बीड जिल्हा: महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागातील जिल्हा. त्याचा विस्तार १८ २८’ ते १९ २७’ उ. अक्षांश व ७४ ५४’ ते ७६५७’पू. रेखांश यांदरम्यान असून क्षेत्रफळ ११,२२७ चौ.किमी.आहे.लोकसंख़्या १४,८४,४२४(१९८१).जिल्ह्याचे मुख्य ठिकाण बीड शहर (लोकसंख्या ८०,२८६) होय. बीड जिल्ह्याच्या पश्चिमेस अ‍हमदनगर, दक्षिणेस उस्मानाबाद, ईशान्येस परभणी व उत्तरेस औरंगाबाद व नवनिर्मित जालना हे महाराष्ट्रातील जिल्हे आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील अंबड, जालना, भोकरदन(उत्तरेकडील चौदा गावे वगळून),जाफराबाद (महाल) व परभणी जिल्ह्यातील परतुर या तालुक्यांचा मिळून जालना जिल्हा करण्यात आला आहे. (१ मे १९८१). बीड जिल्ह्याची उत्तर सीमा गोदावरी व दक्षिण सीमा मांजरा या नद्यांनी तयार होते. प्रशासनाच्या सोयीसाठी या जिल्ह्याचे आष्टी,पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज व आंबेजोगाई असे एकूण सात तालुके करण्यात आले आहेत.

भूवर्णन: भूरचनेच्या दृष्टीने या जिल्ह्याचे दक्षिणेकडील ‘बालाघाट’ पठाराचा उंच प्रदेश, उत्तरेकडील गोदावरी खोऱ्याचा सखल प्रदेश व नैर्ऋत्य आणि पश्चिमेकडील चढ-उताराचा प्रदेश असे तीन भाग पडतात. जिल्ह्याच्या मध्यभागतून पश्चिम सरह्द्दीपासून पूर्व सरह्द्दीपर्यत पसरलेली बालाघाट ही प्रमुख डोंगररांग होय.तिच्यामुळे जिल्ह्याचे उत्तरेकडील सखल प्रदेश व दक्षिणेकडील उंचवट्यांचा प्रदेश असे दोन भाग झाले आहेत. हे अनुक्रमे ‘गंगाथडी’ व ‘घाट’ किंवा ’ बालाघाट’ या स्थानिक नावांनी ओळखले जातात. हा पठारी प्रदेश दक्षिणेस मांजरा नदीपर्यत पसरलेला असून त्याची सस. पासून उंची ६०० ते ६५० मी. पर्यत आढळते. प्रदेशाचा उतार दक्षिणेकडे कमी होत जातो.बालाघाट डोंगररांगेची उंची पश्चिम भागात सर्वात जास्त असून ती पूर्वेस क्रमाक्रमाने कमी होत जाते. जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर (८८९ मी.) पश्चिमेस चिंचोलीजवळ असून या रांगेत ६०० ते ८५० मी. उंचीचीही काही शिखरे आहेत. बालाघाट डोंगराचा एक फाटा चिंचोलीजवळ सुरु होऊन नंतर आग्नेय दिशेने जातो. या फाट्यामुळे आष्टी व पाटोदा तालुक्यांदरम्यान नैसर्गिक सरहद्द निर्माण झाली आहे.या रांगेतच जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दीजवळ विंचरणा नदीवर सौताडा येथे प्रसिध्द धबधबा आहे.

उत्तरेकडील गोदावरी नदीखोऱ्याचा पश्चिम भाग सस. पासून साधारण ५५५ मी. उंचीचा असून पूर्वेकडे त्याची उंची ४०० मी. पर्यंत उतरत जाते. या सखल प्रदेशात मधूनमधून ६०० मी उंचीच्या काही टेकड्याही आढळतात. याच्या पश्चिम भागात गणोबा, चितोरा व सिंदफणा नदीच्या दक्षिण भागात नारायणगड इ. टेकड्या आहेत.

जिल्ह्याचा तिसरा भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडील सीना नदीखोऱ्याचा असून या प्रदेशात संपूर्ण आष्टी तालुक्याचा समावेश होतो.याचा दक्षिण भाग सु. ६०० मी.उंचीचा असून उत्तरेस ७५० मी. पर्यत उंची वाढत जाते. या प्रदेशात अनेक तुटकतुटक टेकडया आहेत. सीना नदीमुळे याच्या  दक्षिण भागाची झीज होऊन मूळचे स्वरुप बदलले आहे.

गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वायव्य-आग्नेय दिशेने वाहते. ही नदी बीड, औरंगाबाद, जालना व परभणी या जिल्ह्यांदरमान्यची सरहद्द बनली आहे. मांजरा ही जिल्ह्यातील दुसरी महत्त्वाची नदी असून ती जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून पश्चिम-पूर्व दिशेने वाहते. ही नदी पाटोदा तालुक्यात उगम पावते. सीना ही जिल्ह्याच्या नैर्ऋत्य सरहद्दीवरील नदी वायव्य-आग्नेय दिशेने वाहते. सिंदफणा ही गोदावरी नदीची उपनदी पाटोदा तालुक्यात उगम पावून पूर्वेस वहात जाते व परभणी जिल्ह्याच्या सरहद्दीजवळ मंजरथ येथे गोदावरी नदीस मिळते. या प्रमुख नद्यांशिवाय विंदुसरा, कुंडलिका या सिंदफणेच्या उपनद्यासरस्वती, वाण, लेंडी, अमृता, गुणवती इ. गोदावरीच्या उपनद्या, तर केज, रेना, चौसाला, लिंबा इ. मांजरा नदीच्या उपनद्या बालाघाट डोंगरात उगम पावून या जिल्ह्यात उत्तर व दक्षिण दिशांनी वाहतात. तलवार, कमळी, रूटी, मेहेकर इ. सीना नदीच्या उपनद्या व कुंटका, येळंबची, लमाणबुडवी, होळणा, उंदरी, विंचरणा इ. लहानमोठया नद्याही या जिल्ह्यात आहेत.

हा जिल्हा दख्खनच्या पठारी प्रदेशात असून गोदावरी नदीखोऱ्याचा प्रदेश अत्यंत सुपीक आहे. या प्रदेशात गडद करड्या व काळ्या रंगाची मृदा आढळते. या जमिनीत भेगा पडतात. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जमीन थोडी क्षारयुक्त असून क्षारांचे प्रमाण ५% आहे. नद्यांच्या काठी जमीन सुपीक, तर इतरत्र पातळ थराची व खडकाळ आढळते. माजलगाव तालुक्याच्या दक्षिणेकडील व केज तालुक्याच्या उत्तरेकडील जमीनही निकृष्ट प्रतीची आहे. आंबेजोगाई तालुक्यातील जमीन काळी कपाशीची व सुपीक आहे. हा जिल्हा खनिज संपत्तीच्या दृष्टीने अविकसितच आहे.


हवामान: जिल्ह्याचे हवामान सामान्यपणे आल्हाददायक व सुसह्य आहे. सर्वसाधारणपणे हवा कोरडी असते. स्थलपरत्वे मात्र हवामानात थोडाफार बदल आढळतो.पश्चिम भागात उंच डोंगराळ प्रदेशात उन्हाळ्यात हवा थंड असते, तर सखल भागात उबदार व दमट असते. आंबेजोगाई तालुक्यात मात्र हवामान आल्हाददायक असते. १९७७ मध्ये जिल्ह्याचे कमाल तापमान ३९.४oसे. व किमान तापमान २९.९oसे. होते. पावसाचे प्रमाण कमी असून ते सरासरी ६५ ते ८० सेमी. आहे. जिल्ह्याच्या मध्यभागात पर्जन्याचे प्रमाण जास्त असून तो जून ते सप्टेंबर या काळात जास्त पडतो. पावसाची अनिश्चितता व कमी प्रमाण यांमुळे या जिल्ह्याचा काही भाग सतत दुष्काळी म्हणून ओळखला जातो.

निकृष्ट जमीन व कमी पर्जन्य यांमुळे जिल्ह्यात जंगलाखालील क्षेत्र बरेच अल्प (२%) आहे. १९७८-७९ साली जिल्ह्यात २१,६०० हे. क्षेत्र जंगलांखाली होते. बहुतेक जंगले पाटोदा,आंबेजोगाई, आष्टी, केज, बीड, इ. तालुक्यांतच आढळतात. जंगले विस्तीर्ण प्रदेशात नसून लहानलहान टांपूमध्ये विखुरलेली आढळतात. धावडा, आपटा, आवळा, सलाई,तेंदू, चंदन,

