नॉर्वेची राजधानी, ऑस्लो : एक दृश्य

ऑस्लो : नॉर्वेची राजधानी व सर्वांत मोठे शहर. ५९° ५५’ उ. १०° ४५’ पू. क्षेत्रफळ ४५३.२८ चौ.किमी.; लोकसंख्या ४,७५,५६३ (१९७१). स्कॅगरॅक या उत्तर समुद्रफाट्याच्या ऑस्लो फिओर्ड मुखाजवळील टेकडीवर हे वसले आहे. १०५० च्या सुमारास याची स्थापना तिसऱ्या हेरॉल्डने केली. तेराव्या शतकाच्या अखेरीस येथे राजधानी आली. चौदाव्या शतकात या शहरावर हॅन्झीॲटिक संघाचे प्रभुत्व होते. १६२४ मधील अग्नीप्रलयामुळे हे भस्मसात झाले. त्यानंतर पूर्वीच्या जागेजवळच तेथील राजाने नवीन शहर बांधून त्याला क्रिस्तियाना नाव दिले. काही काळ हे स्वीडनच्या आधिपत्याखाली होते. स्वातंत्र्यानंतर १९२५ मध्ये याचे जुने नाव ऑस्लो हेच कायम करण्यात आले. सध्या हे नॉर्वेचे प्रमुख औद्योगिक, व्यापारी, सांस्कृतिक व दळणवळणाचे केंद्र असून येथे धातुकाम, विजेची उपकरणे, यंत्रे, रसायने, कापड, कागद, अन्नपदार्थ, आसवने, मासेमारी व हस्तव्यवसाय हे उद्योग आहेत. लाकूड, लाकूड सामान, कागद, मासळी यांची येथून मोठ्या प्रमाणात निर्यात होते. ऑस्लो हे बाराही महिने बर्फमुक्त बंदर आहे. शहराची रचना आकर्षक असून येथील किल्ला, राजवाडा, संसदभवन, नगरभवन, नाट्यगृहे, नोबल इन्स्टिट्यूट, कॅथीड्रल, १८११ साली स्थापन झालेले विद्यापीठ, विविध संग्रहालये इ. प्रसिद्ध आहेत. येथील पुळणी, उद्याने, व्हायकिंग संस्कृतीचे अवशेष व येथून उत्तरेकडे जाऊन पहावयाचा मध्यरात्रीचा सूर्य यांकरिता येथे प्रवासी येतात.

ओक, द. ह.