सुरिनाम : रिपब्लिक ऑफ सुरिनाम. दक्षिण अमेरिका खंडाच्याउत्तर किनाऱ्यावरील एक देश. याचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तारअनुक्रमे २° उ.  ते ६° उ. व ५४° प. ते ५८° प. असा असून त्याच्याउत्तरेस अटलांटिक महासागर तर पूर्वेस फ्रेंच गियाना,दक्षिणेस ब्राझीलव पश्चिमेस गुयाना हे देश आहेत. लोकसंख्या – ५,६०,१५७ (२०१२). क्षेत्रफळ १,६३,२६५ चौ. किमी. असून लगतच्या गुयाना देशाच्याआग्नेय भागातील १५,००० चौ. किमी. क्षेत्रावर आणि फ्रेंच गियानाच्यानैर्ऋत्य भागातील लिटानी वमारॉनी नद्यांदरम्यानच्या ५,००० चौ. किमी.क्षेत्रावर सुरिनामने हक्क सांगितलेला आहे. देशाचा ईशान्य – नैर्ऋत्य विस्तार ६६२ किमी. व आग्नेय-वायव्य विस्तार ४८७ किमी. आहे. यालाएकूण २,१५० किमी. लांबीची सरहद्द असून ३८६ किमी. लांबीचाअटलांटिक महासागर किनारा लाभला आहे. ⇨ पॅरामॅरिबो  (लोकसंख्या२,४४,९४६-२०११) ही देशाची राजधानी आहे.

भूवर्णन : सुरिनामचे प्रमुख चार नैसर्गिक विभाग पडतात. त्यांमध्येकिनारपट्टीचे मैदान, मध्यवर्ती मैदान, दक्षिणेकडील पर्वतीय प्रदेश आणिनैर्ऋत्य भागातील सॅव्हाना प्रदेशाचा समावेश होतो. सुरिनामच्या उत्तरकिनाऱ्यावर किनारपट्टीचे अरुंद मैदान असून त्याचीलांबी सु. ३६४किमी. आहे. या प्रदेशाने देशाचे १६ टक्के क्षेत्र व्यापले आहे. त्याची रुंदी पूर्व भागात सु. १५ किमी. तर पश्चिम भागात सु. ८० किमी. आहे. यातीलबराचसा भाग समुद्रसपाटीला आहे. येथील जमिनीच्या वापरासाठी बांधघालणे गरजेचे असते. दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहांमुळे संचयन झालेल्यावाळूचे व चिखलाचे दांडे किनाऱ्यावर आढळतात. किनारपट्टी मैदानाच्यादक्षिणेस मध्यवर्ती मैदानी प्रदेश असून तो समुद्रसपाटीला किंवा त्यापेक्षाहीकमी पातळीवर आहे. त्यामुळे बहुतांश भागदलदलयुक्त असून त्याचेजलनिःस्सारण करणे तसेच संरक्षक भिंती बांधण्याची आवश्यकता आहे.याचे उत्तरेकडील नवीन मैदानी प्रदेश व दक्षिणेकडील जुना मैदानीप्रदेश असे दोन भाग पडतात. निचरा न झालेल्या या भागात आर्द्रसॅव्हाना प्रकारचे जाडेभरडे उष्णकटिबंधीय गवत व अनेक प्रकारचे वृक्षआढळतात. दक्षिणेस उष्णकटिबंधीय वर्षारण्यांनी आच्छादलेले पर्वतीयप्रदेश आहेत. मध्यवर्ती असलेल्या गिरिपिंडापासून या पर्वतीय प्रदेशाचाविस्तार दक्षिणेस ब्राझील सरहद्दीपर्यंत झालेला आहे. देशाचे सु. ७५ टक्केक्षेत्र या प्रदेशाने व्यापले आहे. व्हिल्हेल्मीन पर्वताच्या पश्चिम भागातअसलेले ज्युलिॲनाटॉप हे सर्वोच्च शिखर (उंची १,२८० मी.) आहे.देशाच्या नैर्ऋत्य भागात तुलनेने कमी विस्तारित सॅव्हाना पठारी प्रदेशआहे. देशाच्या दक्षिण भागातील उच्चभूमी प्रदेशाकडून उत्तरेकडील किनारीमैदानी प्रदेशाकडे उतार आहे.

