पेन्नार : (उत्तर पिनाकिनी). द. भारतातील कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांतून उत्तरेस व नंतर पूर्वेस वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळणारी नदी. लांबी सु. ५६३.५ किमी. पेन्नार कर्नाटक राज्याच्या कोलार जिल्ह्यात नंदीदुर्गच्या वायव्येस चन्नरायन बेट्टा डोंगररांगेत उगम पावते. उगमानंतर ती साधारण उत्तरेकडे वाहत जाऊन गौरीबिदनूर शहराच्या उत्तरेस आंध्र प्रदेश राज्याच्या अंनतपूर जिल्ह्यात प्रवेशते. अंनतपूर जिल्ह्यातून वाहत असता ती पुन्हा कर्नाटक राज्यातील तुमकूर जिल्ह्याच्या पावागड तालुक्यातून मार्गक्रमण करून परत अंनतपूर जिल्ह्यात येते. अंनतपूरच्या उत्तरेस ती पूर्ववाहिनी बनते. अंनतपूर जिल्ह्यात हिच्या पात्रात वालुकाराशी आढळतात. पूर्ववाहिनी झाल्यानंतर कडप्पा जिल्ह्यात कोंडापुरम्‌जवळ तिला चित्रावती नदी मिळते. त्यानंतर लगेच ती गंधीकोटा टेकड्यांजवळून गंधीकोटा घळईतून वाहते. घळई ओलांडल्यानंतर थोड्याच अंतरावर तिला पापाग्नी ही नदी मिळते. पुढे पेन्नार पूर्व घाटाच्या वेलिकोंडा टेकड्यांच्या सोमलीला या खिंडीतून नेल्लोर जिल्ह्यात येते. नेल्लोर जिल्ह्यातून वाहत जाऊन अल्लूरजवळ बंगालच्या उपसागरास मिळते. कुमुद्वती, जयमंगल, कुन्देरू, चित्रावती या हिच्या उपनद्या आहेत. ऊस, कापूस, तंबाखू, भात, भूईमूग ही हिच्या खोऱ्यातील महत्त्वाची पिके होत.

वरच्या टप्प्यात पेन्नार जवळजवळ कोरडी असली, तरी आंध्र प्रदेश राज्यात जलसिंचनासाठी हिचा फार मोठा उपयोग होतो. पेन्नार नदीवरील नेल्लोरजवळील धरण (१८५८) व वेलिकोंडा टेकड्यातील संगम धरण (१८८६) हे दोन प्रकल्प महत्त्वाचे आहेत. या नदीवरील अपर पेन्नार प्रकल्पानुसार आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्याच्या धर्मावरम् तालुक्यातील पेरूरजवळ धरण बांधले आहे. त्यापासून ३,९३,००० हे. जमिनीस पाणीपुरवठा होतो (१९७३). यांशिवाय या नदीवर इतर अनेक लहानमोठे बंधारे आहेत.

तुंगभद्रा प्रकल्पानुसार तुंगभद्रेवरील धरणामुळे तयार झालेल्या पंपा सरोवरातील जादा पाणी बोगाद्यातून पेन्नार नदीत सोडल्याने शेतीस अधिक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. पामिडी, ताडपत्री, अंनतपूर, हिंदपूर, कल्याणदुर्ग, जम्मलमडुगू, कमलापूर, नेल्लोर ही हिच्या खोऱ्यातील महत्त्वाची शहरे आहेत.

यार्दी, ह. व्यं. गाडे, ना. स.