तानसा तलाव : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामध्ये शहापूर शहराच्या उत्तरेस सु. १२ किमी. अंतरावर तानसा तलाव आहे. तानसा नदीवर बंधारा घालून हा तलाव १८९२ साली बांधण्यात आला. या तलावाच्या बंधाऱ्याची उंची ३९ मी. व लांबी २·४ किमी. आहे. यातील जलसाठ्याचा उत्तर-दक्षिण विस्तार ६·४ किमी. असून त्याची पूर्व-पश्चिम रुंदी २ ते ३·२ किमी. आहे. या जलाशयाने सु. १४ चौ. किमी. क्षेत्र व्यापले असून ८२,००० दशलक्ष लि. पाणी साठते. सध्या पाणीपुरवठा कमी पडू लागल्याने तानसापासून ८ किमी. वरील वैतरणा तलाव त्याला जोडून मुंबई शहराला पाणीपुरवठा केला आहे, तरीही तो पाणीपुरवठा कमीच पडतो. या तलावास दक्षिणेकडून आणि पूर्वेकडून अनेक लहान मोठे ओढे येऊन मिळतात. याच्या आसमंतात सु. २३५ सेंमी. पाऊस पडतो.

सावंत, प्र. रा.