टेम्‍रू,कांदोळ, लोखंडी, खैर, महुवा, पळस, हेन इ. येथील प्रमुख वनस्पतिप्रकार होत. जंगलांत बराचसा गवताळ प्रदेश असून कुसळी व शेडा हे गवताचे प्रमुख प्रकार तेथे आढळतात. यांशिवाय रोशा, मारवेल. सोफिआ, बोनी, कुंदा जातींचे गवतही आढळते. दुसऱ्या योजनेच्या काळात १६३ हे. क्षेत्रात झाडे लावण्याचे काम करण्यात आले. १९७८-७९ मध्ये २४० हे. क्षेत्रात जंगले निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जंगलांतून फक्त लाकूड, सरपण, व गवत मिळते. १९७८-७९ मध्ये जंगलापासून १,६५,५०० रु. उत्पन्न मिळाले. लाकडाचा वापर इमारती, लाकडी सामान व सरपणासाठी केला जातो.

पूर्वी येथे वन्य प्राण्यांची संख्या खूप होती. परंतु जंगलांचे प्रमाण जसजसे कमी होत गेले, तसतशी या प्राण्यांची संख्याही कमी होत गेली. दाट जंगलमय प्रदेशांत क्वचित बिबळ्या आढळतो. यांशिवाय चितळ,रानडुक्कर, कोल्हा, माकड इ. प्राणी जिल्ह्यात आढळतात.

इतिहास व राज्यव्यवस्था : बीड जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासाविषयी पुराणांतून उल्लेख आढळतात. बीड शहरातील जटाशंकराच्या मंदिराविषयी रामायणकालीन दंतकथाही प्रचलित आहे. तथापि इ.स. चौथ्या शतकापासून या जिल्ह्याचा इतिहास उपलब्ध आहे. सातवाहन, कलचुरी, वाकाटक, कदंब इ. राजघराण्यांचा संबंध या भागातही होता. चालुक्य घराण्यातील विक्रमादित्याच्या भगिनीने-चंपावतीने- बीड शहराचे’चंपावती नगर’ असे नामकरण केले होते.

यादवांच्या राज्यातील हा चंपावती प्रदेश अलाउद्दीन खल्जीने जिंकल्यावर (कार. १२९६-१३१६) कालांतराने मुहम्मद तुघलकाच्या अमदानीत (१३२५-५१) या नगराचे नाव ‘बीड’ असे होऊन हा सुभा बनला. पुढे याचा समावेश प्रथम बहमनी व नंतर निजामशाहीत झाला. मराठी सत्तेचा उदय झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन व खर्डा येथे लढाया झाल्या आणि हा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आला. मराठी सत्तेच्या अस्तानंतर हा भाग पुन्हा निजामी अमंलाखाली गेला व भारत स्वतंत्र होईपर्यत तो हैदराबाद संस्थानातच राहिला. १९०५ मध्ये केज तालुका रद्द होऊन शेजारच्या अंबा तालुक्याला जोडण्यात आला. अंबाचे पुढे मोमिनाबाद असे नामांतर झाले. नंतर १९४८ पर्यत सरहद्दींमध्ये फेरफार झाले नाहीत.सुमारे एकचतुर्थांश जिल्हा खाजगी जहागिरीत होता. सर्फ-इ-खास ही निजामाची जहागिरी जवळजवळ सध्याच्या पाटोदा तालुक्याएवढी होती.

जहागिरी रद्द झाल्यानंतर १९५० मध्ये तालुक्यांची फेरआखणी करण्यात आली. तीत मुख्यत: पाटोदा हा वेगळा महाल वा नंतर तालुका झाला. अहमदनगर जिल्ह्यातील २८ खेडी बीड जिल्ह्यात आली तर पाटोदा व आष्टी तालुक्यातील २१ खेडी अहमदनगर जिल्ह्यात गेली. केज हा पुन्हा वेगळा तालुका झाला. १९५६ साली राज्य पुनर्रचनेच्या वेळी हा जिल्हा मुंबई राज्यात व पुढे १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आला. १९६२ मध्ये मोमिनाबादचे ” ‘आंबेजोगाई’” असे नामांतर करण्यात आले.

बीड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नगरपालिका आहे. यांशिवाय जिल्ह्यात १९७८-७९ मध्ये एकूण ९२९ ग्रामपंचायती होत्या. जिल्हा व सत्र न्यायाधीश, साहाय्यक न्यायाधीश व अतिरिक्त न्यायाधीश जिल्ह्यात आहेत. बीड तालुक्याचा एक दिवाणी न्यायाधीश व एक प्रथम श्रेणीचा न्यायिक दंडाधिकारी असून उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांना मर्यादित दंडाधिकार आहेत. आष्टी व पाटोदा या तालुक्यांकरिता एकच दिवाणी न्यायाधीश(व्दितीय श्रेणी)व एक न्यायिक दंडधिकारी आहे.

