सेंट कीट्स व नेव्हिस : फेडरेशन ऑफ सेंट कीट्स अँड नेव्हिस. कॅरिबियन समुद्रातील वेस्ट इंडीज बेटांपैकी लेसर अँटिलीस द्वीपसमूहातील एक सार्वभौम लोकशाही देश. पूर्वी हे ग्रेट ब्रिटनचे सहयोगी राज्य होते. यामध्ये सेंट कीट्स (सेंट क्रिस्तोफर) व नेव्हिस या दोन बेटांचा समावेश आहे. १९८३ पर्यंत याचे सेंट क्रिस्तोफर अँड नेव्हिस असे अधिकृत नाव होते. याच्या उत्तरेस अँग्विला व दक्षिणेस माँटसेरात (ग्रेट ब्रिटनचे सागरपार प्रांत) तर पूर्वेस अँटिग्वा व बारबूडा देश यांदरम्यान ही बेटे आहेत. याचा अक्षवृत्तीय विस्तार १७° १०’–१७° २०’ उत्तर अक्षांश आणि रेखावृत्तीय विस्तार ६२° २४–६२° ४५ प. रेखांश असा आहे. देशाचे एकूण क्षेत्रफळ २६९·४ चौ. किमी. असून त्यांपैकी सेंट कीट्स बेटाची लांबी ३७ किमी., कमाल रुंदी ८ किमी. व क्षेत्रफळ १७६·१ चौ. किमी. आहे. सेंट कीट्सपासून आग्नेयीस ३ किमी.वरील नेव्हिस बेटाची लांबी १३ किमी., रुंदी १० किमी. व क्षेत्रफळ ९३·३ चौ. किमी. आहे. समुद्र-किनाऱ्याची लांबी १३५ किमी. आहे. देशाची एकूण लोकसंख्या ५०,७२६ (२०१२) होती. सेंट कीट्स बेटावरील बासटेर ( लोकसंख्या १३,००० २००९ ) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे. 

 भूवर्णन : सेंट कीट्स व नेव्हिस ही ज्वालामुखी क्रियेतून निर्माण झालेली बेटे आहेत. सेंट कीट्स बेटाचा आग्नेयीकडील अरुंद व लांब द्वीपकल्पीय भाग वगळता उर्वरित बेटाचा आकार लंबवर्तुळाकार आहे. याचा मध्यवर्ती भाग पर्वतीय असून वायव्य भागातील मौंट मिझरी (लिआमुईगा) हे यातील सर्वोच्च शिखर (उंची १,१५६ मी.) आहे. त्याच्या माथ्यावर वनाच्छादित ज्वालाकुंड आहे. मौंट मिझरीच्या दक्षिणेस व पश्चिमेस सु. २१० मी. उंचीचे तीव्र कडे आहेत. या बेटावरील मौंट व्हर्चिल्ड (उंची ९०० मी.) या दुसऱ्या शिखरावर डॉस द ॲन्स पाँड हे ज्वालाकुंड आहे. बेटाच्या अगदी दक्षिण भागात ग्रेट सॉल्ट पाँड हे सरोवर आहे. बेटाच्या आग्नेयीस ३ किमी. रुंदीची द नॅरोज ही सामुद्रधुनी असून तिच्यामुळे सेंट कीट्स व नेव्हिस ही दोन बेटे एकमेकांपासून अलग झाली आहेत. नेव्हिस या बेटाचा आकार गोलाकार आहे. या बेटावरील नेव्हिस (उंची ९८५ मी.) हे सर्वोच्च शिखर असून त्याच्या उत्तरेस राऊंड हिल (३०९ मी.) व दक्षिणेस सॅडल हिल (५६४ मी.) या टेकड्या आहेत. नेव्हिस बेटाचा किनारा वाळूच्या पुळणींनी व प्रवाळ खडकांनी वेढलेला आहे. वायव्य किनाऱ्यावर काळ्या वाळूची पुळण आहे. या दोन्ही बेटांच्या लहान आकारांमुळे येथील नद्या अतिशय लहान व आखूड आहेत. 

 सेंट कीट्स व नेव्हिस बेटांचे स्थान ईशान्य व्यापारी वाऱ्यांच्या मार्गात असून या उष्ण कटिबंधीय बेटांचे हवामान सौम्य आहे. येथील वार्षिक सरासरी तापमान २७° से. असून क्वचितच ते २१° से. पेक्षा कमी किंवा ३२° से. पेक्षा अधिक होते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान सेंट कीट्स बेटावर १४० सेंमी. तर नेव्हिस बेटावर १२२ सेंमी. असते. पाऊस प्रामुख्याने मे ते नोव्हेंबर यांदरम्यान होतो. कॅरिबियन हरिकेन वादळाच्या टापूत ही बेटे असल्याने अनेकदा त्यांचा तडाखा या बेटांना बसलेला आहे. 