प्रदेशाचा उतार उत्तरेकडे असल्यामुळे देशातील बहुतेक सर्व नद्याउत्तरेस अटलांटिक महासागराकडे वाहत जातात. देशातून वाहणाऱ्या नद्यांपैकीकॉरंटाइन, निकेअरी, कॉपनाम, सॅरमॅक, सुरिनाम, कॉमवाईन व मारॉनी यासात प्रमुख नद्या आहेत. यांपैकी मारॉनी नदीने सुरिनाम-फ्रेंच गियानायांदरम्यानची काही सरहद्द, तर कॉरंटाइन नदीने गुयानाशी असलेली काहीसरहद्द निर्माण केली आहे. दक्षिणेकडील उच्चभूमी प्रदेशात नद्यांच्याप्रवाहमार्गात द्रुतवाह व धबधबे आढळतात. डब्लू. जे. व्हान ब्लॅमेस्टाईनहे देशातील सर्वांत मोठे सरोवर आहे.

हवामान : विषुववृत्ताजवळील स्थानामुळे सुरिनामचे हवामानवर्षभर उष्णकटिबंधीय आर्द्र स्वरुपाचे असते. वर्षभर समुद्राकडून वाहतयेणाऱ्या ईशान्य व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावामुळे दिवसाचे सरासरीतापमान २८°ते३२° से. तर रात्रीचे तापमान २१° से. असते, त्यामुळेतापमानकक्षा कमी राहते. कॅरिबियन समुद्रात निर्माण होणाऱ्या हरिकेनया विध्वंसक वादळाच्या टप्प्याबाहेर सुरिनामचे स्थान आहे. उत्तरेकडीलदाट लोकवस्तीच्या प्रदेशात प्रमुख चार ऋतू आढळत असून त्यांतीलकोणताही ऋतू पूर्णपणे आर्द्र किंवा कोरडा नसतो. डिसेंबरच्या सुरुवातीपासूनते फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत अल्प पावसाळा फेब्रुवारीच्यासुरुवातीपासून ते एप्रिल अखेर अल्प कोरडा ऋतू एप्रिल अखेरीपासूनमध्य ऑगस्टपर्यंत मुख्य पावसाळा, तर मध्य ऑगस्ट ते डिसेंबरच्यासुरुवातीपर्यंत मुख्य कोरडा ऋतू असतो. आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते.पर्वतीय प्रदेशात वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. ३०० सेंमी., वायव्यकिनारी भागात सु. १९० सेंमी. तर पॅरामॅरिबो येथे ते २२० सेंमी. असते.

सुरिनामचे सु. ९० टक्के क्षेत्र बहुजातीय उष्णकटिबंधीय वर्षारण्यांनीव्यापलेले असून त्यात सु. एक हजारांपेक्षा अधिक वनस्पति प्रकार आढळतात.अंतर्गत भागातील पर्वतीय प्रदेशात दाट अरण्ये असून बरेच अरण्यक्षेत्रमानवी हस्तक्षेपांपासून दूर राहिले आहे. देशातील अरण्ये जैवविविधतेच्यादृष्टीने समृद्घ आहेत. अंतर्गत भागापेक्षा किनारी प्रदेशात वृक्षांचे असंख्यप्रकार (सु. ४,०००) आढळतात. त्यांमध्ये असंख्य जातीचे नेचे, बीजवनस्पती, हरिता, शैवाल, तण, दहिया इ. महत्त्वाच्या जाती आहेत.किनाऱ्यावरील मचूळ पाण्याच्या क्षेत्रात विविध प्रकारची कच्छ वनश्रीआढळते. किनारी भागात वाढणाऱ्या बाबोएन वनस्पतींचा उपयोग प्लायवूडनिर्मितीसाठी केला जातो. येथील कपोक हे वृक्ष ४५ मी. पेक्षाही अधिकउंच वाढलेले दिसतात.

सुरिनाममध्ये सु. १५० जातींचे सस्तन प्राणी आढळतात. त्यांमध्येमाकडे, रानडुक्कर, मृग, पाणगाय, जॅगुआर, ओसिलाट, आर्मडिलो,अस्वल, मुंगीखाऊ प्राणी हे महत्त्वाचे प्राणी आहेत. टॅपिर हा येथीलसर्वांत मोठा भूचर सस्तन प्राणी आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये केइमन,घोरपड, अजगर हे प्रमुख आहेत. सुरिनामचा पूर्वेकडील किनारी पुळणींचाभाग हा सागरी कासवांचा प्रजनन प्रदेश असून तो कायद्याने संरक्षितठेवला आहे. देशात सु. ६५० पेक्षा अधिक जातींचे पक्षी आढळत असूनत्यांमध्ये गाणारे पक्षी, गिधाड, पोपट हे महत्त्वाचे आहेत. देशाच्यासागर किनारी भागात तसेच अंतर्गत जलाशयांत सु. ३५० जातींचेमासे सापडतात.

