रेश्त : इराणमधील गिलान प्रांताच्या राजधानीचे शहर व विपणनकेंद्र. ते साफिद रूद (नदी)च्या सीआह ह्या उपनदीवर वसलेले असून तेहरानच्या वायव्येस २४१ किमी.वर आहे. लोकसंख्या २,६६,३०० (१९८५ अंदाज). रेश्त जवळजवळ समुद्रसपाटीवर असून येथून कॅस्पियन समुद्रकिनारा सु. ३२ किमी. वर आहे.

या शहराची स्थापना दहाव्या शतकात झाली असावी. चौदाव्या शतकात रेशीम व सुती कापड यांचे मोठे निर्मितिकेंद्र म्हणून रेश्तचा उल्लेख आढळतो. सोळाव्या शतकांती इंग्रज व्यापाऱ्यांनी रशियातून रेश्तमध्ये प्रवेश केला. ह्याच शहरी पहिला शाह अब्बास याने आपल्या साफी मिर्झा ह्या ज्येष्ठ मुलाचा खून करविला. १६३६ मध्ये स्ट्येन्का राझ्यिन या कझाक पुढाऱ्याने आपल्या पलटणीनिशी शहरावर हल्ला करून लुटालूट केली. सतराव्या शतकातील रशियाच्या दक्षिणेकडील विस्तारनीतीपासून गिलानची राजधानी म्हणून रेश्तला महत्त्व लाभले. दोन्ही महायुद्धांत रशियन लष्करतळ म्हणून रेश्तचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आल्यामुळे शहराचे प्रचंड नुकसान झाले, पुढे आर्थिक अवनतीमुळेही त्याचे महत्त्व ओसरले.

इराणच्या पठारी प्रदेशातील घरांपेक्षा रेश्तमधील घरांची रचना वेगळी आढळते. येथील घरे मऊ व लाल विटांची दुमजली, कौलारू व अतिशय आकर्षक असतात. घरांमधील प्रशस्त ओसऱ्या व पागोळ्या बव्हंशी लाकडाच्या बनविलेल्या असतात. घरे अधिक हलकी होण्यासाठी लाकूड व काच यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. शहरातील कित्येक घरे, सार्वजनिक इमारती, मशिदी व मिनार ह्यांच्या बांधकामात नक्षीदार, सुंदर विटांचा उपयोग केलेला आढळतो. रेझाशाह पेहलवीच्या कारकीर्दीत शहरातील आणि शेजारील गावांना जोडणारे अनेक मोटाररस्ते विस्तृत बांधण्यात आले. शहरातील बरेच जुने रस्ते अजूनही फरसबंदीचे आढळतात.

रेश्तचा आसमंत भातशेते व जंगले ह्यांनी व्यापलेला आहे. गिलान प्रांताचे विपणनकेंद्र म्हणून रेश्तला महत्त्व आहे. ह्या कृषिसमृद्ध प्रांताला पुरून उरणारा शेतमाल-तांदूळ, लिंबूवर्गीय व ऑलिव्ह फळे, चहा, वाटाणा, इतर नगदी पिके व रेशीम-रेश्तहून बाहेर निर्यात केला जातो. रेश्त हे शासकीय व सांस्कृतिक केंद्रही आहे. शहरातील बाजार मोठा व आकर्षक असतो. तांदूळ, तंबाखू, रेशीम व ताग या स्थानिक शेतमालावर प्रक्रिया करण्यात येते. शहरात साबण, काच, ब्‍लेड, आगपेट्या यांचे कारखाने असून तागाच्या पिशव्या बनविण्याचाही एक मोठा कारखाना आहे. १९६२ मध्ये साफिद नदीवर एक मोठे धरण बांधण्याचे काम पूर्ण झाले. रेश्त हे बंदर-ई-आंझली (पूर्वीचे बंदर-ई-पहलवी), तेहरान, ताब्रीझ इ. शहरांशी चांगल्या रस्त्यांनी जोडलेले आहे. शहराच्या उत्तरेकडील भागात एक विमानतळ आहे.  

गद्रे, वि. रा.