पूर्णा नदी : (१) तापी नदीची महत्वाची उपनदी. ‘पयोष्णी’ असेही तिचे जुने नाव आहे. नैऋत्य व पश्चिम दिशांनी वाहणाऱ्या या नदीचा प्रवाह अमरावती, अकोला व बुलढाणा या जिल्ह्यांतून जातो. लांबी सु. ३३८ किमी., जलवाहनक्षेत्र १८,३११ चौ. किमी. ही महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात गाविलगड टेकड्यांच्या दक्षिणेकडील उतारावर उगम पावते. प्रथम दक्षिण व नंतर नैऋत्य दिशेने या जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहते. पुढे अमरावती व अकोला जिल्हा यांच्या सरहद्दीवर आल्यावर ती पश्चिमाभिमुख होऊन अकोला व बुलढाणा या जिल्ह्यांतून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात चांगदेव येथे तापीस मिळते. या नदीला अमरावती जिल्ह्यात पेंढी, शहानूर, चंद्रभागा, बोर्डी अकोला जिल्ह्यात उमा, काटेपूर्णा, लोणार, मोर्णा, मान आणि बुलढाणा जिल्ह्यात नळगंगा, विश्वगंगा व बाणगंगा या नद्या मिळतात. मध्य भागातील अजिंठा डोंगर व उत्तर भागातील गाविलगड डोंगर यांमधील हिच्या प्रवाहक्षेत्रास पूर्णा खोरे म्हणतात. तापी-पूर्णा खोरे या नावानेही ते ओळखले जाते. पूर्णेचे खोरे सुपीक असून कापसाच्या पिकासाठी विशेष प्रसिद्ध आहे. दर्यापूर, अचलपूर, अमरावती, मुर्तिजापूर, अकोला, बाळापूर, खामगाव, मलकापूर, एदलाबाद, चांगदेव ही पूर्णा खोऱ्यातील महत्त्वाची गावे होत.

(२) गोदावरी नदीची एक उपनदी. ही नदी आग्ने,य व दक्षिण दिशांनी औरंगाबाद , बुलढाणा व परभणी या जिल्ह्यांतून वाहते. लांबी सु. २७३.५३ किमी. असून त्यांपैकी ८८.५ किमी. औरंगाबाद जिल्ह्यातून, १४४.८१ किमी. परभणी जिल्ह्यातून, तर बाकीचा प्रवाह बुलढाणा जिल्ह्यातून वाहतो. पूर्णा नदी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अजिंठा टेकड्यांमध्ये मेहूण गावाजवळ उगम पावते. पुढे आग्नेययीकडे बुलढाणा जिल्ह्यातून वाहत जाऊन परभणी जिल्ह्यात प्रवेश करते. म्हणजेच उगमापासून स्थूलमानाने ती आग्ने यीकडे वाहते परंतु शेवटी सु. ७२.४ किमी. दक्षिणवाहिनी होते व गोदावरी नदीस मिळते. तिला औरंगाबाद जिल्ह्यात चरणा, खेळणा, जुई, अनजान, गिरजा आणि परभणी जिल्ह्यात दुधना, काप्रा या नद्या मिळतात. हिच्या खोऱ्यात ज्वारी, बाजरी, गहू, कापूस इ. पिके होतात. परभणी जिल्ह्यातील जिंतूर व हिंगोली या तालुक्यांतील अनुक्रमे येलदरी व सिद्धेश्वर येथे हिच्यावर धरणे बांधली असून त्यांच्यापासून जलसिंचन व विद्युत्‌निर्मिती केली जाते. सिल्लोड, भोकरदन, जाफराबाद, जिंतूर, येलदरी, सिद्धेश्वर, हिंगोली, पूर्णा, परभणी ही हिच्या खोऱ्यातील महत्त्वाची शहरे होत. नदीकिनारी असलेली मंदिरे उल्लेखनीय आहेत.

सावंत, प्र. रा. गाडे, ना. स.