इतिहास व राजकीय स्थिती : सुरिनेन हे सुरिनाममधील मूळरहिवासी असून त्यांच्यावरुनच देशाला सुरिनाम हे नाव पडले आहे.सोळाव्या शतकापूर्वी इतर अमेरिकन इंडियन गटांनी सुरिनेन लोकांना येथूनपिटाळून लावले. क्रिस्तोफर कोलंबसाने १४९८ मध्ये येथील किनारापाहिला, तेव्हापासून यूरोपियनांना येथील प्रदेशाची माहिती झाली. स्पॅनिशसमन्वेषक व्हिथेंते यान्येथ पिंथॉन इ. स. १५०० मध्ये या प्रदेशातआला होता. सतराव्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकात स्पॅनिश, डच,ब्रिटिश व फ्रेंचानी येथे वसाहती स्थापण्याचे प्रयत्न केले परंतु स्थानिकइंडियन लोकांच्या प्रतिकारामुळे ते प्रयत्न निष्फळ ठरले. ब्रिटिश मळेवाल्यांनीआपल्या गुलामांसह इ. स. १६५१ मध्ये येथे वसाहत स्थापन केली. हीचयूरोपियनांची येथील पहिली कायमस्वरुपी वसाहत होय. इ. स. १६६७मध्ये इंग्लंड व युनायटेड नेदर्लंड्स यांच्यात झालेल्या ब्रेडा करारानुसारसुरिनामचा ताबा डचांकडे आला. १७९९–१८०२ आणि १८०४–१५ याकालावधीमधील ब्रिटिश सत्ता वगळता सुरिनामच्यास्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत(१९७५) सुरिनामवर नेदर्लंड्सची (डचांची) सत्ता राहिली. इ. स. १६८२मध्ये डच वेस्ट इंडिया कंपनीने येथे कॉफी व ऊस मळ्यांची लागवडकेली आणि त्यांमध्ये काम करण्यासाठी आफ्रिकन गुलाम आणले.अठराव्या शतकात सुरिनामकॉफी, ऊस, कोको, कापूस, नीळ व लाकूडउत्पादनासाठी महत्त्वाचा होता.


 एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत एकूण लोकसंख्येत आफ्रिकेतूनआणलेल्या गुलामांचीच संख्या अधिक होती, तर गोऱ्या लोकांमध्येडचांशिवाय पोर्तुगाल, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी व ग्रेट ब्रिटनमधूनआलेले लोक होते. १८५३ मध्ये येथील मळ्यांमध्ये काम करण्यासाठीकंत्राटी कामगार म्हणून चिनी व मँड्रिन लोकांना आणले. सुरिनाममधीलगुलामगिरी १ जुलै १८६३ रोजी बंद करण्यात आली. त्यामुळे मळ्यांमध्येकाम करण्यासाठी हिंदुस्थान (ईस्ट इंडियन), इंडोनेशियातील जावामधूनकंत्राटी कामगार आणण्यात आले.

सुरिनाममध्ये १८१५ मध्ये पहिल्यांदा बॉक्साइट खाणीचा शोधलागला. अल्कोआ या अमेरिकन ॲल्युमिनियम कंपनीने इ. स.१९१६ मध्ये येथील नव्याने सापडलेल्या बॉक्साइटाच्या उत्पादनाससुरुवात केली. दुसऱ्या महायुद्घकाळात मळ्याच्या शेतीचे महत्त्व कमीहोऊन बॉक्साइट उत्पादनास विशेष महत्त्व प्राप्त झाले. बिलिटोन ही डचखाणकाम कंपनी १९३९ मध्ये सुरिनाममध्ये आली. सुरिनामच्या विकासासाठी नेदर्लंड्सने १९४८ पासून विकास निधी देण्यास सुरुवात केली.

युद्घोत्तरकाळात देशात वांशिक गटांवर आधारित वेगवेगळ्या राजकीयपक्षांची स्थापना करण्यात आली.त्यांपैकी क्रीओलांनी सुरिनाम नॅशनलपार्टी व दी प्रोग्रेसिव्ह सुरिनाम पीपल्स पार्टी या पक्षांची, तसेच हिंदुस्थानीआणि इंडोनेशियन लोकांनी अनुक्रमे युनायटेड हिंदू पार्टी (प्रोग्रेसिव्हरिफॉर्म पार्टी ) व इंडोनेशियन पीझन्ट्स पार्टी या पक्षांची स्थापना केली.

