मादीरा बेटे : उत्तर अटलांटिक महासागरातील पोर्तुगालची बेटे ३२° ३० उ. ते ३३° उ. अक्षांश आणि १६° १३ ते १७° ३० प. रेखांश यांदरम्यानची ही बेटे पोर्तुगालच्या नैऋत्येस ८३० किमी., तर आफ्रिकेच्या वायव्य किनाऱ्यापासून ५४० किमी. अंतरावर आहेत. क्षेत्रफळ ७९६ चौ. किमी. या द्वीपसमूहात मादीरा व पोर्तू सांतू या वस्ती असलेल्या दोन प्रमुख बेटांशिवाय डिझेर्टश व सेल्व्हाझेन्‌श या निर्जन बेटांचा समावेश होतो. हा द्वीपसमूह पोर्तुगालचा ‘फूंशाल’ प्रांत म्हणून ओळखला जातो. लोकसंख्या २,५७,८२२ (१९८१). फूंशाल (४०,०५७–१९७०) हे या प्रांताच्या राजधानीचे ठिकाण असून ते मादीरा बेटावर आहे.

ही बेटे म्हणजे महासागरातील पर्वतांचे माथे असून ज्वालामुखीजन्य आहेत. मादीरा हे यांपैकी सर्वांत मोठे बेट असून त्याची लांबी ५६ किमी., रुंदी २२ किमी. व क्षेत्रफळ ७४० चौ. किमी. आहे. याला १४५ किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. बेटाच्या मध्यभागी पूर्व–पश्चिम पसरलेला डोंगराळ प्रदेश असून ब्राव्हा व सँओं व्हीसेंती या अनुक्रमे दक्षिणेस व उत्तरेस वाहणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यांमुळे बेटाचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग झाले आहेत. पूर्वकडील पर्वतरांगेत पिको रुझव्हो दे सँताना हे सर्वोच्च शिखर (१,८६२ मी.) आहे. पश्चिमेकडील पर्वतीय प्रदेश पठारासारखा असून त्यातील पाऊल दा सेर या भागाची उंची १,५०० मी. आहे. किनारी प्रदेशांत वालुकामय पुळणी व डोंगरउतारांवर बेसाल्टचे उभे कडे आढळतात. उत्तर किनारी भागातील कडे अधिक तीव्र उताराचे आहेत. त्यांपैकी काबो झिराओ कडा जगातील सर्वोच्च कड्यांपैकी एक समजला जातो. पर्वतउतारांवरून वेगाने वाहणाऱ्या प्रवाहांमुळे खोल घळ्या निर्माण झाल्या आहेत.

पोर्तू सांतू हे यांतील दुसरे महत्त्वाचे बेट असून ते मादीरा बेटाच्या ईशान्येस ४६ किमी. आहे. १७ किमी. लांब, ५ किमी. रुंद व ४२ चौ. किमी. क्षेत्र असलेल्या या बेटावरील पिको दो फॅचो हे सर्वोच्च (५१७ मी.) शिखर आहे. बेटाच्या आग्नेय किनाऱ्यावरील पोर्तू सांतू हे येथील प्रमुख शहर व बंदर असून ते ‘व्हिला’ या स्थानिक नावाने ओळखले जाते. क्रिस्तोफर कोलंबसाचे काही काळ या शहरात वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. या बेटावर पाणी व वनस्पती यांचे प्रमाण कमी आहे. मादीराच्या आग्नेयीस सु. ३२ किमी. वर डिझेर्टश हा निमुळत्या आकाराचा द्वीपसमूह असून त्यात चँओ, डिझेर्टश ग्रांदे व बुगीओ बेटांचा समावेश होतो. यांपैकी ११ किमी. लांबीचे डिझेर्टश ग्रांदे हे सर्वांत मोठे बेट आहे. मादीरा व दक्षिणेकडील कानेरी बेट यांदरम्यान मादीरापासून २५१ किमी. वर सेल्व्हाझेन्‌श द्वीपसमूह आहे. त्यात सेल्व्हाझेन्‌श ग्रांदे व पिटन बेटांचा समावेश होतो. यांपैकी २·६ किमी. लांबीचे व २·२ किमी. रुंदीचे पिटन हे सर्वांत मोठे बेट आहे.