आर्थिक स्थिती : बीड जिल्हा कृषिप्रधान असून ८०% लोक शेतीवर अवलंबून आहेत. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते वर्षातून दोन वेळा घेतले जाते. ‘ज्वारीचा जिल्हा’ म्हणूनच याची प्रसिध्दी आहे. खरीप हंगमात ज्वारी, बाजरी, मूग, तूर, भात, भुईमूग इ. मुख्य पिके घेतली जातात. रब्बी हंगामात जिल्ह्यात ज्वारी, गहू, हरभरा, यांचे प्रमाण जास्त असते. एकूण लागवडीखालील जमिनीपैकी ९५% जमीन कोरडवाहू आहे. १९७७-७८ साली जिल्ह्यात भात, गहू, ज्वारी, बाजरी या पिकांखाली ५,१३,५७० हे. व हरभरा, तूर, व इतर कडधान्यांखाली १,१७,९५२ हे. क्षेत्र होते. या पिकांबरोबरच जलसिंचनाची सोय असलेल्या भागांत ऊस, फळे व भाजीपाला केला जातो. १९७७-७८साली ७,७१९ हे, क्षेत्र उसाखाली व ७,७६५ हे. क्षेत्र फळे व भाजीपाला यांखाली होते. जिल्ह्यात ज्वारीच्या खालोखाल कापसाचे पीक महत्त्वाचे आहे, एकूण २९,५४५ हे. क्षेत्रात कापसाची लागावड करण्यात आली होती. तंबाखूही थोड्याफार प्रमाणात पिकवली जाते. १९७७-७८ साली जिल्ह्यात ज्वारी ३,०३,३०० बाजरी ५४,६०० गहू ३७,२०० तांदूळ १२,१०० बार्ली २०० मका ९,८०० मे.टन तर सर्व कडधान्यांचे ४०,९०० मे.टन उत्पादन घेण्यात आले. ऊस व कापूस यांचे अनुक्रमे ३५,१०० व १,५०० मे.टन उत्पादन घेण्यात आले. जिल्ह्यात विशेषत: डोंगराळ प्रदेशात, बाजरीचे पीक घेतले जाते. आष्टी, पाटोदा,बीड, केज, आंबेजोगाई, गेवराई हे तालुके बाजरीसाठी प्रसिध्द्द आहेत. यांशिवाय बीड, केज, आंबेजोगाई तालुक्यांत भुईमूगही चांगला येतो.रब्बी हंगामात ज्वारी हे सर्वात महत्त्वाचे पीक असून जिल्ह्यात सर्वत्र, विशेषत: गंगाथडीच्या भागात, हे पीक चांगेल येते. ही ‘टाकळी ज्वारी’ या नावाने प्रसिध्द आहे.

कमी पर्जन्य व छोट्या नद्या यांमुळे जिल्ह्यात अनेक लहान जलसिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. १९७७ साली बीड जिल्ह्यात एकूण ११ मध्यम व ५२ लघुजलसिंचन प्रकल्प होते. त्यांव्दारे २६,४७१ हे. जमिनीस पाणीपुरवठा करण्यात आला होता. जिल्ह्यातील बिंदुसरा, कमळी, मेहेकर, तलवार, वाण, कडा, सिंदफणा इ. नद्यांवर छोटी धरणे बांधून तसेच अनेक विहीरींद्वारे शेतीस पाणी पुरवठा करण्यात आला आहे. जायकवाडी प्रकल्पामुळेही जिल्ह्यातील गेवराई व माजलगाव तालुक्यांना फायदा झाला आहे. पाणीपुरवठ्यासाठी काही तलाव व पाझर तलावही बांधण्यात आले आहेत. बीड शहरानजीक १५८२ साली बांधलेल्या प्रचंड विहीरीतून सु. २०० हेक्टर जमिनीसपाणीपुरवठा केला जातो. जिल्ह्यातील बहुतेक गावांचे विद्युतीकरणझाले आहे. १९७९ साली एकूण ६८४ गावांना वीजपुरवठा करण्यात आला होता. परळी वैजनाथ येथे औष्णिक वीज केंद्र असून आंबेजोगाई – परळी मार्गावर गिरवली या ठिकाणी नव्याने विद्युत् उपकेंद्राची उभारणी करण्यात आली आहे.


