अंजार :गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात कांडला-भूज लोहमार्गावर कांडलापासून २५ किमी. व भूजच्या आग्नेयीस ४२ किमी. वरील तालुक्याचा गाव. लोकसंख्या २७,२९२ (१९७१). नवव्या शतकारंभी अजमेरच्या चौहान राजाचा निर्वासित झालेला भाऊ अजयपाळ येथे येऊन तपस्वी वृत्तीने राहिला त्याच्यावरूनच या गावाचे नाव पडले, असे म्हणतात. त्याची अश्वारूढ मूर्ती असलेले देऊळ गावाबाहेर आहे. अंजाराचे सरासरी वार्षिक तपमान २० ते २७·५ से. असून सरासरी वार्षिक पर्जन्य २० ते ४० सेंमी. असते. इतिहासकालापासून भारताच्या मुख्य भूमीपासून जरा बाजूला व बऱ्याच स्वतंत्र असणाऱ्या कच्छ राजाला १८१६ साली हा भाग ईस्ट इंडिया कंपनीला तोडून द्यावा लागला होता, पण १८२२ च्या तहाने रु. ८८,००० वार्षिक खंडणीच्या मोबदल्यात तो परत मिळाला. भारताचा मुख्य भूकंपीय पट्टा कच्छच्या रणातून जातो चौथ्या क्रमांकाच्या तीव्रतेचे अपिकेंद्र (एपिसेंटर) कच्छमध्ये व पाचव्या क्रमांकाचे रणामध्ये असल्याने अंजारला तीन वेळा भूकंपाचे धक्के सोसावे लागले आहेत. १५ जून १८९० चा जबर धक्का, १८९१ मधला धक्का आणि गेल्या दीडशे वर्षांतील तीव्रतेत तिसऱ्या क्रमांकाचा १८ मे १९५५ चा धक्का यांमुळे गाव पुन:पुन्हा उध्वस्त झाला होता तथापि दर वेळी पुनर्वसन होऊन रेल्वे जंक्शनमुळे आणि गहू, कापूस व जव या मालांचा व्यापार, सुताच्या व कापडाच्या गिरण्या, आगपेट्यांचा कारखाना, भरतकाम अशा उद्योगधंद्यांमुळे अंजारचे स्थान टिकून राहिले आहे.

ओक, शा. नि.