जामनगर : गुजरात राज्यातील पूर्वीच्या नवानगर संस्थानची राजधानी व याच नावाच्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे प्रमुख ठिकाण. उपनगरांसह लोकसंख्या २,१४,८५३ (१९७१). रंगमती-नागमती या नदीसंगमावर हे वसले असून विरमगाव–ओखा या मीटरमापी लोहमार्गाचे स्थानक आहे. तसेच हवाई मार्गांनी ते राजकोट, भूज, मुंबई यांस जोडलेले आहे. लहान-मोठे अनेक उद्योगधंदे येथे वाढीस लागले असून कापडगिरण्या, तेलगिरण्या व मिठाचे कारखाने आहेत. येथे बरेच हस्तव्यवसाय व लघुद्योगही चालतात. त्यांत साबण, कुलपे, ट्रंका, बटणे तयार करणे इत्यादींचा समावेश होतो. जामनगरी कुंकू, काजळ व सुरमा विख्यात आहेत. रेशमी-जरी-भरतकामासाठी आणि विणकामासाठी हे प्रसिद्ध असून ‘बांधणी साडी’ हे येथील वैशिष्ट्य होय. १९५५ मध्ये स्थापन झालेल्या गांधी उद्योग मंदिरात सुतारकाम, शिवणकाम, छपाई इत्यादींचे शिक्षण दिले जाते. भुईमूग, लसूण व इतर धान्ये यांची ही मोठी घाऊक बाजारपेठ आहे.

फिरते सूर्यकिरण-चिकित्सालय, जामनगर.

येथे हवाई, नाविक व भूदलाची प्रशिक्षण केंद्रे असून कला, वाणिज्य, शास्त्र, कायदा इत्यादींची महाविद्यालये आहेत. १९६७ मध्ये येथे गुजरात आयुर्वेदीय विद्यापीठाची स्थापना झाली आहे. शहरात अनेक प्रेक्षणीय स्थळे असून त्यांत जलाशयातील लाखोटा व काठावरील कोठा हे राजवाडे, सोळाव्या शतकातील नागनाथ महादेव मंदिर, कालिकामाता मंदिर, जैन मंदिरे, खंभालिया प्रवेशद्वार, राणा कुंभचा दरबार आणि आधुनिक काळातील शासकीय विश्रामगृह, प्रतापविलास राजवाडा, टाउनहॉल, रणजित सागर आणि पश्चिम भारतातील एकमेव सौरभट्टी यांचा प्रामुख्याने समावेश केला जातो. सुप्रसिद्ध क्रिकेटवीर रणजितसिंहजी व जनरल एच्. एच्. जामसाहेब हेही याच संस्थानातील सुपुत्र.

कापडी, सुलभा