औद्योगिक दृष्ट्या हा जिल्हा मागासलेला असून मोठ्या प्रमाणावर चालणारा एकही उद्योगधंदा नाही कापूस पिंजणे, त्यांचे गठ्ठे बांधणे, तेल गाळणे इ. लघुउद्योग चालतात. बीड, परळी वैजनाथ, गेवराई, आंबेजोगाई, येळंबघाट, धारूर, माजलगाव येथे कापूस पिंजण्याच्या व गठ्ठे बांधण्याच्या तसेच तेल गाळण्याच्या गिरण्या आहेत. जिल्ह्यात कुटिरोद्योगांचे प्रमाण जास्त असून त्यांत विड्या वळणे, गुरे पाळणे, मेंढपाळी, लोकरीच्या घोंगड्या बनविणे, भांडी तयार करणे, हातमागावर कापड विणणे, कातडी कमाविणे, अडकित्ते तयार करणे इत्यादीचा समावेश होतो. जिल्ह्यात १९७८ मध्ये एकूण ९,७३,१४५ गुरे होती. जिल्ह्यात दूध व्यवसायाच्या प्रगतीच्या दृष्टीने योजना आखण्यात आल्या असून त्यांच्या कार्यवाहीला १९७८ पासून सुरुवातही करण्यात आली आहे. त्यासाठी बीड येथे १ कोटी ३२ लाख रुपये खर्चाचा दुग्ध – प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याची दररोज १,२०,००० लिटर दूध हाताळण्याची क्षमता आहे.(१९७८) यांशिवाय जिल्ह्यात आंबेजोगाई, गेवराई व आष्टी या तालुक्यांत साखर कारखानेही उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यातील तलाव व नद्या यांमध्ये थोड्याफार प्रमाणात मासेमारीचा व्यवसाय चालतो.

जिल्ह्याच्या आग्नेय भागातील आंबेजोगाई तालुक्यातच लोहमार्ग असून ते रूंद मापी व मीटर मापी आहेत. जिल्ह्यात १९७९ मध्ये ४७.८६ किमी. लांबीचे लोहमार्ग होते. त्यापैकी ४०.३८ किमी. रूंद मापी व ७.४८ किमी. मीटर मापी होते. परळी वैजनाथ, घाटनांदूर व पानगाव ही या जिल्ह्यातील प्रमुख लोहमार्ग स्थानके आहेत. या जिल्ह्यातून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नाही.जिल्ह्यात एकूण ३,८२६ किमी. लांबीचे रस्ते असून त्यांत ८३८.६ किमी. राज्य महामार्ग,५६८.१ किमी. ग्रामीण मार्ग, २,१४७.७ किमी. जिल्हामार्ग व २७१.६ किमी. इतर मार्ग होते. तसेच त्यांतील ७४१ किमी. डांबरी, २,४४०.९ किमी.खडीचे व ६४४.१ किमी. निकृष्ट प्रतीचे होते.(१९७९).

जिल्ह्यात ३१ मार्च १९७९ रोजी मोटारसायकली, स्कूटर वगैरे मिळून १६,२०१ मोटारी ४,७२९ टॅक्सी १९३, रिक्क्षा ७२६ शासकीय वाहने १,१६९मालवाहू गाड्या – खाजगी ८८० व सार्वजनिक ४,९९६ रुग्णवाहिका १३ शाळांच्या बसगाडया ७, अनुवाहे १,६८२ ट्रॅक्टर १,७८८ व इतर मिळून ३२,४२९ वाहने होती. राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत प्रवासी वाहतूक केली जाते.

जिल्ह्यात १९७८-७९ मध्ये ३०२ डाकघरे, २३ तारघरे, ९५९ दूरध्वनी, २५,२२२ रेडिओ परवानाधारक होते त्यापैकी ९५८ रेडिओ ग्रामीण भागात बसविलेले होते.