मादीरा बेटांच्या हवामानावर ईशान्य व्यापारी वाऱ्यांचा परिणाम झालेला दिसतो. हवामान सौम्य असून वारे बहुधा उत्तरेकडून वाहतात. मादीरा बेटाच्या किनाऱ्यावरील कमाल व किमान तापमान अनुक्रमे २१° से. व १७° से. असते. फूंशाल येथील सरासरी पर्जन्यमान ६६ सेंमी. आहे. या बेटावरील पूर्व-पश्चिम पर्वतरांगेमुळे दक्षिणेकडील व उत्तरेकडील हवामानांत भिन्नता आढळते. उत्तर उतारावर पर्जन्यमान अधिक आहे. पाऊस प्रमुख्याने ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात पडतो. काही वेळा सहारावरून येणाऱ्या उष्ण व कोरड्या लेस्ट वाऱ्यांमुळे तापमान ३३·९° से.पर्यंत वाढते.

वसाहतीसाठी येथील अरण्य जाळण्यात आले. त्यामुळे बहुतेक जंगले जास्त उंचीच्या प्रदेशात आढळतात. बेटांवर उष्ण कटिबंधीय प्रकारच्या वनस्पती आहेत. पाइन, लॉरेल या मुख्य वनस्पति-प्रकारांशिवाय ताड, हिकरी, कापूर, अक्रोड, हूप पाइन, यूकॅलिप्टिस, बांबू, नेचे हे वृक्षप्रकार दिसून येतात. बेटांवर फारसे वैशिष्ट्यपूर्ण प्राणी नाहीत. ससे व रानशेळ्या यांची संख्या बरीच आहे. किनाऱ्यावर ट्यूना, मॅकेरेल इ. प्रकारचे मासे सापडतात.

फिनिशियन लोकांना ही बेटे ज्ञात असल्याचे म्हटले जात असले, तरी तसे पुरावे नाहीत. प्लीनीने केलेले बेटांचे वर्णन या बेटांशी मिळते–जुळते आहे. जेनोआच्या लोकांना ती १३३९ पूर्वी माहीत होती.रोमनांना ही ‘पर्पल बेटे’ या नावाने ज्ञात होती. पोर्तुगालच्या प्रिन्स हेन्री द नॅव्हिगेटर याच्या आदेशावरून जुआंव गोंसाल्व्हिझ झार्कू व त्रिशताऊँ व्हाझ तेइशेरा यांनी १४१८–२० मध्ये या बेटांवर जाऊन अल्पावधीत तेथे वसाहती स्थापन केल्या. पोर्तुगीज भाषेत ‘मादीरा’ म्हणजे ‘लाकूड’. बेटावरील घनदाट अरण्यांमुळे मुख्य बेटाला मादीरा हे नाव देण्यात आले. १४२१ मध्ये फूंशाल शहराची स्थापना झाली. १५८० ते १६४० या काळात मादीरा बेटे स्पॅनिशांच्या ताब्यात होती. मार्केज् द पोंबाल या पोर्तुगीज अधिकाऱ्याच्या आदेशावरून १७७५ मध्ये येथील गुलामांचा व्यापार बंद झाला. १८०१ मध्ये काही महिने व १८०७ ते १८१४ या काळात ही बेटे ब्रिटिशांच्या ताब्यात होती. त्यांनीच येथे मद्यनिर्मिती उद्योगाचा विकास केला. शेवटी ती पोर्तुगालला परत मिळाली. पोर्तुगालच्या १९७४ मधील क्रांतीनंतर या बेटांना प्रादेशिक स्वायत्तता मिळाली (१९७६). मादीराची स्वतंत्र राजकीय व प्रशासकीय संघटना असून स्वतंत्र संसद व प्रादेशिक विधिमंडळही आहे.

