नॉरफॉक : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील व्हर्जिनिया राज्याचे याच नावाच्या परगण्यातील सर्वांत मोठे शहर व अटलांटिक महासागरावरील प्रमुख बंदर.लोकसंख्या ३,०७,९५१ (१९७०). या राजकीय दृष्ट्या स्वतंत्र शहराचे क्षेत्रफळ सु. ९६ चौ. किमी. असून, त्यापैकी सु. २६ चौ. किमी. पाण्याखाली आहे. हे रिचमंड व वॉशिंग्टन डी. सी. यांच्या आग्नेयीस अनुक्रमे १४५ आणि ३३१·५ किमी., हॅम्प्टन रोड्‌स खाडीच्या दक्षिणेस, एलिझाबेथ नदीवर वसले आहे. व्हर्जिनियाच्या सरकारने १६८२ मध्ये निकोलस वाइझ या सुताराकडून, ४,५०० किलो तंबाखू देऊन नगर बसविण्यासाठी हा भाग विकत घेतला होता. १८४५ मध्ये यास शहराचा दर्जा मिळाला. अमेरिकन क्रांतीच्या वेळी हे पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाले होते. क्रांतीनंतर मात्र याची मोठ्या प्रमाणात भरभराट झाली. सध्या हे व्यापार, उद्योग, जहाजवाहतूक आणि वितरणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. येथील पर्यटन-उद्योगही मोठा फायदेशीर आहे. हे मोक्याच्या ठिकाणी वसलेले बंदर असून, येथून इग्लंड व वेस्ट इंडिज यांच्याशी मोठ्या प्रमाणात व्यापार चालतो. तंबाखू, कोळसा व खनिज तेल या निर्यातीच्या महत्त्वाच्या वस्तू आहेत. जहाजबांधणी व दुरूस्ती, रेल्वे कर्मशाळा, मांस व मासे डबाबंद करणे, मद्ये व तेले, खते, सिमेंट, ओतशाळा, यंत्रे, रसायने, कपडे, चटया व स्प्रिंगा यांचे येथे प्रमुख उद्योगधंदे आहेत. शैक्षणिक व सांस्कृतिक सोयींमध्ये सार्वजनिक, खाजगी व धार्मिक शाळा ओल्ड डोमिनियन विद्यापीठ, महाविद्यालये, व्हर्जिनिया तंत्रनिकेतन, ग्रंथालये, वस्तूसंग्रहालये, नॉरफॉक सिंफनी ऑर्केस्ट्रा, लिट्ल थिएटर व इतर कलासंस्था यांचा समावेश होतो. येथे ४६ हे. क्षेत्राचे लाफायेत उद्यान प्रसिद्ध असून त्यात वनस्पतिसंवर्धन उद्यान महत्त्वाचे आहे. तसेच ३४ हे. क्षेत्राचे अझेलिया गार्डन पार्क, प्राणिसंग्रहालय, समुद्रस्नानाकरिता पुळणी, १८,००० प्रेक्षक बसू शकतील असे प्रेक्षागार व खेळांची मैदाने इ. करमणुकीच्या सोयी येथे आहेत. सेंट पॉल चर्च व नॉरफॉक किल्ला या येथील प्रेक्षणीय वास्तू आहेत. शहराचा कारभार नगरपालिकेमार्फत चालतो. येथे नाविक आणि वैमानिक तळ व अटलांटिक नौदलाची मुख्य कचेरी असून, देशाच्या व व्हर्जिनिया राज्याच्या काही शासकीय कचेऱ्या आहेत.

कांबळे, य. रा.