लोक व समाज जीवन : १९८१ साली जिल्ह्यातील एकूण १४,५८,४२४ लोकसंख्येपैकी १२,५४,५४६ लोक (८५%) ग्रामीण भागात व २,२९,८७८ लोक शहरांत राहत होते. १९७१ साली जिल्ह्यात १,७३,००० लोक अनुसूचित जाति-जमातींचे होते. याच वर्षी जिल्ह्यात एकूण ७ शहरे व १,०४२ खेडी होती. बीड, परळी वैजनाथ (१९८१ ची लोकसंख्या ४८,९४२), आंबेजोगाई (४२,३६०), माजलगाव (२२.५५१) गेवराई (१५,५९९), धारूर (१२,८३६), आष्टी (७,३०४) ही जिल्ह्यातील प्रमुख शहरे होत. जिल्ह्यातील एकूण६,००,९१४ कामकऱ्यांपैकी सु. ७९% कामगार शेतीउद्योगात गुंतलेले होते(१९८१).जिल्ह्यात बहुसंख्य मराठी भाषिक असून सु. २० भाषा वा बोलीभाषा प्रचलित आहेत. १९७१ साली जिल्ह्यात ११,१८,५०० हिंदू,३४,७०० बौध्द, ७०० ख्रिश्चन,६,२०० जैन, ५०० शीख, १,२५,१०० मुस्लिम व ५०० इतर धर्मीय होते. बंजारा (लमाण) भिल्ल इ. जिल्ह्यातील प्रमुख जमाती असून आंबेजोगाई, केज, माजलगाव तालुक्यांत यांची वस्ती आढळते. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच याही जिल्ह्यात बहुतेक सर्व सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. यांशिवाय स्थानिक जत्रा, उरूस भरतात.

बीड जिल्ह्यात सर्व प्रकारच्या आरोग्यसुविधा उपलब्ध करण्याचे प्रयत्न चालू आहेत. क्षय, पटकी, हिवताप, यांसारख्या रोगांच्या निर्मूलनासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. विशेषत: ग्रामीण भागासाठी शस्त्रक्रियेच्या सोयी असलेल्या फिरत्या दवाखान्यांच्या सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात १९७८ साली नोंदणी केलेली एकूण ३ रुग्णालये, २२ दवाखाने(पैकी एक क्षय रोग्यांसाठी),३ प्रसूतिगृहे, १३ प्रथमोपचार केंद्रे होती व त्यांत एकूण १२८ डॉक्टर व वैद्य आणि ३५० परिचारिका होत्या. बीड येथे क्षयरोग्यांसाठी दवाखाना आहे. १९७७ साली रुग्णालयांत व दवाखान्यांत मिळून एकूण ७३६ खाटांची सोय होती.

जिल्ह्यात १९७१ साली एकूण २,३९,०० लोक (२४.०१%) साक्षर होते. त्यांपैकी १,९४,०००(२१.४२%) ग्रामीण भागांतील व ४५,००० (४३.७४%) शहरी भागांतील होते. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागांतही स्त्रियांच्या साक्षरतेचे प्र्माण वाढत आहे. १९७८-७९ साली जिल्ह्यात एकूण १३ पूर्व प्राथमिक शाळांत ७२९ मुले व १८ शिक्षक होते. याच वर्षी १,५७८ प्राथमिक शाळांत १,४७,४६६ विद्यार्थी व ४,१२८शिक्षक १५० माध्यमिक शाळांत ४९,०५० विद्यार्थी  व २,२२७ शिक्षक आणि १४ उच्च शिक्षण संस्थांत (महाविद्यालयांसह) ६,९४४ विद्यार्थी व ४५० शिक्षक होते. जिल्ह्यात एकूण ७६,८०१ मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत होते. मागासवर्गींय विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण सुविधा असून अनेक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १९७७-७८ साली जिल्ह्यात तीन तंत्रशाळा सुरु करण्यात आल्या. ग्रामीण विकासासाठी त्या भागांत महाविद्यालयांपर्यत (वैद्यकीय महाविद्यालयासह) सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे (स्थापना १९७५) कार्य उल्लेखनीय आहे. बीड जिल्ह्यात १५ चित्रपटगृहे व नाट्यगृहे (१९७९) तसेच तमाशा मंडळे यांसारखी करमणुकीची साधने आहेत. १९७८-७९ साली जिल्ह्यात ७९ बॅक कार्यालये व १,४२६ सहकारी संस्था होत्या. याच वर्षी जिल्ह्यातून ३ दैनिके, ११ साप्ताहिक, २ पाक्षिके (पैकी एक उर्दू) व १ मासिक प्रसिध्द होत होते. चंपावती पत्र, झुंजार नेता, बीड समाचार ही दैनिके बीड शहरातून, तर सावज आणि पाठलाग ही साप्ताहिके अनुक्रमे आंबेजोगाई व माजलगाव येथून जैन सारथी मासिक पाटोदा येथून प्रसिध्द होतात.

