साव्हॅना नदी : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी जॉर्जिया राज्यातील एक प्रमुख नदी. तुगॅलू आणि सेनेका या दोन नद्यांच्या हार्टवेल डॅम येथील संगमानंतर ती साव्हॅना नदी म्हणून ओळखली जाते. तिची एकूण लांबी ५०५ किमी. आहे. ही आग्नेयवाहिनी नदी जॉर्जिया व साऊथ कॅरोलायना राज्यांची सरहद्द बनली असून ती ऑगस्टा व साव्हॅना शहराजवळून वाहत जाते व शेवटी अटलांटिक महासागरास मिळते. ब्रॉड, लिट्ल व ब्रायर क्रीक या तिच्या मुख्य उपनद्या आहेत. साव्हॅना नदी तिच्या मुखापासून ऑगस्टापर्यंत पडाव व होडीच्या वाहतुकीसाठी तर साव्हॅना शहराच्यावर ८ किमी. पर्यंत मोठ्या जहाजांसाठी नौसुलभ असते. या नदीचा उपयोग मुख्यतः जलविद्युत्‌निर्मिती केंद्रासाठी, जलवाहतुकीसाठी, करण्यात येतो. हार्टवेल व क्लार्क हिल ही धरणे या नदीवर आहेत. तसेच अमेरिकेचा अणुशक्ती आयोगाचा साव्हॅना नदी प्रकल्प दक्षिण कॅरोलायनात साव्हॅना नदीवर आहे.

साव्हॅना इंडियन्स या जमातीवरून किंवा स्पॅनिश सबाना म्हणजे सपाट प्रदेश या अर्थाने या नदीस साव्हॅना नदी असे नाव पडले असावे. स्पॅनिश समन्वेषकांनी या नदीस रिओ डुलसे म्हणजे गोड नदी असे म्हटले आहे.

कुंभारगावकर, य. रा.