डचांनी सुरिनामला विदेशी धोरण व संरक्षण वगळता अंतर्गतकारभाराबाबत स्वायत्तता दिली (१९५४). नेदर्लंड्सकडून होणाऱ्यामदतीत हळुहळू वाढ होऊ लागली. सुरिनाम यूरोपियन इकॉनॉमिककम्युनिटीचा (ईईसी) सहसदस्य झाला (१९६४). त्यामुळे ईईसीकडूनही मदत मिळू लागली. परिणामतः १९६० च्या दशकात सुरिनामचाआर्थिक विकास दर वाढला. ॲल्युमिना व ॲल्युमिनियमउत्पादनातहीलक्षणीय वाढ झाली. १९७० च्या दशकात क्रीओलांनी सुरिनामच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरु केली परंतु हिंदुस्थानींनी स्वातंत्र्य-प्राप्तीला विरोध केला आणि त्यातूनच पहिल्यांदा सुरिनाममध्ये वांशिकसंघर्षाला तोंड फुटले.

सुरिनामला २५ नोव्हेंबर १९७५ रोजी स्वातंत्र्य मिळाले. स्वांतत्र्याच्यावेळी हे संसदीय प्रजासत्ताक होते परंतु १९८० मध्ये डेझीरे बटर्सच्यानेतृत्वाखाली लष्करी उठाव होऊन शासन उलथवून टाकण्यात आलेआणि नॅशनल मिलिटरी कौन्सिलची स्थापनाकरण्यात आली. लष्करीराजवटीने राजकीय पक्षांवर बंदी घातली. संसद बरखास्त करुनसंविधान रद्द केले. १९८१ मध्ये नव्या समाजवादी शासनाची घोषणा केलीगेली परंतु लोकशाही संघटना व लष्करी शासनाच्या विरोधातील इतर संघटनांनी एकत्र येऊन या शासनाला प्रचंड विरोध केला.डिसेंबर १९८२ मध्ये १५ प्रसिद्घ नागरिकांना फाशी दिल्यामुळे लष्करीराजवटीला असलेला विरोध विकोपाला गेला. फाशी दिलेल्या काहीव्यक्ती लोकशाही संघटनांचे नेते होते. त्यामुळे अमेरिकेची संयुक्त संस्थानेव नेदर्लंड्स यांनी सुरिनामला द्यावयाचा विकासनिधी त्वरित थांबविला.१९८५ मध्ये नॅशनल असेंब्लीची स्थापना करण्यात आली. १९८७ मध्येनिर्वाचित शासनाने बहुमताने नवीन संविधानाला मान्यता दिली. तसेचलष्करी नेत्यांनी निवडणूक घेण्यास परवानगी दिली नवीन संविधानानुसारनॅशनल असेंब्ली ही नवी संसद अस्तित्वात आली परंतु प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या लष्करी दबाव कायम राहिला. त्यानंतरकृष्णवर्णीयांनी केलेल्याउठावामुळे पुन्हा देशात अस्थिरता निर्माण झाली.

लोकशाही नॅशनल असेंब्ली १९८८ मध्ये सत्तेवर आली. नॅशनलअसेंब्लीने राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्षांची निवड केली परंतु १९९०मध्ये पुन्हा एकदा लष्करी उठाव होऊन लष्करी अधिकाऱ्यांनी नागरीसरकारला राजीनामा देण्यास भाग पाडले परंतु संयुक्त संस्थाने,नेदर्लंड्स, फ्रान्स इत्यादींकडून राजकीय दबाव वाढल्यामुळे १९९१ मध्येनिवडणुका घेण्यात आल्या. त्यावेळी रुनाल्डो रोनाल्ड व्हेनेशियन हेराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. २००५ मध्ये झालेल्या निवडणुकीतराष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची फेरनिवड झाली. उपराष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान म्हणूनराम सार्दजोए निवडून आले.

सुरिनामच्या ३० सप्टेंबर १९८७ रोजी अंमलात आलेल्या संविधानानुसार नॅशनल असेंब्लीत ५१ सदस्य असतात. देशाचे घटनात्मक प्रमुखराष्ट्राध्यक्ष असून नॅशनल असेंब्लीकडून दोन तृतीयांश बहुताने राष्ट्राध्यक्षांची पाच वर्षांसाठी निवड केली जाते. राज्यकारभाराच्यासोयीसाठीदेशाची दहा जिल्ह्यांमध्ये विभागणी केली आहे.

