कराड : (कऱ्हाड, करहाट). सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ४२,३२९ (१९७१). याच्या वायव्येस ९ किमी. वसंतगड, ईशान्येस ६ किमी. सदाशिवगड आणि आग्नेयीस ६ किमी. आगाशिव डोंगर असून हे कृष्णा-कोयना संगमाजवळ, पुणे–बंगलोर हमरस्त्यावर, दक्षिण-मध्य रेल्वेमार्गावर व कोकणाशी दळणवळणाच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणी वसले आहे. शेंग, गूळ व हळद यांची ही एक प्रमुख पेठ आहे. तेल गाळण्याचे अनेक कारखाने येथे असून स्टेशनजवळील ओगलेवाडी काचकारखान्याचा समावेश कराडमध्येच होतो. कोयना जलविद्युत्‌ प्रकल्पामुळे आसमंतात नवीन उद्योगधंदे वाढत आहेत. तेथे शासकीय तंत्रशाळा, अनेक माध्यमिक शाळा, अभियांत्रिकी, कला, वाणिज्य, विज्ञान इ. प्रमुख विद्याशाखांची महाविद्यालये आहेत. भारहूत (जबलपूर) आणि कुडा (अलिबाग) येथील स्तूपांवर तसेच ताम्रपटांवर करहाटचा उल्लेख आढळतो. शहरात पन्नासच्यावर देवळे असून त्यांपैकी कृष्णामाई, काशीविश्वेश्वर व कमलेश्वर ही मोठी आहेत. आदिलशाहीतील ३२ मी. उंचीचे मनोरे असलेली मशीद प्रेक्षणीय आहे.

कुलकर्णी, गो. श्री.