श्रीव्हपोर्ट : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी लुइझिॲना राज्याच्या वायव्य भागातील कॅडो परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २,००,१४५ (२०००). याच्या विस्तारित भागाचा समावेश बोझर परगण्यात होतो. रेड नदीच्या, दोन्ही काठांवर (मुख्यत्वे पश्चिम) विस्तारलेले हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर, टेक्सस व आर्‌कॅन्सॉ राज्यांच्या सरहद्दीजवळ (सु. २९ किमी.) आहे. राज्यातील कापूस, खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्पादनांचे हे एक महत्त्वाचे केंद्र असून देशातील मोठमोठया नैसर्गिक वायू उत्पादक कंपन्यांची येथे मुख्य कार्यालये आहेत.

कॅडो इंडियनांकडून हा प्रदेश १८३५ साली विकत घेण्यात आला. याच काळात हेन्री मिलर श्रीव्ह या अमेरिकन कप्तानाने रेड नदीतील लाकडाचे ओंडके, झाडे वगैरे काढून टाकून नदी नौसुलभ केली. १८३६ मध्ये इंग्लिश व आयरिश लोकांनी येथे वसाहती स्थापन केल्या. या छोट्या वसाहतींचे पुढे बंदरामध्ये व १८३९ साली मोठया गावात रूपांतर झाले. श्रीव्हच्या नावावरून याचे श्रीव्हपोर्ट असे नामकरण झाले. १८६३ मध्ये हे शहर लुइझिॲना राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते. १८७१ साली याला मोठया शहराचा दर्जा देण्यात आला. १९०६ साली टेक्ससच्या सरहद्दीजवळील कॅडो सरोवराच्या परिसरातील खनिज तेलाच्या शोधामुळे या शहराचा झपाटयाने विकास झाला. सांप्रत ते आर्‌कॅन्सॉ, लुइझिॲना, टेक्सस या तीन राज्यांचे औदयोगिक व व्यापारी क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.

धातूच्या व लाकडी वस्तू , दुग्धपदार्थ, यंत्रे, दूरध्वनी व संरक्षणाची साधने, रसायने, खनिज तेल यांच्या निर्मितिउदयोगांसाठी हे शहर प्रसिद्ध असून येथे लाकूड कापण्याचा व्यवसायही मोठया प्रमाणात चालतो. शहरात सेंटेनरी कॉलेज ऑफ लुइझिॲना, लुइझिॲना स्टेट युनिव्हर्सिटी, लुइझिॲना स्टेट युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन, दोन कनिष्ठ महाविदयालये इ. महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत. हँबर्ग किल्ल्याचे अवशेष, बार्क्सडेल सैनिकी विमानतळ, कॉस सरोवर व परिसर खगोलालय, राज्य संगहालय, कलावीथी, श्रीव्हपोर्ट सिंफनी सिव्हिक ऑपेरा ही येथे येणाऱ्या पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. येथील डिक्सी उत्सव, शरद ऋतूतील लुइझिॲना राज्य उत्सव, वसंतोत्सव इ. प्रसिद्ध आहेत.

चौंडे, मा. ल.