आर्थिक स्थिती : सुरिनामची विकसनशील मिश्र अर्थव्यवस्थाअसून त्यात सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्राचाही सहभाग आहे. बॉक्साइटाचे उत्खनन, त्यापासून ॲल्युमिना व ॲल्युमिनियमची निर्मिती, सेवाव्यवसाय व कृषी ही अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रे आहेत. एकूण स्थूलराष्ट्रीय उत्पादनापैकी ११·१ टक्के उत्पादन कृषी क्षेत्रातून, १९·६ टक्केऔद्योगिक क्षेत्रातून तर ६९·३ टक्के सेवा व्यवसायांपासून मिळत होते(२००२). शेती हा उदरनिर्वाहाचा प्रमुख व्यवसाय आहे. प्रामुख्यानेकिनारी प्रदेशात शेती व्यवसाय केंद्रित झाला असून एकूण कामकरीलोकसंख्येपैकी एक षष्ठमांश लोक या व्यवसायात गुंतले आहेत. सुमारे५७,००० हे. क्षेत्र मशागतयोग्य असून सु. १०,००० हे. क्षेत्र कायमपिकांखाली होते. (२००२). तांदूळ हे प्रमुख कृषी उत्पादन असूनजास्तीच्या तांदळाची निर्यात केली जाते. केळी, ऊस, नारळ, संत्री, द्राक्षे,कॉफी ही मुख्य नगदी पिके आहेत. २००२ मध्ये प्रमुख कृषी उत्पादनेपुढीलप्रमाणे झाली (उत्पादन हजार टनांमध्ये) : तांदूळ १६३, ऊस १२०,संत्री ११, केळी ११, नारळ १०, कसाव्हा ४.

देशात पशुपालन व्यवसाय मर्यादित प्रमाणात चालतो. येथील पशुधनपुढीलप्रमाणे आहे : गुरे १,७०,०००, डुकरे २४,०००, मेंढ्या ८,०००,शेळ्या ७,०००, कोंबड्या ४ द. ल. (२००३ अंदाज). मत्स्योत्पादन३९,९४९ टन असून ते प्रामुख्याने सागरी मासेमारीतून मिळते (२००५).कोळंबी व झिंगा यांचे उत्पादन मोठे असून त्यांच्या निर्यातीपासून मोठे परकीय चलन मिळते.


 देशाच्या एकूण भूक्षेत्रापैकी सु. ९० टक्के क्षेत्र अरण्यांखाली असून,जगातील अरण्यांखाली सर्वाधिक शेकडा प्रमाण असलेल्या देशांपैकी हाएक देश आहे. लाकूडतोड व्यवसाय काही प्रमाणात चालत असून, लाकडीओंडक्याचे उत्पादन १,५०,७६५ घ. मी. आहे (२००२). लाकडाचीनिर्यातही केली जाते. वनोद्योगावर शासनाचे नियंत्रण आहे.

खाणकाम उद्योग हा परकीय चलन मिळवून देणारा एक महत्त्वाचास्रोत आहे. बॉक्साइट हे सुरिनामधील सर्वांत महत्त्वाचे खनिज उत्पादनअसून, याच्या उत्पादनात सुरिनामचा जगात सातवा क्रमांक लागतो.ईशान्य भागातील मुंगो आणि सुरिनाम नदीच्या खोऱ्यातील पारानाम हीबॉक्साइट उत्पादनाची प्रमुख क्षेत्रे आहेत. काही बॉक्साइटावर देशातचप्रक्रिया करुन त्यापासून ॲल्युमिना वॲल्युमिनियमचे उत्पादन घेतलेजाते. कच्च्या बॉक्साइटाची निर्यात मोठी आहे. एकेकाळी सोने उत्पादनमहत्त्वाचे होते परंतु अलीकडे त्याचे उत्पादन घटले आहे. लोहखनिज वइतर खनिजांचे उत्पादन मर्यादित प्रमाणात घेतले जाते. २००४ मध्ये४२,१७,००० टन बॉक्साइट उत्पादन झाले. देशात खनिज तेलाचे साठे७४ द. ल. पिंपे (२००२) असून प्रत्यक्ष उत्पादन ४०,९८,४६३ पिंपेझाले होते (२००४). विद्युत्‌शक्तीचे उत्पादन १·५१ अब्ज किवॉ. तासअसून दरडोई विजेचा वापर ३,४३७ किवॉ. तास होता. (२००४). नद्यांवरधरणे बांधून जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्प उभारले आहेत.सुरिनाम नदीवरउभारलेल्या बोक्रोपाँदो जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्पातील वीजपारानामामधीलबॉक्साइट शुद्घीकरण प्रकल्पाला पुरविली जाते.

कारखानदारी क्षेत्रात देशातील एकूण कामकरी लोकांपैकी सु.एक दशांश लोक गुंतले आहेत. बॉक्साइट शुद्घीकरण आणि त्यापासूनॲल्युमिना व ॲल्युमिनियम निर्मितीकरणे, अन्नप्रक्रिया, प्लायवूड वइतर लाकडी साहित्यनिर्मिती, भात सडणे, फळांपासून रसनिर्मिती,रंगनिर्मिती हे प्रमुख उद्योग येथे चालतात. देशातील औद्योगिकउत्पादने पुढीलप्रमाणे आहेत : (उत्पादन हजार टनांत) ॲल्युमिना २,१८१(२००७), इंधन तेल ३३५(२००४), सिमेंट ६५, ऊर्ध्वपतित इंधनतेल ३९(२००४) व कापीव लाकूड५७,००० घ. मी. (२००७).

