे. १९७२ अखेर २० लाख गुरे, पैकी १,४५,००० दुभत्या गाई, २० लाख डुकरे व ३६६ लक्ष कोंबड्या होत्या. १९७२ मध्ये ७५,००० शेते होती व सरासरी शेत ९५ हेक्टरचे होते.

पिके : कपाशी व तंबाखू महत्त्वाची असून शिवाय भुईमूग, मका, पीकॅन हे बदामासारखे कवची फळ व पीच होतात. कारखानदारीत २७% लोक असून कापड, जमीनपोस, धागादोरा, सुयाविणकाम, टर्पेंटाइन, राळ, कृत्रिम धाग्याचे कापड यांचे, त्याचप्रमाणे प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, वाहतूकसामग्री, मोटारी व ट्रक्सची जुळणी, कागद व संबंधित पदार्थ आणि तयार कपड्यांचे उत्पादन होते. १९७२ मध्ये ५,६०० कारखान्यांतून एकूण ४,६३,९०० कामगार होते. व्यापारात २२% लोक आहेत.  

दळणवळण : राज्यात सॅव्हाना आणि चट्टाहूचीसारख्या नद्यांतून महत्त्वाचे जलमार्ग असून १९७२ मध्ये लोहमार्ग ८,८९३ किमी. रस्ते १,५८,४१२ नोंदलेली मोटारवाहने ३०,१८,९७० होती. सर्व प्रमुख शहरी विमानतळ, १४८ नभोवाणी व १३ दूरचित्रवाणी केंद्रे, ९ लाख दूरध्वनियंत्रे, २० दैनिके, १९४ साप्ताहिके होती.  

लोक व समाजजीवन : ६०% शहरी प्रजेत निग्रोंचे प्रमाण सु. २६% (१९७०). ७४·३% प्रॉटेस्टंट, ३·२% रोमन कॅथलिक, १·५% ज्यू व बाकीचे इतर.  

शिक्षण : १९४५ पासून शिक्षण सक्तीचे व ६ ते १८ वर्षे वयापर्यंत निःशुल्क आहे. १९७१–७२ अखेर ३४२ वरिष्ठ व ५३ कनिष्ठ माध्यमिक शाळा १,३०६ प्राथमिक शाळा आणि १०२ वरील तिन्ही प्रकारच्या शाळा मिळून ११,३६,०८३ विद्यार्थी व ५०,८२३ शिक्षक होते. आता गोऱ्या व काळ्या मुलांच्या शाळा एक झाल्या आहेत. ४ विद्यापीठे व २२ महाविद्यालये, त्यांत स्त्रियांसाठी काही वेगळ्या शिक्षणसंस्था आहेत. १९७२–७३ मध्ये ५८ उच्च शिक्षणसंस्थांत मिळून १,३५,५३७ विद्यार्थी होते. धर्म, पंथ, रूढी, समाजजीवन, भाषा, कला, क्रीडा यांबाबतीतील जॉर्जियाचे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील इतर राज्यांशी साधारणपणे साधर्म्य आहे.  

समाजकल्याण : ऑगस्ट १९७३ मध्ये ८२,७३७ लोकांस प्रत्येकी सु. ५९ डॉ. वार्धक्यवेतन १,०३,८०६ कुटुंबांस प्रत्येकी सु. १०१ डॉ. अवलंबी मुलांसाठी ३,१३९ अंधांस प्रत्येकी सु. ७५ डॉ. व ४०,४६८ कायम पंगू लोकांस प्रत्येकी ७० डॉ. दरमहा मिळत होते. २२० रुग्णालयांत ३२,०३४ खाटा होत्या. सप्‍टेंबर १९७३ मध्ये ९,००० कैदी तुरुंगात होते. १९६५ नंतर मृत्युदंड नाही. १५९ पैकी काही परगण्यांत अंशतः दारूबंदी आहे.  

महत्त्वाची स्थळे : ॲटलांटा राजधानी, सर्वांत मोठे शहर, व्यापारकेंद्र सॅव्हाना–सागरी बंदर, विशेषतः लाकूड, कपाशी वाहतुकीचे कोलंबस–चट्टाहूची कापडगिरण्यांचे, यंत्रमालाचे आणि कृषिव्यापाराचे केंद्र ऑगस्टा–जुनी राजधानी, शेतीमाल, लाकूड व चिनी मातीची पेठ. राज्यात अनेक राष्ट्रीय व राज्याची स्मारके, उद्याने, ऐतिहासिक वास्तू असून पाइन डोंगराच्या पायथ्याशी पोलिओच्या रोग्यांना उपयुक्त गरम झरे आहेत. तेथे प्रे. रूझवेल्टनेही उपचार घेतले होते. तसेच अनेक ग्रंथालये व संग्रहालये आहेत. राज्यातील दऱ्याखोरी, गुहा वगैरे अनेक प्रेक्षणीय निसर्गदृश्यांपैकी ॲटलांटाजवळ १,६०० मी. लांबीचा ५२३ मी. उंचीचा स्टोन मौंटन हा जगातील सर्वांत मोठा उघडा ग्रॅनाइटी खडक आहे त्याच्यावर ‘कॉन्फिडेरेसी’चे भव्य स्मारक कोरलेले आहे.

पहा : अमेरिकेची संयुक्त संस्थाने.                                                  

ओक, शा. नि.