बॅलाक्लाव्हा : रशियातील युक्रेनियन सोव्हिएट सोशॅलिस्ट रिपब्लिकच्या क्रिमिया प्रांतातील (ओब्लास्ट) इतिहासप्रसिद्ध शहर व बंदर. ह क्रिमिया द्वीपकल्पावर सिव्हॅस्तपोलच्या आग्नेयीस १३ किमी. काळ्या समुद्रावर वसले आहे. १९५७ मध्ये हे शहर सिव्हॅस्तपोलमध्ये समाविष्ट करण्यात आले. ⇨ किमियाच्या युद्धामुळे (१८५४–५६) त्यास प्रसिद्धी मिळाली.

या शहराची स्थापना सिथियन लोकांनी इ.स.पू. दुसऱ्या शतकात केली. पुढे ग्रीकांचे एक व्यापारी नगर म्हणून ते प्रसिद्ध होते. नंतर १४७५ मध्ये हे तुर्कांच्या ताब्यात गेले. त्यांनीच ‘बॅलाक्लाव्हा’ असे त्याचे नामांतर केले (ग्रीक नाव ‘सीबलॉन’ होते). क्रिमियाच्या युद्धात ब्रिटिश, फ्रेंच व तुर्की सैन्यांना येथून रसद पुरविली जात होती. रशियाला या युद्धात बॅलाक्लाव्हाचा ताबा मिळविता आला नाही. या युद्धातीलच एका प्रसंगावर इंग्रज कवी लॉर्ड टेनिसन याने द चार्ज ऑफ द लाइट बिग्रेड ही प्रसिद्ध कविता लिहिली. फ्लॉरेन्स नाइटिंगेल व तिच्या सहकाऱ्‍यानी क्रिमियाच्या युद्धात जखमी झालेल्या रुग्‍णांची सेवा करून रुग्णसेवेचा एक नवा आदर्श घालून दिला. तिच्या या कार्यामुळेही या शहराच्या जागतिक कीर्तीत भर पडली.

भाजीपाला व मासे डबाबंदीकरण, संगमरवरी कलाकुसर इ. व्यवसाय येथे चालत असून हे एक उत्कृष्ट मासेमारी बंदर आहे. येथे जेनोईंच्या चौदाव्या-पंधराव्या शतकांतील गढीचे अवशेष आढळतात. येथील रम्य निसर्ग व आरोग्यधामे पर्यटकांची आकर्षणे आहेत.

खांडवे, म. अ.