 या बेटांचे अंतर्गत पर्वतीय भाग दाट अरण्यांनी व्यापलेले आहेत. उंचीनुसार वनस्पती प्रकारांत तफावत आढळते. अधिक उंचीवर गवताळ भाग असून त्यावर पशुपालन व्यवसाय चालतो. पर्वत उतारांवर काही ठिकाणी वर्षारण्ये आढळतात. कमी उंचीच्या भागातील नैसर्गिक वनस्पती तोडून ते भाग लागवडीखाली आणलेले आहेत. नारळ, ताड, चिंच, निंब इ. वृक्षप्रकार येथे आढळतात. सेंट कीट्सवरील मंकी हिल भागात काळ्या तोंडाचे वानर आढळते. 

 इतिहास व राजकीय स्थिती : आरावाक इंडियन आणि त्यानंतरचे शूर व नरमांसभक्षक कॅरिब हे या बेटांवरील मूळ ज्ञात रहिवासी होते. क्रिस्तोफर कोलंबसने इ. स. १४९३ मध्ये सेंट कीट्स बेट शोधून काढले व त्याला त्याने सेंट क्रिस्तोफर असे नाव दिले. कॅरिब लोक सेंट कीट्स बेटाला लिआमुईगा (सुपीक बेट) असे म्हणत. सर टॉमस वॉर्नर याने १६२३ मध्ये सेंट कीट्सच्या पश्चिम किनाऱ्यावरील ओल्ड रोड येथे वसाहतीची स्थापना केली. हीच वेस्ट इंडीजमधील पहिली ब्रिटिश वसाहत होय. त्यामुळेच सेंट कीट्सवरील या वसाहतीला वेस्ट इंडीजमधील ‘मातृ वसाहत’ असे म्हटले जाते. फ्रेंचांनी १६२७ मध्ये या बेटावर आपल्या दोन वसाहती स्थापन केल्या. ब्रिटिशांनी १६२८ मध्ये नेव्हिस बेटावर आपली वसाहत स्थापन केली. स्पॅनिशांचे अतिक्रमण परतवून लावण्यासाठी फ्रेंचांनी ब्रिटिशांना सहकार्य केले. १६६० च्या दशकात आफ्रिकेतून आणलेल्या गुलामांच्या मदतीने विकसित केलेल्या येथील उसाच्या मळ्यांत सु. ४,००० यूरोपीय गुंतलेले होते. फ्रेंचांनी १६६४ मध्ये यावर ताबा मिळविला परंतु उत्रेक्त शांतता करारानुसार १७१३ मध्ये ब्रिटिशांकडे त्यांचा ताबा आला. ब्रिमस्टन हिल फॉट्रिस येथील ब्रिटिश सैन्याला वेढा घालून फ्रेंचांनी पुन्हा एकदा या बेटाचा ताबा मिळविला (१७८२). तथापि व्हर्सायच्या तहानुसार सेंट कीट्स बेट पुन्हा ब्रिटनच्या ताब्यात आले (१७८३). अठराव्या शतकाच्या अखेरीस नेव्हिस बेटावरील चार्ल्झटाऊन येथील औष्णिक स्नानासाठी जगभरातून हजारो पर्यटक आकर्षित होऊ लागले. गुलामगिरी प्रथा बंद झाल्यानंतरही अनेकांनी येथील ऊसमळ्यांत काम करणे चालूच ठेवल्यामुळे इतर वेस्ट इंडिज बेटांप्रमाणे या बेटांच्या अर्थव्यवस्थेतील साखर उद्योगाचे महत्त्व कमी झाले नाही. 