महत्त्वाची स्थळे : हा जिल्हा औद्योगिक दृष्ट्या मागासलेला असला, तरी येथील बालाघाट डोंगरावर व गोदावरी नदीच्या काठावर अनेक प्रसिध्द धार्मिक ठिकाणे आहेत. बीड शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून येथील कनकालेश्वराचे जलमंदिर कलात्मक बांधणीमुळे प्रसिध्द आहे. शहरातील खंडोबा मंदिरासमोरील उंच दीपमाळा व शहराजवळच असलेले टेकडीवरील खंडेश्वरीचे प्राचीन मंदिर ही प्रेक्षणीय आहेत. येथील शहेनशावली,बालाशाह इ. दर्गे प्रसिध्द आहेत. बीड शहराच्या पश्चिमेस सु. ४ किमी. वर  प्रसिध्द ‘खजाना विहीर’ आहे. आंबेजोगाई येथे आद्य कवी मुकुंदराजांची समाधी,दासोपंत,जोगाई,खोलेश्वर यांची प्रेक्षणीय मंदिरे,प्राचीन गुफा व दासोपंताची ‘पासोडी’ आजही पहावयास मिळ्ते. येथे क्षय रोग्यासाठी मोठा सरकारी दवाखानाही आहे. परळी येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकीवैजनाथ ज्योतिर्लिंग असून तेथे भाविकांची नेहमीच गर्दी असते. येथे औष्णिक वीजकेंद्रही आहे. धर्मापुरीचे शिवमंदिर कोरीव शिल्पकामासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर हेमाडपंथी असून त्यावर दोन शिलालेख कोरलेले आहेत. धारुर शहर ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे असून तेथे फतेहाबाद नावाचा किल्ला आहे. यांशिवाय हे सोन्याचांदीच्या व्यापारासाठीही प्रसिद्ध आहे. पाटोदा तालुक्यातील आमळनेर भांड्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथे तांब्या-पितळेची लहान-मोठी भांडी तयार होतात. या उद्योगाचे येथे सु. ११ कारखाने असून त्यांतील विविध प्रकारच्या भांड्यांचा महाराष्ट्रात सर्वत्र पुरवठा केला जातो. याच तालुक्यातील विंचरणा नदीवर सौताडा येथे प्रसिद्ध ’सौताडा धबधबा’ (६८.५९ मी.) असून त्याच्या पायथ्याशी रामेश्वर मंदिर आहे. तेथे श्रावणात तिसऱ्या दिवशी मोठी यात्रा भरते. नारायणगड हे उंच ठिकाण निसर्गसुंदर आहे. येथे विठ्ठल व महादेव यांची मंदिरे असून कार्तिक पौर्णिमेस मोठी यात्रा भरते. येथील मंदिरे व समाध्या दगडी कामासाठी प्रसिद्ध आहेत. राक्षस भुवन हे गेवराई तालुक्यातील गाव इतिहासप्रसिद्ध असून येथे एक शनिमंदिरही आहे. शनिअमावस्येस येथे मोठी यात्रा भरते. पाटोदा तालुक्यातील चिंचोली हे गाव जिल्ह्यातील सर्वांत उंचावर (८८९ मी.) असल्याने थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथे गहिनीनाथाचे मंदिर आहे. बीडपासून २० किमी. अंतरावरील मांजरसुंभा गावाजवळच मन्मथ स्वामींचे मंदिर असून ते लिंगायत लोकांचे पूज्य स्थान आहे. येथील कपिलधार धबधबा प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात महानुभाव संप्रदायाची तीर्थस्थळे असून पांचाळेश्चर हे विशेष प्रसिद्ध आहे. हे स्थळ गोदावरी नदीच्या तीरावर असून नदीपात्रात मध्यभागी दत्तमंदिर आहे. हे ठिकाण दत्तात्रेयाचे भोजनस्थळ म्हणून मानले जाते. येथे चैत्र वद्य सप्तमीस मोठी यात्रा भरते. यांशिवाय बीडपासून ७ किमी. अंतरावरील वडवनी हे गाव हातमागावरील टेरिकॉटच्या कापडासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात या कापडास मोठ्या प्रमाणात मागणी असते.

चौंडे, मा. ल.