सेलेबीझ : (सूलावेसी). इंडोनेशियातील ग्रेटर सूंदामध्ये समाविष्ट असणाऱ्या चार प्रमुख बेटांपैकी एक बेट. क्षेत्रफळ (लगतच्या बेटांसह) १,९१,८०० चौ. किमी. लोकसंख्या  बेटाचा आकार काहीसा विचित्र असून त्याचे स्पष्ट दिसणारे चार द्वीपकल्प व त्यांदरम्यान तीन आखाते आहेत. त्यांपैकी तोमीनी (गोरोंटालो) आखात ईशान्य भागात, तोलो पूर्व भागात तर बोनी आखात दक्षिण भागात आहे. सेलेबीझच्या उत्तरेस सेलेबीझ समुद्र, पूर्वेस मोलक्का व बांदा समुद्र, दक्षिणेस फ्लोरेस समुद्र तर पश्‍चिमेस माकॅसर सामुद्रधुनी आहे. माकॅसर सामुद्रधुनीमुळे पश्‍चिमेस असलेल्या बोर्निओ बेटापासून सेलेबीझ बेट अलग झाले आहे. या बेटाला ५,४७८ किमी.लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

सेलेबीझ हे प्रामुख्याने पर्वतीय बेट असून त्याच्यावर अनेक ज्वालामुखी आहेत. त्यांपैकी काही जागृत आहेत. प्रवाळ-शैलभित्तींनी वेढलेल्या या बेटाच्या दक्षिण भागात खोल सागरी प्रदेश आहेत. बेटाच्या मध्यवर्ती भागातील पर्वतीय प्रदेश सरासरी सु. ३,००० मी. पेक्षा अधिक उंचीचा असून त्यात अग्निजन्य खडकातील जटिल भाग आढळतात. पर्वतश्रेण्यांच्या दरम्यान खोल खचदऱ्या असून त्यांपैकी काहींमध्ये सरोवरे आहेत. बेटाच्या दक्षिण मध्य भागात आणि दक्षिण द्वीपकल्पावर मोठे मैदानी प्रदेश आहेत. दक्षिण द्वीपकल्पाच्या उत्तर मध्य भागात असलेले मौंट रान्तकाँबल किंवा मारीओ (उंची ३,४५५ मी.) हे या बेटावरील सर्वोच्च शिखर असून मौंट रान्तमारीओ (३,४४०मी.) हे दुसरे प्रमुख शिखर आहे. आग्नेय कोपऱ्यात सु. ६५ द. ल. वर्षांपेक्षाही जुने विदारित ज्वालामुखी खडक असून काही ठिकाणी त्यांभोवती प्रवाळी चुनखडक आढळतात. बेटाचा दक्षिणेकडील कटक सुभाजा आणि स्फटिकमय खडकांचा तर उत्तरेकडील ज्वालामुखीय मीनाहासा प्रदेश सारंचनिकदृष्ट्या बेटाच्या इतर भागापेक्षा वेगळा आहे. या भागात अग्निजन्य व रूपांतरित खडकांचा जटिल भाग आढळतो. बेटावर निकेल, सोने, हिरे, गंधक व कमी दर्जाचे लोह खनिज यांचे साठे आहेत.

बेटावरील नद्या आखूड असून त्या विशेष महत्त्वाच्या नाहीत. आग्नेय द्वीपकल्पावरील तोवूती, मध्यवर्ती भागातील पोसो आणि मताना ही तीन प्रमुख खोल सरोवरे आहेत. अगदी ईशान्य भागात असलेल्या तोंडानो शहराजवळचा धबधबा प्रेक्षणीय  आहे.

सेलेबीझचे हवामान उष्ण असले तरी सागरी वाऱ्यांमुळे तापमानाची तीव्रता कमी होते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान रान्तपाओ या नैर्ऋत्येकडील मध्यवर्ती प्रदेशात ४०६ सेंमी. तर पश्‍चिम किनाऱ्याजवळील पालू खचदरीत ते ५३ सेंमी. आहे. सेलेबीझ बेटाचा बराचसा प्रदेश अद्याप वनाच्छादित आहे. येथील अनेक वनोत्पादने निर्यात केली जातात. सेलेबीझवरील प्राणिजीवन सामान्यपणे ऑस्ट्रेलियापेक्षा आशियातील प्राणिजीवनाशी मिळतेजुळते आहे. डुक्कर सदृश्य बाबिरूसा, गवा, बॅबून माकड, काही दुर्मिळ जातीचे पोपट, मोठमोठ्या सुसरी इ. येथे आढळतात.

