सारावाक : मलेशियातील तेरा राज्यांपैकी एक ऐतिहासिक राज्य. या राज्याने बोर्निओ बेटाचा वायव्य भाग व्यापला आहे. सारावाकच्या वायव्येस दक्षिण चिनी समुद्र, उत्तरेस ब्रूनाई देश व मलेशियाचे साबा राज्य, पूर्वेस व दक्षिणेस इंडोनेशियाचा बोर्निओ (कालीमांतान) हा प्रदेश आहे. सारावाकचे क्षेत्रफळ १,२४,४४९ चौ. किमी. व लोकसंख्या २४,२०,००९ (२०१०, अंदाज) आहे. कूचिंग (लोकसंख्या ६,८१,९०१–२०१०) हे राजधानीचे ठिकाण तसेच राज्यातील सर्वांत मोठे शहर आहे. दक्षिण चिनी समुद्रकिनाऱ्यालगतचा मैदानी प्रदेश दलदलयुक्त आहे, तर अंतर्गत प्रदेश पर्वतीय आहे. पर्वतीय प्रदेशाची उंची ३०० मी. पासून १,२०० मी. पर्यंत आढळते. मौंट मुरुडची उंची २,४२३ मी. आहे. समुद्रकिनारा बराच दंतूर आहे. राज्याचा बराचसा भाग विषुववृत्तीय वर्षारण्यांनी व्यापलेला आहे. अंतर्गत प्रदेशात पर्वतश्रेण्या व नौकागमनयुक्त नद्या यांनी एकमेकांना छेदलेले दिसते.

पंधराव्या शतकात जावाच्या मजपहित राजसत्तेचा अस्त झाला, तेव्हा सारावाक हा ब्रूनाई सुलतानशाहीचा दक्षिण प्रांत बनला. १८३९ मध्ये ब्रिटिश साहसवीर व ईस्ट इंडिया कंपनीचा माजी लष्करी अधिकारी जेम्स ब्रुक याने या प्रदेशाला भेट दिली. त्याने येथील ब्रूनाईविरुद्घचे बंड मोडून काढण्यासाठी ब्रूनाईच्या राजाला मदत केली. या मदतीच्या बदल्यात ब्रुकला सारावाकमधील १८,००० चौ. किमी. क्षेत्रफळाची जमीन तसेच त्याला सारावाकचा राजा हा किताब बहाल करण्यात आला (१८४१). ब्रुकने येथील चाचेगिरी व शिरशिकारीला (हेड हंटिंग) आळा घालण्याचा प्रयत्न केला. सारावाकला स्वतंत्र राज्य म्हणून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी १८५० मध्ये तर ग्रेट ब्रिटनने १८६४ मध्ये मान्यता दिली. सारावाकची सत्ता वंशपरंपरेने ब्रुक कुटुंबाकडेच दुसऱ्या महायुद्घापर्यंत अनिर्बंध होती. ब्रुकने हळूहळू नवीन प्रदेश जोडून किंवा खरेदी करून सारावाकचा विस्तार १९०५ पर्यंत बऱ्यापैकी वाढविला. १८६८ मध्ये ब्रुकचे निधन झाल्यानंतर चार्ल्स अँथनी ब्रुक (कार. १८६८–१९१७) या त्याच्या पुतण्याला राजेपद मिळाले. त्याने १९१७ पर्यंत कारभार पाहिला. त्यानंतर त्याचा मुलगा चार्ल्स व्हायनर ब्रुक गादीवर आला. त्याने सारावाकमध्ये लोकसत्ताक स्वयंशासन स्थापन्यासाठी संविधान तयार करून स्वतःचे राजकीय हक्क सोडले (१९४१) परंतु त्याचा हा प्रयत्न दुसऱ्या महायुद्घात (१९४२ -४५) जपानने सारावाक पादाक्रांत केल्यामुळे असफल झाला व संविधान निलंबित झाले. दुसऱ्या महायुद्घात हा प्रदेश उध्वस्त झाला. १९४६ मध्ये हा प्रदेश ब्रिटिश सत्तेखाली आला. १९६३ मध्ये स्वयंशासनाचा अधिकार प्राप्त होऊन सारावाक मलेशियाला जोडण्यात आला.

सारावाकची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीवर आधारित आहे. किनाऱ्यावर रबर, मिरी, सागो ही प्रमुख नगदी उत्पादने घेतली जातात. अंतर्गत भागात स्थलांतरित शेती केली जाते. तांदूळ हे प्रमुख पीक आहे. अरण्योद्योग ही महत्त्वाचा आहे. खनिज तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. खनिज तेल उत्पादने, लाकूड व रबर यांची निर्यात केली जाते. लाकूड चिरकाम, सागो, खोबरे व मिरीवरील प्रक्रिया हे प्रमुख उद्योग चालतात. त्याशिवाय कापड, धातूची भांडी, साबण, कौले, लहान बोटी यांचीही निर्मिती केली जाते. पर्यटन व्यवसायही महत्त्वाचा आहे.

शिरशिकार करणारे इबान (सीडायक) हे बोर्निओतील मूळ रहिवासी असून त्यांची संख्या सु. ३०%असून चिनी लोकांचे प्रमाण सु. २९% आहे. त्याशिवाय मलायी, लँड डायक, मेलॅनीज लोकही आढळतात. नद्यांमधून अंतर्गत जलवाहतूक चालते. सीबू हे सारावाकमधील प्रमुख बंदर आहे.

चौधरी, वसंत