यंत्रे व त्यांचे सुटे भाग, मोटारगाड्या, खनिज तेल, वंगण तेल वइतर इंधने, बांधकामाचे साहित्य इत्यादींची आयात, तर बॉक्साइट,ॲल्युमिना, ॲल्युमिनियम, सोने, कोळंबी, तांदूळ, संत्री, द्राक्षे, केळीव लाकूड यांची निर्यात केली जाते. संयुक्त संस्थाने, नेदर्लंड्स, नॉर्वे,त्रिनिदाद व टोबॅगो, जपान, कॅनडा, फ्रान्स या देशांशी सुरिनामचा व्यापारचालतो. एक तृतीयांशपेक्षा अधिक आयात संयुक्त संस्थानांकडून केलीजाते. नेदर्लंड्सकडून सुरिनामला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतहोते. सुरिनामचे एकूण आयात मूल्य ७४० द. ल. अमेरिकी डॉलर वनिर्यातमूल्य ७८२·२ द. ल. अमेरिकी डॉलर होते (२००४). निर्यातीपासूनमिळणाऱ्या एकूण उत्पन्नांपैकी ७७ टक्के उत्पन्न बॉक्साइट व बॉक्साइटउत्पादनांच्या निर्यातीपासून मिळते. सुरिनामला ८५,००० परदेशीपर्यटकांनी भेट दिली असून त्यामुळे ६२ द. ल. अमेरिकी डॉलर उत्पन्नमिळाले होते (२००२).

सेंट्रल बँक ऑफ सुरिनाम ही मध्यवर्ती बँक असून ती चलननिर्गमित करते. सुरिनाम डॉलर (एसआरडी) हे देशाचे अधिकृत चलनआहे. १०० सेंटचा एक सुरिनाम डॉलर होतो. १ जानेवारी २००४पासून सुरिनाम गिल्डर (एसआरजी) ऐवजी हे चलन अंमलात आणले.त्यावेळी १ सुरिनाम डॉलर = १००० सुरिनाम गिल्डर असे प्रमाणहोते. सुरिनामचे २००४ चे अंदाजपत्रक ११५७·८ द. ल. सुरिनामडॉलर महसुलाचे आणि १५४५·७ सुरिनाम डॉलर खर्चाचे होते.

सुरिनाममधील वाहतूक व्यवस्था विशेष समाधानकारक नाही. रस्त्यांचीएकूण लांबी ४,३०४ किमी. असून, त्यांपैकी २६·२ टक्के रस्ते फरसबंदीहोते (२००३). लोहमार्गांची लांबी फक्त ३०० किमी. आहे. देशातीलनद्या व कालवे माल आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.पॅरामॅरिबो हे प्रमुख बंदर असून तेथेच जोहान ॲडॉल्फ पेंगेल हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. डाकसेवा, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, आकाशवाणी,दूरचित्रवाणी, महाजालक इ. संदेशवहन सुविधा येथे उपलब्ध आहेत.आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रावर शासनाचे नियंत्रण असते. डच भाषेतूनअनेक दैनिक वृत्तपत्रे, तर चिनी भाषेतून काही नियतकालिके निघतात.

लोक व समाजजीवन : सुरिनामच्या लोकसंख्येत विविधवांशिक व सांस्कृतिक गट सामावलेले असून प्रत्येक समाजाने आपलेवेगळेपण कायम राखले आहे. एकूण लोकसंख्येत २६ टक्के भारतीय-पाकिस्तानी, १८ टक्के क्रीओल, १५ टक्के जावानीज, १५ टक्के बुश निग्रोज(कृष्णवर्णी ) व ४ टक्के अमेरिंडियन (अमेरिकी इंडियन) होते (२००४).त्यांशिवाय इतर ईस्ट इंडियन, चिनी, दक्षिण अमेरिकी इंडियन, डच हेलोकही आढळतात. येथील भारतीय व पाकिस्तानी लोक हे एकोणिसाव्याशतकात हिंदुस्थानमधून कंत्राटी मजूर म्हणून येथे स्थलांतर झालेल्यालोकांचे वंशज आहेत. यांना येथे हिंदुस्थानी किंवा ईस्ट इंडियन म्हणूनसंबोधले जाते. जावा बेटावरुन आलेल्या कंत्राटी मजुरांच्या वंशजांनाजावानीज असे म्हणतात. क्रीओल हे आफ्रिकन लोकांचे किंवा यूरोपियनव आफ्रिकन यांच्या संकरातून बनलेल्या लोकांचे वंशजआहेत. देशातीलकृष्णवर्णीय बुश निग्रो म्हणून ओळखले जातात. सतराव्या व अठराव्याशतकांत आफ्रिकेतून गुलाम म्हणून आणलेल्या मरुन लोकांचे ते वंशजआहेत. पूर्वीप्रमाणेच ते देशाच्या अंतर्गत भागात असून, ते पश्चिम आफ्रिकेतील आदिवासी लोकांच्या चालीरीती, रुढी, परंपरा, धर्म पाळतात. स्थलांतरितशेती, मासेमारी व शिकार हे त्यांचे व्यवसाय आहेत. हिंदुस्थानी लोकमुख्यतः शेती व्यवसायात, जावानीज लोक डचांची मालकी असलेल्यामळ्यांत कामगार म्हणून, तर क्रीओल लोक राजकारण, किरकोळ व्यापारव धंद्यामध्ये गुंतलेले आहेत. अमेरिंडियन जमातीच्या लोकांची संख्या घटतअसून ते प्रामुख्याने नद्यांच्या काठावर आणि किनारी प्रदेशांत राहतात.त्यांची जीवनशैली परंपरागत आहे.


