पिअर : अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्याच्या राजधानीचे व ह्यूज परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ९,७०० (१९७०). हे राज्याच्या साधारण मध्यभागी मिसूरी नदीच्या पूर्व तीरावर वसलेले आहे. याच्या समोरच मिसूरीच्या प. तीरावर फोर्ट पिअर हे शहर आहे. जून १८८० मध्ये शिकागो अँड नॉर्थ वेस्टर्न लोहमार्गाचे पश्चिमेकडील अंतिम स्थानक म्हणून मॅहतो या गावाची स्थापना झाली. त्याच वर्षाच्या डिसेंबरमध्ये फ्रेच फर व्यापारी पिअर शूतो याच्या नावावरून मॅहतोचे पिअर असे नामांतर करण्यात आले. मुळात हे इंडियनांचे मुख्य केंद्र होते. १८८३ मध्ये शहराचा दर्जा मिळून, १८८९ मध्ये हे राज्याच्या राजधानीचे ठिकाण बनले. मुख्यत: कृषीउत्पन्न व जनावरांचा व्यापार यांसाठी हे प्रसिद‌्ध आहे. जगातील मातीच्या प्रमूख धरणांत गणले जाणारे आणि जलसिंचन, विद्युतनिर्मिती व पूरनियंत्रणाच्या उद्देशाने बांधलेले ओवाही हे धरण पिअरच्या वर आठ किमी. मिसूरी नदीवर आहे. त्यामुळे या नदीवर ३२० किमी. लांबीचे सरोवर तयार झाले आहे. पिअरपासून दक्षिणेस आठ किमी अंतरावर नदीकाठी सार्वजनिक गोल्फ मैदान असून तेथील ७२८ हे. क्षेत्राचे फार्म आइलंड स्टेट पार्क प्रसिद‌्ध आहे. शहरात इंडियन मुलांच्या शाळा, सेंट मेरी रूग्णालय इ. सोयी असून येथील युध्द स्मारकाची इमारत,स्टेट हिस्टॉरिकल सोसायटी व वस्तुसंग्रहालय तसेच २.८ हे. क्षेत्राचे आर्टेशियन तंत्रानुसार तयार झालेले सरोवर उल्लेखनीय आहे.

चौधरी, वसंत