रेसीफे : पर्नांबूको. ब्राझीलमधील पर्नांबूको राज्याच्या राजधानीचे ठिकाण. लोकसंख्या १२,८९,६२७ (१९८५ अंदाज). हे देशाच्या ईशान्य भागात, अटलांटिक महासागर किनाऱ्यावरील आधुनिक सोयींनी युक्त असे मुख्य नैसर्गिक बंदर असून कापेबिरीबी व बेबेरीबे या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. पूर्वेकडून सागरातील प्रवाळभित्तींनी बंदराचे नैसर्गिक रीत्या संरक्षण केले आहे. पोर्तुगीज भाषेतील ‘रेसीफे’चा अर्थ प्रवाळशैलभित्ती (रीफ) असा आहे. शहरातून गेलेले अनेक जलमार्ग व त्यांवर महत्त्वाच्या ठिकाणी बांधलेले पूल यांमुळे रेसीफेला ‘ब्राझीलचे व्हेनिस’ म्हणून संबोधले जाते. सुरुवातीला हे पर्नांबूको या नावाने ओळखले जाई. अजूनही परदेशातील लोक रेसीफेचा पर्नांबूको असाच उल्लेख करतात. ईशान्य ब्राझीलमधील हे महत्त्वाचे नागरी केंद्र असून त्याचा विस्तार मुख्य भूमी व अटलांटिक महासागरातील बेटावरही झालेला आढळतो. या शहरात अनेक औद्योगिक उपनगरांचा समावेश होतो.

इ. स. १५४८ मध्ये पोर्तुगीजांनी जवळच्या उलींद शहराचे बंदर म्हणून रेसीफेची स्थापना केली. त्याकाळी उलींद हे पोर्तुगीज वसाहतवाल्यांचे प्रशासकीय केंद्र होते. सांप्रत ते रेसीफेचे उत्तरेकडील एक उपनगर बनले आहे. सुरुवातीला रेसीफे येथे मासेमारी करणाऱ्यांच्या व दर्यावर्दी लोकांच्या काही वसाहती होत्या. १५६१ मध्ये फ्रेंच चाच्यांनी रेसीफेवर हल्ले केले तर १५९५ मध्ये ब्रिटिशांनी हे शहर लुटले. १६३०-५४ या काळात हे डचांच्या ताब्यात होते. नॅसॉचा काउंट जॉन मॉरिस याच्या आधिपत्याखाली असताना याची विशेष भरभराट झाली. १७०९ मध्ये याला स्वतंत्र नगराचा दर्जा देण्यात आला. १७१० मध्ये उलींदच्या धनवान लोकांविरुद्ध स्वतंत्र नगराच्या मागणीसाठी येथील सर्वसामान्य लोकांनी बंड पुकारले होते. ते ‘मस्कॅट्‌सचे युद्ध’ या नावाने ओळखले जाते. १८२३ मध्ये रेसीफे ही पर्नांबूको प्रांताची अधिकृत राजधानी बनली. दुसऱ्या महायुद्धकाळात दोस्त राष्ट्रांचा येथे विमानतळ व नाविक तळ होता.

पृष्ठप्रदेशातील साखर, कापूस, कॉफी, केळी, कातडी या उत्पादनांची रेसीफे बंदरातून मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. साखर, कागद, चामड्याच्या वस्तू, वनस्पती तेले, अल्कोहॉल व कापड इत्यादींचे येथे निर्मितिउद्योग आहेत. येथील बहुसंख्य नोकरवर्ग मुख्यतः सेवाव्यवसायांत गुंतलेला आहे. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग व हवाईमार्ग यांचे हे प्रमुख केंद्र आहे. शहरातील ग्वारारापिस विमानतळावरून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक चालते. फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ पर्नांबूको (स्था. १९४६), फेडरल रूरल (शेतीविषयक) युनिव्हर्सिटी ऑफ पर्नांबूको (स्था. १९५४) आणि कॅथलिक युनिव्हर्सिटी ऑफ पर्नांबूको (स्था. १९५१) ही विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्‍न अशा अनेक शिक्षण व संशोधन संस्था शहरात आहेत. संगीत, कला, नृत्य, वाद्यवृंद व इतर सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या संस्था शहरात असून राजकीय दृष्ट्याही या शहराला महत्त्व आहे. आधुनिक इमारतींबरोबरच सतराव्या शतकातील कॅथीड्रल, जुना डच किल्ला, शासकीय प्रासाद या प्रमुख वास्तू तसेच वस्तुसंग्रहालये शहरात पहावयास मिळतात. 

चौधरी, वसंत