मुर्वारा : (कटनी). भारतातील मध्य प्रदेश राज्याच्या जबलपूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या ७७,८६२ महानगरीय १,२३,०१७ (१९८१). हे जबलपूरच्या ईशान्येस ८८ दक्षिण कटनी नदीच्या तीराजवळ वसले असल्याने ते कटनी या नावानेही ओळखले जाते. भातसडीच्या व पिठाच्या गिरण्या, मुलतानी माती प्रक्रिया, लष्करी साहित्य, सिमेंट, साबण, वीट उत्पादन, रंग, मातीची भांडी, धातूची भांडी, पादत्राणे इ. अनेक उद्योगधंदे येथे चालतात. सांप्रतच्या शहरातील कटनी व मुर्वारा या दोन्ही भागांत सध्या उद्योगधंद्यांत व व्यापारात वेगाने वाढ होत आहे.

शहराचे मुर्वारा हे नाव मुंड (डोके) या शब्दावरून आले. एका स्थानिक धनिकाचा येथील लढाईत शिरच्छेद झाला होता. त्याच्या स्मृत्यर्थ मुर्वारा हे नाव देण्यात आले.

शहरालगतचा बॉक्साइट आणि चुनखडक खाणकाम व्यवसाय महत्त्वाचा आहे. अलाहाबाद-इटारसी या मध्य रेल्वेच्या प्रमुख फाट्यावरील लोहमार्ग प्रस्थानक असून ते बीना व बिलासपूरशी लोहमार्गांनी जोडलेले आहे. १८७४ मध्ये नगरपालिकेची स्थापना झाली. हे प्रसिद्ध व्यापारी केंद्र असून येथे एक औद्योगिक विद्यालय आहे.

चौधरी, वसंत