बहावलपूर : पाकिस्तानातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व पूर्वीच्या बहावलपूर संस्थानची राजधानी. लोकसंख्या १,३३,९५६ (१९७२). हे मुलतानच्या आग्नेयीस सुमारे १०५ किमी. अंतरावर सतलज नदीजवळील उंचवट्याच्या भागात वसले आहे. ‘बगदाद-अल्-जलीद’ असाही याचा उल्लेख केला जातो. नवाब बहावलखान (पहिला) याने १७४८ मध्ये या तटबंदीयुक्त नगराची स्थापना करून ते आपले मुख्य ठाणे केले. त्यावरूनच याचे बहावलपूर हे नाव पडले. १८७४ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. आसमंतात पिकणाऱ्या गहू, तांदूळ, खजूर, कापूस इत्यादींचे हे व्यापारकेंद्र आहे. कापड, यंत्रे, औषधे, साबण (लीव्हर ब्रदर्सचा कारखाना), मातीची भांडी, कशिदाकाम इ. उद्योगधंद्यांसाठी बहावलपूर महत्त्वाचे आहे. कराची-पेशावर लोहमार्गावर हे असून पाकिस्तानातील सतलज नदीवरील सर्वात महत्त्वाचा लोहमार्ग-पूल येथेच असल्यामुळे हे ठिकाण मोक्याचे ठरले आहे. दुसऱ्या बहावलखानाने बांधलेला बहावलगढ राजवाडा (१७९१), सर सादिक महंमद याने बांधलेला नवीन राजवाडा, ड्रींग स्टेडियम, सेंट्रल लायब्ररी, इटालियन पद्धतीचा नूर महाल (अतिथिगृह), गुलझार महाल, उर्दू अकादमी इ. सुंदर वास्तू तसेच वस्तुसंग्रहालय, प्राणिसंग्रहोद्यान, उद्याने व बागा ही तेथील प्रमुख आकर्षणे आहेत. सादिक इगरटन महाविद्यालय व माध्यमिक शाळा, जामिआ अब्बासिया (प्रसिद्ध मुस्लिम धर्मशास्त्रविषयक संस्था) व सादिकमिआ पब्लिक स्कूल यांसारख्या शैक्षणिक संस्था उल्लेखनीय आहेत.

चौधरी, वसंत