डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया : अमेरिकेची संयुक्त संस्थाने या संघराज्याच्या वॉशिंग्टन राजधानीने व्यापलेला प्रदेश. क्षेत्रफळ १७८·७ चौ. किमी. त्यापैकी २३ चौ. किमी. पाण्याखाली. लोकसंख्या ७,५६,५१० (१९७०).

भूवर्णन : याच्या दक्षिणेस, पूर्वेस व उत्तरेस मेरिलंड व पश्चिमेस व्हर्जिनिया ही राज्ये असून पश्चिमेस व्हर्जिनियाच्या सरहद्दीवर पोटोमॅक नदी आहे. या नदीत सागरी नौका येऊ शकतात. तिला या प्रदेशात मिळणाऱ्या ॲनाकॉस्टीआ नदीमध्ये सागरी भरती येऊन पोचते. वायव्येस पोटोमॅकला ईशान्येकडून येऊन मिळणारी रॉक क्रीक नदी आहे. नदीकिनाऱ्यांपासून काही अंतरापर्यंतचा भाग सपाट व दलदलीचा असून बाकीच्या प्रदेशात लहान उंचवटे व टेकड्या आहेत. पात्रात मोठमोठे खडक असलेल्या रॉक क्रीककाठचे निसर्गसौंदर्य प्रेक्षणीय आहे. प्रदेशाची समुद्रसपाटीपासून उंची ३ ते ११० मी. असून उन्हाळ्यात आर्द्रता व उष्णता बरीच असते, पण हिवाळा मात्र सौम्य असतो. तापमान किमान १·३° से. व कमाल २१° से. आणि वार्षिक पर्जन्य सरासरी ५१ सेंमी. असतो. येथे १,८०० जातींची फुलझाडे व २५० प्रकारची स्थानिक झुडुपे असून असंख्य भागांतून आयात केलेल्या अनेक वनस्पती आहेत.

इतिहास व राज्यव्यवस्था : १७८७ मध्ये अमेरिकन राज्यघटनेने राष्ट्राच्या राजधानीसाठी सु. २६० चौ. किमी. (१० मै. X १० मै. = १०० चौ.मै.) मुलुख घेऊन विधानसभांच्या नियंत्रणाखाली तो ठेवावा असे ठरविले. १७९१ मध्ये राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टनने जागा पसंत करून नवी राजधानी उभारण्यासाठी आयुक्त नेमले. मेरिलंडने १७९१ मध्ये दिलेले जॉर्ज टाउन व व्हर्जिनियाने १७८९ मध्ये दिलेले ॲलेक्झांड्रिया यांचा समावेश होणारे क्षेत्र नक्की ठरून अँड्र्यू एलिकॉटने सीमांचे सर्वेक्षण केले आणि प्येर चार्ल्‌स लान्फान याने राजधानीचा आराखडा आखला. १८०० साली अध्यक्ष जॉन ॲडम्सच्या कारकीर्दीत संघराज्याचे शासनकेंद्र फिलाडेल्फियाहून वॉशिंग्टनला हलविण्यात आले. व्हर्जिनियाने प्रथम दिलेली भूमी १८४६ मध्ये परत मागून घेतली त्यामुळे पोटोमॅकच्या ईशान्य तीरापलीकडील मेरिलंडने दिलेल्या भूमीएवढाच हा प्रदेश शिल्लक राहिला. १८०२ पासून विधिमंडळाच्या मान्यतेने राजधानीचा कारभार राष्ट्राध्यक्षाने नेमलेला महापौर, नगरवासीयांनी निवडलेल्या आठ आल्डरमेनांचे बोर्ड व बाराजणांचे कौन्सिल या मंडळाच्या साहाय्याने पाहत असे. महापौर निवडण्याचा हक्क १८१२ मध्ये कौन्सिलला व १८२० मध्ये नागरिकांस मिळाला. १८७१ मध्ये ‘डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया’ या नावाने हा प्रदेश एक वेगळा राज्यघटक झाला. तेव्हा अध्यक्षाने नेमलेला राज्यपाल, सार्वजनिक कामांसाठी नेमलेले एक मंडळ, अध्यक्षाने नेमलेले ११ सदस्यांचे कौन्सिल व लोकांनी निवडलेले २२ सदस्यांचे प्रतिनिधिगृह अशी व्यवस्था चालू झाली. देशाच्या प्रतिनिधिगृहात या जिल्ह्याचा अध्यक्षाने नेमलेला, मताधिकार नसलेला एक प्रतिनिधी असे. १८७४ मध्ये नवीन व्यवस्था आली, तिच्या अन्वये सिनेटच्या संमतीने राष्ट्राध्यक्षाने नेमलेले दोन मुलकी व एक सैनिक एंजिनिअर दलातील आयुक्त कारभार पाहत. आयुक्तांचे अधिकारही सर्वव्यापी नव्हते. अनेक बाबी केंद्राने नेमलेली स्वायत्त मंडळे, आयोग वगैरेंकडे सोपविलेल्या असत. १८७४ च्या विधानाने राजधानीतील नागरिकांचे मताधिकार काढून घेतले. १९६१ मध्ये राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीपुरते मताधिकार परत मिळाले.

 तथापि लोकसंख्येची प्रचंड वाढ आणि त्याबरोबरच बिकट होत जाणाऱ्या नागरी समस्या यांमुळे आयुक्तांचा कारभारही कठीण होऊ लागला. तेव्हा १९६७ मध्ये सर्व कार्यकारी अधिकार अध्यक्षाने नेमलेल्या एका महापौर-आयुक्ताकडे व त्याच्या साहाय्यकाकडे सुपूर्त करण्यात आले व वैधानिक अधिकार कौन्सिलकडे सोपविण्यात आले. या डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया कौन्सिलचे अध्यक्षाने नेमलेले नऊ सभासद असून त्यांपैकीच एक त्याचा अध्यक्ष व एक उपाध्यक्ष असतो. तथापि अद्याप येथील नागरिकांस स्थानिक स्वराज्याचे अधिकार नाहीतच.

पहा : वॉशिंग्टन डी. सी.

ओक, शा. नि.