 सेंट कीट्स, नेव्हिस व अँग्विला ( लेसर अँटिलीसमधील सर्वांत उत्तरेकडील बेट) ही बेटे आणि ब्रिटिश व्हर्जिन बेटे यांची मिळून एकच ब्रिटिश वसाहत निर्माण करण्यात आली (१८१६). सेंट कीट्स व नेव्हिससह लिवर्ड बेटांचा मिळून एक संघ स्थापन करण्यात आला (१८७१). १९५८ ते १९६२ या काळात वेस्ट इंडीज संघात ही तीन बेटे समाविष्ट होती. २७ फेब्रुवारी १९६७ रोजी ह्या तीन बेटांचे मिळून नवीन संविधानांतर्गत अंतर्गत स्वायत्तता असणारे ब्रिटनचे सहयोगी राज्य बनले. संरक्षण व परराष्ट्रीय व्यवहाराची जबाबदारी ब्रिटनने स्वतःकडे ठेवली. सेंट कीट्स प्रशासनाच्या वर्चस्वाविरोधात तक्रार करून अँग्विलामधील लोकांनी स्वातंत्र्याची मागणी केली (जुलै १९६७). १९७१ मध्ये अँग्विला ब्रिटिश अवलंबी प्रदेश बनला. १९८० मध्ये अँग्विला बेटाने संघ सोडून दिला आणि अधिकृत रीत्या ते वेगळे झाले. १९ सप्टेंबर १९८३ रोजी सेंट क्रिस्तोफर व नेव्हिस हा स्वतंत्र देश अस्तित्त्वात आला. १९८८ मध्ये अधिकृत रीत्या देशाचे नाव फेडरेशन ऑफ सेंट कीट्स व नेव्हिस असे बदलण्यात आले. ऑक्टोबर १९९७ मध्ये नेव्हिस विधानमंडळातील पाच सदस्यांनी सेंट कीट्सबरोबर असलेल्या फेडरेशनपासून फारकत घेण्याच्या बाजूने मतदान केले. परंतु १० ऑगस्ट १९९८ रोजी घेतलेल्या जनमतनिर्देशात नेव्हिसच्या स्वातंत्र्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. 


सेंट कीट्स व नेव्हिसमध्ये संविधानात्मक राजेशाही लोकशाही शासनपद्धती असून हा देश राष्ट्रकूल सदस्य आहे. ब्रिटिश राजा देशाचा सार्वभौम असून त्यांचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्नर जनरलची येथे नियुक्ती केलेली असते. पंतप्रधान हे शासनाचे प्रमुख असतात. संसद एकसदनी असून त्यात पाच वर्षांसाठीचे ११ निर्वाचित सदस्य असतात. त्यांपैकी आठ सदस्य सेंट कीट्सचे, तर तीन सदस्य नेव्हिसचे प्रतिनिधित्व करतात. राजा आणि राष्ट्रीय सभा यांची संसद बनते. तिच्यात एक पदसिद्ध आणि तीन नियुक्त सदस्य असतात. राष्ट्रीय सभेमध्ये नेव्हिसचे स्वतःचे विधानमंडळ असून त्यात पाच निर्वाचित तर तीन नियुक्त सदस्य असतात. फेडरेशन अंतर्गत नेव्हिसला विशिष्ट मर्यादेपर्यंत स्वायत्तता आहे. राष्ट्रीय संविधानात नेव्हिसला फेडरेशनमधून बाहेर पडता येईल अशी तरतूद आहे. स्थानिक प्रशासनाच्या दृष्टीने सेंट कीट्सची नऊ परगण्यांत, तर नेव्हिसची पाच परगण्यांत विभागणी केलेली आहे. 

आर्थिक स्थिती : देशाच्या एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनापैकी १·६ टक्के उत्पादन शेतीतून, १६·५ टक्के कारखानदारीतून आणि ८१·९ टक्के सेवा व्यवसायातून मिळते (२०११). शासनाकडून कारखानदारी विकासास प्रोत्साहन दिले जात असले तरी शेती हाच येथील प्रमुख व्यवसाय राहिला आहे. देशातील सु. ७,००० हे. क्षेत्र मशागतयोग्य असून त्यांपैकी सु. १,००० हे. क्षेत्र कायम लागवडीखाली होते (२००२). दरडोई जमीनधारणा क्षेत्र फारच कमी आहे. नारळ, कापूस, केळी, रताळी, कांदा, वाटाणा, टोमॅटो, कोबी, याम, ऊस, फळे व भाजीपाला ही प्रमुख कृषी उत्पादने घेतली जातात. वसाहतकाळापासून येथील साखर उत्पादन महत्त्वाचे ठरले आहे. साखरेच्या किंमतीतील चढ उताराचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. अनेक वर्षांच्या तोट्यामुळे २००५ पासून शासन चालवित असलेले साखर कारखाने बंद करण्यात आले. देशातील एकूण ऊस उत्पादन सु. १,९३,००० टन व नारळ उत्पादन सु.१,००० टन होते (२००३). थोड्याफार प्रमाणात पशुपालन व्यवसाय चालत असून देशात सु. १४,००० शेळ्या, १४,००० मेंढ्या, ४,००० गुरे व ४,००० डुकरे होती (२००३ अंदाज). मत्स्योत्पादन ४८४ टन झाले (२००४). सुमारे ५,००० हे. क्षेत्रावर अरण्य असून हे क्षेत्र एकूण भूक्षेत्राच्या १४·७ टक्के आहे (२००५). पर्यटन व्यवसाय जरी हंगामी असला तरी तो आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. या व्यवसायापासून २००२ मध्ये ५७ द. ल. अमेरिकी डॉलर एवढे उत्पन्न मिळाले. 