मादीला बेटांवर लाव्ह्यापासून बनलेली सुपीक जमीन असली, तरी प्रतिकूल भूरचनेमुळे शेती फार कष्टाची आहे. तरीही एक-तृतीयांश लोकसंख्या शेतीव्यवसायात गुंतलेली आहे. भूधारणेचे प्रमाण फारच कमी, म्हणजे सरासरी ०·८१ हे किंवा त्याहीपेक्षा कमी असून दरडोई उत्पन्नही कमी आहे. शेती मागासलेली असून डोंगरउतारांवर खाचरे पाडून पारंपारिक पद्धतीने ती केली जाते. ९१५ मी. पेक्षा अधिक उंचीचा भाग शेतीस किंवा लोकवस्तीस अनुकूल नाही. उन्हाळ्यात जलसिंचनाची आवश्यकता भासते. त्यासाठी जलाशय व कालवे काढलेले आहेत. गहू, बटाटे, रताळी, सातू, कांदे, पालेभाज्या, ऊस, केळी, संत्री, लिंबू, नारिंग, अंजीर, सफरचंद, पेरू, आंबे, द्राक्षे, अननस इ. कृषि–उत्पादने, मुख्यतः फलोत्पादने, घेतली जातात. द्राक्षांपासून मद्यनिर्मिती मोठ्या प्रमामावर केली जाते. येथील ‘मादीरा वाइन’ प्रसिद्ध आहे. हस्तव्यवसाय, दुग्धोत्पादन, मासेमारी, पर्यटन व्यवसायही महत्त्वाचे आहेत. भरतकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. फेल्प्स या ब्रिटिश महिलेने १८५० मध्ये येथे ह्या व्यवसायाचा पाया घातला. आज या व्यवसायात अनेक स्त्रिया गुंतलेल्या आहेत. भरतकाम केलेल्या वस्तूंची निर्यातही बरीच होते. गवताचे वा वेताचे विणकाम हा व्यवसाय छोट्या प्रमाणात चालतो. येथे दोन जलविद्युत् प्रकल्प असून तेथील वीज मादीरा बेटाच्या सर्व भागांना पुरविली जाते. सम हवामानामुळे हिवाळ्यातील सहलीचे स्थळ म्हणून मादीरा प्रसिद्ध आहे. पर्यटन व्यवसाय हे लोकांच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन असून त्यामुळे भरतकाम, वेताच्या व गवताच्या वस्तूंचे विणकाम या कुटिरोद्योगांच्या विकासास मदत झाली आहे.

मादीरामधील लोक पोर्तुगीज वंशाचे असले, तरी निर्गो, मूरिश व इटालियन लोकांची काही वैशिष्ट्ये त्यांच्यामध्ये आहेत. रोमन कॅथलिक हा येथील प्रमुख पंथ आहे. लोकसंख्येची घनता जास्त आहे. (दर चौ. किमी. स. ३४३). लोकसंख्या प्रामुख्याने नद्यांच्या मुखाजवळ व पर्वतपायथ्याच्या किनारी प्रदेशातच आढळते. अत्यंत दाट लोकसंख्या, रोजगाराचा अभाव व वाढते दारिद्र्य यांमुळे बरेचसे लोक अमेरिका, कॅनडा, ब्राझील, व्हेनेझुएला, द. आफ्रिका इ. देशांना स्थलांतर करतात.

फूंशाल हे राजधानीचे ठिकाण असून यूरोपकडून लॅटिन अमेरिका व आफ्रिका यांच्याकडे जाणाऱ्या सागरी मार्गांवरील प्रमुख बंदर आहे. तसेच तेथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नभोवणी व दूरचित्रवाणी केंद्र आहे. येथून दोन दैनिके प्रसिद्ध होतात.

माँते, सँतू अँतॉन्यू दा सेर व कमाश ही पर्वतीय भागातील सहलीची स्थळे आहेत. सोळाव्या शतकातील चर्च, वस्तुसंग्रहालय, मदीरा मद्य संघाचे भुयार, बाजारपेठ, वनस्पती उद्यान ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे होत.

चौधरी, वसंत