बार्थालोमेऊ दीयश : (? १४५० – ? १५००). आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप या भूशिराचा शोध लावणारा पोर्तुगीज दर्यावर्दी व समन्वेषक. त्याचे पूर्ण नाव बार्थालोमेऊ दीयश दे नोव्हाइस. त्याच्या १४८६ पूर्वीच्या जीवनेतिहासाबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. आफ्रिकेच्या किनाऱ्याचे समन्वेषण करून भारताकडे जाण्याचा समुद्रमार्ग शोधण्याची व ॲबिसिनियातील (विद्यमान इथिओपियातील) ख्रिस्ती साम्राज्याविषयीची माहिती मिळविण्याची मोहीम पोर्तुगीजांची १४८७ मध्ये काढली. त्यावर नेता म्हणून पोर्तुगालचा सम्राट दुसऱ्या जॉनने त्याची निवड केली. ऑगस्ट १४८७ मध्ये लिस्बनहून तीन जहाजांसह आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने तो दक्षिण मोहिमेवर निघाला. या मोहिमेपर्यंत पोर्तुगीजांच्या समन्वेषणाची दक्षिणेकडील मर्यादा २२°द. अक्षवृत्ताजवळील क्रॉस भूशिरापर्यंत होती. तेथे आल्यानंतर जोरदार वाऱ्यांमुळे जवळजवळ तेरा दिवस त्याला आफ्रिकेच्या दक्षिण टोकापासून दूरवर जावे लागले. तेथून तो प्रथम काही अंतर पूर्वेकडे गेला. तरी भूभाग न लागल्यामुळे पुढे तो उत्तरेकडे वळला व ३ फेब्रुवारी १४८८ रोजी केप ऑफ गुड होपच्या पूर्वेस सु. ३७० किमी. वर असलेल्या मोझेल उपसागरात आला. तेथून तो पूर्वेकडे ॲल्मोआ उपसागरात व पुढे ग्रेट फिश नदीमुखापर्यंत गेला. तथापि त्याच्या सहकाऱ्यांनी पोर्तुगालला जाण्याचा आग्रह धरल्यामुळे तेथूनच त्याला परत फिरावे लागले. परतीच्या मार्गावर त्याला एक भूशिर लागले, हेच आफ्रिकेचे दक्षिण टोक होय. येथील वादळी हवेवरून या भूशिराला त्याने ‘काबो टारमेंटोसो’ (केप ऑफ स्टॉर्म्स) असे नाव दिले. हिंदुस्थानकडे जाण्याचा सागरी मार्ग येथूनच सापडेल या आशेने दुसऱ्या जॉनने किंवा दीयशने स्वतःच त्याला काबो दे ब्वेना एस्पेरेंझा म्हणजे ‘केप ऑफ गुड होप’ असे नाव दिले असावे. अशा प्रकारे सु. सोळा महिन्यांच्या प्रवासानंतर डिसेंबर १४८८ मध्ये दीयश लिस्बनला परतला. या प्रवासात त्याने यूरोपियनांना माहीत नसलेला सु. २,२५० किमी. लांबीचा आफ्रिकेचा किनारा, केप ऑफ गुड होप व हिंदी महासागरापर्यंतचा भारताकडे जाण्याचा मार्ग शोधून काढला. त्याची व क्रिस्तोफर कोलंबसची १४९३ मध्ये भेट झाली. वास्को द गामाच्या १४९७ मधील सफरीत केप व्हर्द बेटांपर्यंत दीयश बरोबर होता. पेट्रो आल्व्हरीश काब्रालच्या १५०० मधील ब्राझीलच्या सफरीतही एक अधिकारी म्हणून दीयश सहभागी झाला होता. या सफरीतील परतीच्या प्रवासात मात्र दक्षिण अटलांटिक महासागरात त्यानेच शोधून काढलेल्या भूशिराजवळ वादळामध्ये सापडून तो मरण पावला.

चौधरी, वसंत