 साखरनिर्मिती, कापड, इलेक्ट्रॉनिकी वस्तू, अन्नप्रक्रिया, मद्यनिर्मिती व इमारती बांधणे हे येथील महत्त्वाचे उद्योग आहेत. सेंट कीट्स बेटावर तीन, तर नेव्हिस बेटावर एक औद्योगिक वसाहत आहे. कच्च्या साखरेचे उत्पादन २०,००० टन झाले (२००१). देशात विद्युत्‌शक्ती उत्पादन १३५ द. ल. किवॉ. तास झाले (२००९). इलेक्ट्रॉनिकी वस्तू, विद्युत् उपकरणे, संगणकाची उपकरणे, साखर, मळी, मद्य, तंबाखू, पादत्राणे, कापड व कापडी उत्पादने यांची निर्यात तर यंत्रसामग्री, रसायने, खाद्यपदार्थ, इंधन, धातू उत्पादने, बांधकामाचे साहित्य इत्यादींची आयात केली जाते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन, त्रिनिदाद व टोबॅगो, प्वेर्तरीको, नेदर्लंड्स, अँटिलिस, कॅनडा यांच्याशी सेंट कीट्स व नेव्हिसचा व्यापार चालतो. देशाचे आयात मूल्य ३१५·७ द. ल. अमेरिकी डॉलर तर निर्यात मूल्य ५८·६ द. ल. अमेरिकी डॉलर असे होते (२०१०). 

 सेंट कीट्स व नेव्हिसमध्ये प्रामुख्याने साखरउद्योग आणि पर्यटनाच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्था चांगल्या प्रकारे विकसित केलेली आहे. रस्त्यांची एकूण लांबी ३८३ किमी. असून त्यांपैकी ४२·५ टक्के पक्के रस्ते होते. येथे ६,९०० प्रवासी गाड्या आणि २,५०० व्यापारी वाहने होती (२०११). लोहमार्गाची लांबी ५० किमी. होती. सेंट कीट्सवरील बर्ड रॉक (बासटेर) व नेव्हिसवरील चार्ल्झटाउन ही प्रमुख सागरी बंदरे आहेत. सेंट कीट्स व नेव्हिस यांदरम्यान मोटारबोट वाहतूक चालते. सेंट कीट्स बेटावर बासटेरपासून ३ किमी. अंतरावर रॉबर्ट लेवेल्यिन ब्रॅडशॉ हा आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच नेव्हिस बेटावर न्यू कॅसल हा विमानतळ आहे. ईस्ट कॅरिबियन डॉलर हे या देशाचे अधिकृत चलन असून १०० सेंटचा एक ईस्ट कॅरिबियन डॉलर होतो. ईस्ट कॅरिबियन सेंट्रल बँक ही प्रादेशिक बँक येथे आहे. याशिवाय बँक ऑफ नेव्हिस, कॅरिबियन बँकिंग कॉर्पोरेशन, नेव्हिस को-ऑप. बँक व सेंट कीट्स-नेव्हिस-अँग्विला नॅशनल बँक या चार स्थानिक व्यापारी बँका, तीन परदेशी बँका व एक विकास बँक ह्या बँक शाखा येथे आहेत (२००२). पूर्व कॅरिबियन रोखे बाजाराचा सेंट कीट्स व नेव्हिस सदस्य असून त्याचे कार्यालय बासटेर येथे आहे. 

