पेंझा: प. रशियातील पेंझा प्रांताचे मुख्य ठिकाण, औद्योगिक केंद्र व रेल्वे प्रस्थानक. लोकसंख्या ४,१४,००० (१९७५). हे व्होल्गा नदीखोऱ्यात क्वीबिशेव्हच्या पश्चिमेस २५७ किमी. वर सुरा व पेंझा या नद्यांच्या संगमाजवळ वसले आहे. १६६६ मध्ये सरहद्दीवरील किल्ला म्हणून त्याची स्थापना झाली. १६७० मध्ये स्टेंग्‌का राझीन या कोसॅक नेत्याने, तर १७७३-७४ मध्ये येम्यिल्यान इव्हानव्ह्यिच पुगचॉफ या शेतकऱ्यांच्या नेत्याने शेतकऱ्यांचे बंड उभारून पेंझा बळकावले होते. क्रिमियन तार्तरांनी पेंझावर १७१७ पर्यंत वारंवार हल्ले केले. थोर रशियन साहित्यसमीक्षक ब्यिल्यीन्‌स्कई (१८११-४८) व सामाजिक विडंबनकार सलटिकॉव्ह-म्यिखईल (१८२६-८९) ह्यांचे येथे वास्तव्य होते. लेनिनचे वडील उल्यानॉव्ह १८५५ ते ६३ यांदरम्यान येथे शिक्षक होते. शेतमालाच्या व्यापारासाठी महत्त्व पावलेल्या पेंझाचा रशियन क्रांतीनंतर औद्योगिक विकासही वेगाने होत गेला. येथे सुती वस्त्रोद्योग, रसायने, खनिज तेल व खाद्यपदार्थ प्रक्रिया, यंत्रसामग्री, डीझेल एंजिने, घड्याळे, गणकयंत्रे, छपाई यंत्रे, विमानांचे सुटे भाग, सायकली, कागद, वैद्यकीय उपकरणे, शेतमालावरील प्रक्रिया इ. उद्योग असून, ते प्रामुख्याने पश्चिमेकडील कृषी व पूर्वेकडील वनविभागात विस्तारले आहेत. शहरात औद्योगिक व शिक्षक महाविद्यालय, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी व शेतकीसंस्था, औद्योगिक संशोधनसंस्था, सार्वजनिक ग्रंथालये, वेधशाळा असून येथील वस्तुसंग्रहालय, कलावीथी, किल्ला इ. उल्लेखनीय आहेत.

चौधरी, वसंत