 सुरिनाममध्ये ख्रिस्ती धर्म हा प्रमुख असून त्याखालोखाल हिंदू वइस्लाम धर्मीय आहेत. क्रीओल लोक रोमन कॅथलिक किंवा प्रॉटेस्टंटपंथीय आहेत. हिंदुस्थानी लोक हिंदू किंवा मुस्लिम असून, इंडोनेशियनलोक मुस्लिम आहेत. देशात पूर्णपणे धार्मिकस्वातंत्र्य आहे. पूर्वीच्याकाळी येथे स्थलांतरित झालेल्या हिंदुस्थानींमध्ये प्रसूतिमान जास्तराहिल्यामुळे, तसेच लोकसंख्या वाढीचा दर अधिक राहिल्यामुळे  क्रीओलांपेक्षा त्यांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण वाढले. १९७० च्यादशकात नेदर्लंड्सकडे मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतरामुळे सुरिनामची लोकसंख्या घटली होती. डच ही अधिकृत भाषा असूनत्याशिवाय इंग्रजी, स्रनान (क्रीओल), हिंदी, चिनी, पिजन इंग्लिश, फ्रेंच,स्पॅनिश, जावानीज तसेच इतर आशियाई, आफ्रिकन व अमेरिकन इंडियनया भाषा बोलल्या जातात. वरील बोलीभाषांचा वापर दैनंदिन व्यवहारात प्रामुख्याने जनभाषा म्हणून केला जातो.

सुरिनामची सु. ९० टक्के लोकसंख्या किनाऱ्याजवळील मैदानी प्रदेशातकेंद्रित झाली असून, त्या लोकसंख्येपैकी सु. ४९ टक्के लोक पॅरामॅरिबोशहरात राहतात.लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स ३ व्यक्ती इतकीकमी होती (२००४). सुरिनाम हा गरीब देश असून ७० टक्के लोक दारिद्र्यरेषेखालील होते (२००२). अंतर्गत भागातराहणारे लोक अजूनहीप्राथमिक अवस्थेत राहतात. पुरापासून संरक्षणाच्या दृष्टीने उंच जोत्यावरउभारलेल्या लाकडी घरात राहतात. दर हजारी जन्मदर २०, मृत्यूदर६·६(२००३) व बालमृत्युमान ३०(२००५) होते. लोकसंख्यावाढीचा दर १·४ टक्के (१९९२–२००४) होता. सरासरी आयुर्मानसु. ६९ वर्षे असून ते पुरुषांबाबत ६५·९ वर्षे तर स्त्रियांबाबत ७२·६वर्षे होते. (२००३). सरासरी प्रसूतिमान प्रतिस्त्री २·६ मुले (२००४)होते देशात गर्भपात बेकायदेशीर आहे. मुलींचे व मुलांचे विवाहाचे वयअनुकमे १३ व १४ वर्षे इतके कमी आहे. कमी प्रसूतिमान, मर्यादितआप्रवासन यांमुळे सुरिनामची लोकसंख्या संथ गतीने वाढत आहे.

सुरिनाम शासन काही प्रमाणात आरोग्य सुविधा पुरवीत असले, तरीआर्थिक अडचणींमुळे प्रभावी आरोग्य सुविधा देणे शक्य होत नाही.त्यामुळे कुपोषण, जंतविकार, श्वसनाचे विकार, जठरांत्रीय व्याधी, मलेरिया,डेंग्यू, विषमज्वर, कॉलरा,अलर्करोग इ. आरोग्यविषयक समस्या सातत्याने उद्‌भवतात. देशातील सार्वजनिक रुग्णालयांमधील खाटांची संख्या१,६११(२००४) असून डॉक्टरांची संख्या २९५(२००३) होती.देशातील अनेक डॉक्टरांनी नेदर्लंड्सकडे स्थलांतर केलेले आहे.