सेलेबीझ बेटावर तोआलिअन संस्कृतीच्या काळातील दगडी हत्यारे आढळली आहेत. यावरून अश्मयुगापासून येथे मानवी वस्ती असावी. मलायाच्या किनाऱ्यावरील मुस्लिमांनी सेलेबीझच्या दक्षिण भागात आपल्या राज्याची स्थापना केली होती. इ. स. १५१२ मध्ये पोर्तुगीज लोक मसाले पदार्थांच्या व्यापाराच्या निमित्ताने येथे आले. त्यानंतर १६०७ मध्ये डचांनी माकॅसर येथे आपल्या वसाहतीची स्थापना केली. पुढे डचांनी पोर्तुगीजांना हुसकावून लावले आणि हळूहळू आपल्या साम्राज्याचा विस्तार वाढविला. बॉन व गोवा ही राज्ये अनुक्रमे १९०५ व १९११ मध्ये आपले स्वातंत्र्य गमावून बसली. दुसऱ्या महायुद्धात जपानने या बेटाचा ताबा घेतला होता. १९५० मध्ये इंडोनेशिया प्रजासत्ताकाला हे बेट जोडण्यात आले. परंतु राजकीय व सांप्रदायिक असंतोष आणि बंडखोरी कारवाया सातत्याने चालू राहिल्या आहेत. १९९९–२००१ या कालावधीत झालेल्या अशाच उद्रेकात शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते. सेलेबीझ व लगतची बेटे एकूण पाच प्रांतात विभागली आहेत.

सेलेबीझची अर्थव्यवस्था प्रामुख्याने आर्द्रभात शेतीवर आधारित आहे. दक्षिण द्वीपकल्प आणि ईशान्य द्वीपकल्पाचा टोकाचा भाग हे दोन प्रदेश आर्थिकदृष्ट्या विकसित आहेत. पर्वतीय प्रदेशामुळे शेतीयोग्य जमिनीचे प्रमाण कमी आहे. बेटावरील काही अंतर्गत खोरी व पठारी भाग सुपीक असून ते कृषी व गवताळ प्रदेश आहेत. दक्षिण भागात तांदूळ, मका, कसाव्हा, याम, तंबाखू व कडधान्ये ही उत्पादने घेतली जातात. खोबरे उत्पादनही महत्वाचे आहे. तेंपी व सिडेनरेंग सरोवरांभोवतालच्या गाळाच्या मैदानी प्रदेशात धान्योत्पादन घेतले जाते. पूर्वेकडील द्वीपकल्प बरेच अविकसित व विरळ लोकवस्तीचे असून तेथे प्रामुख्याने उदरनिर्वाहक शेती केली जाते. ईशान्य भागात खोबरे, वनोत्पादने व काही प्रमाणात गंधकाचे उत्पादन घेतले जाते. त्याशिवाय बेटावरील लोक चुनीदार वस्तू-निर्मिती व विणकाम, सोने व चांदीकाम, जहाजबांधणी आणि मासेमारी या व्यवसायांत गुंतले आहेत. पारीपारीच्या पूर्वेस सावीतो नदीवर जलविद्युत्-निर्मिती  प्रकल्प  आहे.

बेटावर वाहतुकीचे मार्ग मर्यादित आहेत. दक्षिण द्वीपकल्पावरील प्रमुख नगरे रस्त्याने एकमेकांशी जोडली आहेत. मानाडो-केमा, केंडारी-कोलका या प्रमुख रस्त्यांशिवाय तारेजा उच्चभूमीवर प्रमुख रस्ते आढळतात. माकॅसर, मानाडो, गोरोंटालो, केंडारी, पोसो व पालू येथे विमानतळ आहेत. मानाडो हे प्रमुख बंदर आहे. उजुंग पांडांग हे दक्षिण द्वीपकल्पावरील मोठे शहर व प्रमुख सागरी बंदर आहे.

सेलेबीझ बेटावर तोआला, तोडरजा (तोराजा), बुगिनीज, मकासरी, मीनाहासन (मीनाहासा), मोरी व गोरोंटालीन या प्रमुख सात वांशिक गटाचे लोक राहतात. त्यांपैकी तोआला लोक सर्वत्र आढळतात. ते जंगलात राहणारे, भटके व बुजरे असून त्यांची स्वत:ची अशी वेगळी भाषा आहे. तोडरजा लोक मध्य, आग्नेय व पूर्व सेलेबीझमध्ये रहात असून ते ऑस्ट्रोनेशियन (मलायो-पॉलिनीशियन) लोकांचे वंशज आहेत. त्यांचीही स्वत:ची वेगळी भाषा असून ते मुख्यत: शेतकरी आहेत. त्यांतील बहुतांश ख्रिश्चन आहेत. दक्षिण भागात राहणारे बुगिनीज व मकासरी लोक मुस्लिम आहेत. ते मुख्यत: शेतकरी असून त्यांशिवाय चुनीदार वस्तूनिर्मिती व विणकाम, सोने व चांदीकाम व जहाजबांधणी व्यवसायांतही गुंतले आहेत. मीनाहासा द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात राहणारे मीनाहासन लोक प्रामुख्याने मानाडो शहराच्या सभोवताली राहतात. त्यांच्यावर पाश्चिमात्यांचा प्रभाव असून ते यूरोपीयन लोकांप्रमाणेच राहतात. येथील बहुतेक खेड्यांत ख्रिश्चन चर्च व शाळा आढळते. मोरी हे उच्चभूमी प्रदेशात राहणारे लोक असून ते मुख्यत: बेटाच्या पूर्व भागात आढळतात. गोरोंटालीन लोक मीनाहासा द्वीपकल्पाच्या पश्‍चिम व दक्षिणमध्य भागात राहतात. मानाडो, गोरोंटाले व माकॅसर येथे विद्यापीठे आहेत. उजुंग पांडांग, मानाडो, गोरोंटालो, पालोपो ही बेटावरील प्रमुख नगरे आहेत.

चौधरी, वसंत