 लोक व समाजजीवन : देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी सेंट कीट्स बेटावर ३४,९३० लोक तर नेव्हिस बेटावर ११,१८१ लोक राहात होते. (२०११). एकूण लोकसंख्येपैकी ६७·८ टक्के लोक ग्रामीण भागात राहात होते (२०१०). ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म आहे. प्रॉटेस्टंट पंथीय बहुसंख्य आहेत. एकूण लोकसंख्येत २५·६ टक्के अँग्लिकन आणि २५·६ टक्के मेथडिस्ट आणि १७·९ टक्के पेन्टिकॉस्टल तर काही रोमन कॅथलिक, बॅप्टिस्ट, मोराव्हिअन पंथीय आहेत. एकूण लोकसंख्येपैकी ९०·४ टक्के लोक कृष्णवर्णीय होते (२०००). बेटांवरील बहुतांश लोक आफ्रिकन गुलामांचे वंशज असून त्यांशिवाय काही यूरोपीय आशियायी तसेच कृष्णवर्णीय आफ्रिकन यांच्या वांशिक मिश्रणातून निर्माण झालेले लोक आढळतात. येथील अधिकृत भाषा इंग्रजी आहे. 


येथील दर हजारी जन्मदर १३·९, मृत्यूदर ७·०८ आणि बालमृत्युमान ९·४३ होते (२०१२). सरासरी आयुर्मान ७४·८४ वर्षे होते (२०१२). अधिक मृत्युमान आणि लोकांचे देशाबाहेर होणारे स्थलांतर यांमुळे वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे. सरासरी प्रसूतिमान प्रति स्त्री १·७९ अपत्ये असा होता (२०१२). शासनामार्फत आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. उष्णकटिबंधीय रोगांचे उच्चाटन झालेले आहे. देशात ४ रुग्णालये, १७ आरोग्यकेंद्रे व ६८ डॉक्टर होते (२००८). बेरोजगारी व घरांचा तुटवडा ह्या येथील मुख्य समस्या आहेत. सप्टेंबर १९९८ मध्ये आलेल्या हरिकेन जॉर्जेस या विध्वंसक वादळात येथील सु. ८० टक्के घरांचे नुकसान होऊन सु. २५,००० लोक बेघर झाले. 

देशात ५ ते १६ वयोगटांतील मुलांना शिक्षण सक्तीचे आहे. साक्षरतेचे प्रमाण ९८ टक्के होते (१९९९). देशातील २३ प्राथमिक विद्यालयांत २९३ शिक्षक व ५,९४७ विद्यार्थी ७ माध्यमिक विद्यालयांत ३४५ शिक्षक व ४,५२८ विद्यार्थी ९ खाजगी विद्यालयांत ७० शिक्षक व १,१५३ विद्यार्थी होते (२००३). याशिवाय वेस्ट इंडीज विद्यापीठाचा बहिःशाल शिक्षण विभाग, शिक्षक-प्रशिक्षण महाविद्यालय, युवकांसाठीचे अनौपचारिक प्रशिक्षण केंद्र, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण संस्था आणि प्रौढ शिक्षण विभाग इ. शैक्षणिक संस्था येथे आहेत. बासटेर येथील सार्वजनिक ग्रंथालय विशेष उल्लेखनीय असून त्यात वेस्ट इंडियन संस्कृती संबंधीचे दुर्मिळ ग्रंथ तसेच बेटावरील कॅरिब संस्कृतीच्या काळापासूनचे पुरावशेष जतन केलेले आहेत. शासनामार्फत आकाशवाणी व दूरदर्शन सेवा पुरविली जाते. 

 महत्त्वाची स्थळे : युनेस्कोने येथील ‘ब्रिमस्टन हिल फॉर्ट्रिस नॅशनल पार्क’चा समावेश जागतिक वारसा स्थळांत केला आहे (१९९९). बासटेर हे देशाच्या राजधानीचे ठिकाण सेंट कीट्स बेटाच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावर वसले असून त्याची स्थापना इ. स. १६२७ मध्ये करण्यात आली. हे देशातील प्रमुख शहर व बंदर असून व्यापारी व औद्योगिक केंद्र आहे. शहरातील सेंट जॉर्जचे चर्च, राजभवन या वास्तू आणि वनस्पतिउद्यान उल्लेखनीय आहेत. चार्ल्झटाउन हे नेव्हिस बेटावरील प्रमुख नगर व बंदर आहे. अठराव्या शतकाच्या अखेरीस नाविक तळ म्हणून तसेच प्रवासी स्थळ म्हणून त्याला महत्त्व होते. प्रसिद्ध मुत्सद्दी अलेक्झांडर हॅमिल्टन याचे चार्ल्झटाउन हे जन्मस्थान आहे. (चित्रपत्र). 

 चौधरी, वसंत

सेंट कीट्‌स व नेव्हीस

बासटेर शहराचे दृश्य

ब्रिमस्टन हिल फॉर्टिस नॅशनल पार्क, सेंट कीट्‌स बेट.

बासटेर येथील स्वातंत्र्य चौक