देशातील ६ ते १२ वयोगटातील सर्व मुलांनाशिक्षण सक्तीचे वमोफत आहे. सप्टेंबर ते ऑगस्ट असे शैक्षणिक वर्ष असते. डच भाषा हेशिक्षणाचे माध्यम आहे. साक्षरतेचे सरासरी प्रमाण ८८ टक्के होते तेपुरुषांमध्ये ९२·३ टक्के तर स्त्रियांमध्ये ८४·१ टक्के आहे (२००३).निम्यापेक्षा अधिक विद्यार्थी खाजगी शाळांत शिक्षण घेतात. देशातील२९८ प्राथमिक शाळांत ३,०९६ शिक्षक व ६२,०८६ विद्यार्थी, १२४माध्यमिक विद्यालयांत ४१,९०४ विद्यार्थी (२००३-०४), विद्यापीठात२,७४५ विद्यार्थी व शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयात १,९४२ विद्यार्थीहोते (२०००-०१). पॅरामॅरिबो येथे अँतोन दे कोमविद्यापीठ आहे.देशातील बहुतेक उच्चशिक्षित लोक व्यवसायानिमित्त नेदर्लंड्समध्ये जातात.

सुरिनाममधील वेगवेगळे समाज आपापले सण व उत्सव साजरेकरतात. दिवाळी, होळी व गुढीपाडवा हे हिंदूचे सण, रमजान ईद (ईदउल्-फित्र), सूरिफ्लोरा हा वनस्पती व फुलोत्सव (एप्रिल-मे), सुरिनाममधील गुलामगिरी संपुष्टात आली त्यानिमित्त साजरा केला जाणारा(१ जुलै १८६३) केटी कोटी हा आफ्रो-सुरिनामीज सार्वजनिक स्मृतिदिन(१ जुलै), सुरिपॉप हा लोकप्रिय संगीत महोत्सव (जुलै), नॅशनलकुन्झ्तबेउर हा कला शिल्पोत्सव (ऑक्टो.-नोव्हें.), जारन केपांग हाजपानी नृत्योत्सव इ. साजरे केले जातात. १ जानेवारी हा नववर्ष दिनम्हणून पाळला जातो. पॅरामॅरिबो येथील सुरिनाम म्युझीअम ॲन्ड फोर्टझिलँडीआ, न्यू ॲम्स्टरडॅम येथील ओपन एअर म्युझीअम ही प्रमुखवस्तुसंग्रहालये आहेत. टेनिस, गोल्फ, बॅडमिंटन व इतर मैदानी खेळ येथेखेळले जातात. पॅरामॅरिबो येथील सुरिनाम आर्ट २०००, हायर आर्ट्स ॲन्डकल्चरल एज्युकेशनअकादेमी, रेडी टेक्स आर्ट बटिक या प्रमुखकलावीथी आहेत. फोर्ट झिलँडीआ येथे नोला हॅटरमॅन ही संस्था आहे.

महत्त्वाची स्थळे : सुरिनामच्या राजधानीचे ठिकाण असलेलेपॅरामॅरिबो हे देशातील सर्वांत मोठे शहर सुरिनाम नदीच्या मुखापासूनअंतर्गत भागात २४ किमी.वर वसले आहे. याशिवाय ब्रोकोपाँडो, न्यूॲम्स्टरडॅम, टोट्‌नेस, अल्बीना, नीऊ निकेअरिअ, ऑन्‌फर्व्हाख्त, ग्रोनिंगेन,लेलीडॉर्प ही इतर नगरे आहेत. युनेस्कोने मान्यता दिलेली ‘सेंट्रलसुरिनाम नेचर रिझर्व्ह’ (२०००) व पॅरामॅरिबो शहरातील ‘हिस्टॉरिकइनर भाग ही जागतिक वारसास्थळे आहेत. (चित्रपत्रे).

चौधरी, वसंत


राज्यपालांचे वासाहतिक वास्तुशैलीतील निवासस्थान, पॅरामॅरिबो.राजधानी पॅरामॅरिबो : सुरिनामचे गजबजलेले प्रमुख सागरी बंदर.सुरिनामचे स्थायिक जावानीजांचे पारंपरिक अश्वनृत्यवर्षारण्यातील जलवाहतूक : मारॉव्हाइन नदी, एक दृश्य.मारॉव्हाइन नदीकाठावरील जूक वसाहतसुरिनामच्या जंगल प्रदेशातील निग्रो जूक जमातीचा ड्रम - वादक