कोचीन चायना : दक्षिण व्हिएटनाम राज्याच्या दक्षिण भागाचे पूर्वीचे नाव. अठराव्या शतकात फ्रेंचांनी आग्नेय आशियात वसाहती स्थापण्यास सुरुवात केली. १८६२ साली अनामकडून फ्रेंचांना कोचीन चायना मिळाला. १८८६ साली कोचीन चायना, अनाम, टाँकिन, लाओस आणि कंबोडिया (ख्मेर प्रजासत्ताक) यांचे फ्रेंच आधिपत्याखालील संघराज्य-फ्रेंच इंडोचायना-निर्माण झाले. दुसऱ्या महायुद्धात जपान्यांनी हा सर्व भाग घेतला. युद्धानंतर ब्रिटिशांकडून फ्रेंचांनी पुन्हा यावर ताबा मिळविला परंतु राष्ट्रीय चळवळींमुळे फ्रेंचांनी १९४८ साली यावरील आपला हक्क सोडला. १९५४ च्या जिनीव्हा करारानुसार दक्षिण व्हिएटनाम व उत्तर व्हिएटनाम निर्माण होऊन दक्षिण व्हिएटनाममध्ये कोचीन चायना व अनामचा दक्षिण भाग आणि उत्तर व्हिएटनाममध्ये टाँकिन व अनामचा उत्तर भाग समाविष्ट झाला. कोचीन चायना मेकाँग नदीचा समृद्ध त्रिभुजप्रदेश असल्यामुळे अतिशय सुपीक व महत्त्वाचा आहे [→व्हिएटनाम].

शाह, र. रू.