द्येगो गार्सीआ : हिंदी महासागरातील चागोस द्वीपसमूहामधील प्रमुख पाच कंकणाकृती प्रवाळ बेटांपैकी एक बेट. ७° २० द. अक्षांश व ७२° २५ पू. रेखांश यांदरम्यान असलेल्या या बेटाची लांबी २१ किमी. व कमाल रुंदी ७ किमी. असून क्षेत्रफळ सु. १२० चौ. किमी. आहे. बेट भरतीपातळीपेक्षा फक्त १·८ मी. उंच असून येथे असलेले खारकच्छ ४२ मी. खोल आहे. बेटावर शेतीयोग्य जमीन अगदी अल्प आहे. येथे नारळाची झाडे पुष्कळ असून खडकांच्या थरांत गोड्या पाण्याचे साठे आहेत. द्वीपाच्या आजूबाजूस उथळ पाण्यात माणसाला खाण्यायोग्य काही सागरी वनस्पती आहेत. द्येगो गार्सीआच्या विषुववृत्तानजीकच्या स्थानामुळे हवामान सदोदित उष्ण असून वार्षिक सरासरी तपमान २६° से. असून वार्षिक पर्जन्यमान सु. २०० सेंमी. पर्यंत असते. प्रथमतः हे मॉरिशसच्या मालकीचे होते. परंतु १७२२ मध्ये फ्रेंच, १८१० मध्ये ब्रिटिश व १९६८ मध्ये परत मॉरिशस अशी सत्तांतरे झाल्यानंतर द्येगो गार्सीआसह चागोस द्वीपसमूह मॉरिशसकडे आला. मॉरिशसने हा द्वीपसमूह नंतर ब्रिटनला ३० लाख पौंडांस विकला. परंतु या द्वीपसमूहात काही खनिजे सापडल्यास ती मॉरिशसच्या मालकीची राहतील असेही यावेळी ठरले. पुढे ब्रिटन व अमेरिका यांत करार होऊन त्या करारनुसार द्येगो गार्सीआमध्ये ब्रिटनने अमेरिकेस नाविक तळ बांधण्यास परवानगी दिली.

द्येगो गार्सीआचे स्थान मोक्याचे आहे. विशेषतः भारताच्या दृष्टीने पाहता कन्याकुमारीपासून हे बेट १,६०० किमी. वर म्हणजे जवळच आहे. त्याच्या चंद्रकोरीच्या आकारामुळे ते एक उत्तम बंदर बनले आहे. हिंदी महासागराच्या मध्यभागी हे प्रवाळद्वीप असून याच्या नैर्ऋत्येस असलेला केप मार्ग व मोझँबीकची खाडी, वायव्येकडील तांबडा समुद्र, सुएझ मार्ग व तेलसमृद्ध इराणचे आखात, भारताची लक्षद्वीप व अंदमान बेटे आणि तेथील नाविक तळ, हिंदी व पॅसिफिक महासागर यांना जोडणारी मलॅक्का व सूंदा सामुद्रधुनी, क्रा संयोगभूमी, कराची बंदर व कराची–कॅश्गार हमरस्ता इ. ठिकाणच्या नाविक व लष्करी हालचालींवर योग्य प्रकारे नजर ठेवण्याच्या दृष्टीने द्येगो गार्सीआ येथील नाविक तळ किंवा दळणवळणाचे केंद्र अनन्यसाधारण महत्त्वाचे ठरते. बेटाची रचना, भूस्तरीय घडण व बेटाजवळील समुद्राची खोली या सर्व गोष्टी प्रचंड युद्धनौका, विमानवाहू नौका व क्षेपणास्त्रांनी सुसज्ज अशा पाणबुड्या इत्यादींच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत व त्या दृष्टीने होणाऱ्या बांधकामासही योग्य आहेत.

सूदान आणि ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या अमेरिकेच्या दळणवळण नियंत्रक केंद्रांना जोडणारा मध्यवर्ती दुवा म्हणून द्येगो गार्सीआ येथे तळ बांधला जात आहे, असे ब्रिटन–अमेरिकेकडून सांगण्यात आले. व्हिएटनाम–युद्धातून अमेरिका मोकळी झाल्याने सातव्या आरमारास तेलपाणी घेण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी, नौसैनिकांना विश्रांतीसाठी सुसज्ज नाविक तळ हिंदी महासागरात मोक्याच्या जागी अमेरिकेस हवा आहे. हा तळ हिंदी महासागराभोवतालच्या देशांवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

सुएझच्या पूर्वेकडून १९७१ नंतर ब्रिटिश फौजा व नाविकदल निघून गेल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यास अमेरिका पुढे सरसावत आहे. हिंदी महासागरात सोव्हिएट रशियाचे वर्चस्व निर्माण होणे जरी कठीण असले, तरी त्या सबबीवर रशियाला शह देण्याच्या दृष्टीने या बेटाचे लष्करी महत्त्व मोठे आहे. द्येगो गार्सीआ येथे सुसज्ज नाविक तळ, ५ किमी. लांबीची धावपट्टी असलेला विमानतळ, सु. ५०० नौसैनिक राहतील असे विश्रामस्थान अमेरिकेने तयार केलेले आहे. द्येगो गार्सीआमुळे हिंदी महासागरात तणाव–क्षेत्र निर्माण झालेले असून भारत, श्रीलंका इ. अलिप्ततावादी विकासनशील राष्ट्रांनी अमेरिकन तळास विरोध केलेला आहे. हिंदी महासागर हे शांततेचे क्षेत्र असावे अशी या विरोधामागे भूमिका आहे.

भागवत, अ. वि.