मोंघीर : (मुंगीर). बिहार राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठाणे आणि इतिहासप्रसिद्ध शहर. लोकसंख्या १,२९,१८७ (१९८१). हे पाटण्याच्या पूर्वेस १६० किमी. अंतरावर गंगा नदीच्या उजव्या काठावर वसले आहे. याच्या नावाविषयी निरनिराळी मते आढळतात. प्राचीन काळी यास ’मुनिगृह’ नावाने ओळखीत असत आणि याचा समावेश अंग देशात होता. श्रीरामाने व लक्ष्मणाने हे ठिकाण विश्रांतीसाठी निवडले होते, असा उल्लेख रामायणात आहे. महाभारतकाळात ’मद्‌गगिरी’ नावाने याचा उल्लेख आढळतो.

चवथ्या शतकात चंद्रगुप्ताने याची स्थापना केली, असे समजले जाते. यावर काही काळ पाल, राष्ट्रकूट, प्रतीहार इ. घराण्यांची सत्ता होती. बंगालचा नवाब मीर कासीम याने १७६३ मध्ये येथे आपली राजधानी केली आणि काही प्रासाद व एक शस्त्रागार बांधले. तेव्हापासून हे युद्धसामग्रीसाठी विशेष प्रसिद्ध आहे. १९३४ च्या भूंकंपात शहराची बरीच हानी झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात शहराचा विकास झपाट्याने झाला. येथील एक प्राचीन किल्ला, बौद्ध मंदिरांचे अवशेष, मुस्लिम संत शाह मुश्क नफाह याची कबर इ. प्रेक्षणीय आहेत. किल्ल्याच्या इमारतीत दिवाणी व फौजदारी न्यायालय तसेच इतर शासकीय कार्यालये आहेत. शहराच्या आग्नेय बाजूस गरम पाण्याचे ’सीताकुंड’ असून ते यात्रेकरूंचे आकर्षण ठरले आहे.

येथे नगरपालिका (स्था. १८६४) असून महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय सेवा, पाणीपुरवठा, जलनिःसारण, सार्वजनिक उद्यान इ. नागरी सुविधा आहेत. परिसरात गहू, हरभरा, डाळी, मका, तंबाखू इ. पिके घेतली जातात. त्याचप्रमाणे अभ्रक, फेल्स्पार, लोह, स्लेट इ. खनिजांचे उत्पादन होते. धान्याची ही मोठी बाजारपेठ असून येथील मालाची आवक-जावक प्रामुख्याने लोहमार्गाने व गंगा नदीतून बोटींनी चालते. येथे दारूगोळा, तलवारी व इतर हत्यारे, लाकूडकाम, सिगारेट इत्यादींचे कारखाने असून विणकामाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात चालतो.

संकपाळ, ज. बा.