क्योटो : जपानच्या होन्शू बेटामधील दक्षिणेकडील क्योटो विभागाची राजधानी. लोकसंख्या १४,४०,००० (१९७३). हे कामो नदीकाठी टोकिओच्या ३६८ किमी. पश्चिमेस व ओसाकाच्या ४० किमी. ईशान्येस आहे. जपानमधील पाचव्या क्रमाकांचे हे शहर ७९४ १८६८ पर्यंत जपानची राजधानी असल्याने धर्म, शिक्षण, कला, संस्कृती, उद्योग इत्यादींचे हे अद्यापही केंद्र समजले जाते. भूकंप, आग आणि युद्ध यांमुळे हे शहर अनेक वेळा बेचिराख झाले आहे. ७९४ मध्ये हेआन शाखेचा सम्राट क्वामू याने आपली राजधानी नागाओकाहून येथे आणली ८१८ मध्ये क्योटोची लोकसंख्या ५,००,००० होती. निरनिराळ्या कारणांनी शहराच्या लोकसंख्येत बदल होत होता.

सरोवराकाठचे आरामगृह, क्योटो

रेशमी व इतर वस्त्रांवरील उत्कृष्ट भरतकाम, चिनी मातीची भांडी, लाखकाम, कास्यकाम, सोन्याचांदीचे दागिने, बाहुल्या यांसाठी क्योटो पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. रसायने, यंत्रसामग्री, कापड, छपाई इ. उद्योगांची विसाव्या शतकात भर पडली. परंपरागत संगीत, नाट्य व शिक्षण यांची केंद्रे क्योटोमध्ये असून ‘नो’ व ‘काबुकी’ नाट्यप्रकारांची खास रंगमंदिरे येथे आहेत. येथे दोन विद्यापीठे असून अनेक शैक्षणिक संस्था आहेत. क्योटोमध्ये अनेक प्रेक्षणीय बुद्धमंदिरे व बुद्धप्रतिमा (पैकी एक लाकडाची, सु. १९ मी. उंच), राजवाडे, उद्याने असून येथील राष्ट्रीय संग्रहालय जपानमधील महत्त्वाचे मानले जाते. येथून राजधानी पूर्वेकडील टोकिओला हलली असली, तरी राज्यारोहण समारंभ अद्याप येथेच होतात.

शाह, र. रू.