टॉनले सॅप :ख्मेर प्रजासत्ताकाच्या मैदानी प्रदेशातील सरोवर. आग्नेय आशियातील हा सर्वांत मोठा गोड्या पाण्याचा जलाशय होय. कार्प माशांची पैदास व शिकार यांसाठी हे विशेष विख्यात आहे. स्थानिक लोकांच्या अन्नाचा कार्प मासा हा महत्त्वाचा घटक आहे. जून ते नोव्हेंबर हा पावसाळ्याचा काळ सोडता सरोवराचा विस्तार सु. २,७००चौ. किमी. आणि खोली ०·९ ते ३ मी. पर्यंत असते. पावसाळ्यात विस्तार १०,००० चौ. किमी. व खोली ९ ते १४ मी. होते, कारण सरोवराचे पाणी मेकाँग नदीत वाहून नेणाऱ्या १३० किमी. लांबीच्या टॉनले सॅप नदीचे पाणी मेकाँगच्या पुरामुळे फुगून उलटे वाहून सरोवरात येते. स्त्रेंग व सेन या उत्तरेकडून येणाऱ्या बारमाही पाण्याच्या उपनद्या व भोवतीच्या डोंगराळ भागातून येणारे प्रवाह सरोवराला पाणी पुरवितात. पावसाळ्यात ३·५ मी. पाण्यात चालणाऱ्या नौका अनेक शहरांपर्यत जातात. पाणी ओसरल्यावर त्या भागात भाताचे मोठे पीक येते. बराच भाग लव्हाळेयुक्त दलदलींचाही असतो. सरोवराच्या वायव्येस सु. ६·५ किमी.वर प्राचीन अंकोरचे अवशेष आहेत.

लिमये, दि. ह.