मच्छलीपटनम् : आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र व प्रमुख बंदर. लोकसंख्या १,३८,५२५ (१९८१). हे विजयवाड्याच्या आग्नेयीस सु. ६४ किमी. बंगालच्या उपसागरावर वसले आहे. लोहमार्ग वाहतुकीचे हे अंतिम स्थानक असून ते विजयवाड्याला बंदर कालव्याने जोडलेले आहे.

सातवाहनांपासून (इ.स.पू. २३० ते इ.स. २३०) मच्छलीपटनम् (मसुलीपट्टम) हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील एक महत्त्वाचे बंदर म्हणून भरभराटीस आलेले होते. शहराचे प्रवेशद्वार माशाच्या डोळ्यांनी सुशोभित करून उभारण्यात आल्यामुळे यास ‘मच्छलीपटनम्’ असे नाव मिळाले. कुत्बशाहीचे (१५१८–४३) मसुलीपट्टम् हे महत्त्वाचे बंदर असल्याकारणाने शहराला ‘बंदर’ असे नाव पडले.याच नावाने ते सांप्रत ओळखले जाते. ही ब्रिटिशांची बंगालच्या उपसागरावरील पहिली व्यापारी वसाहत होय (१६११). १६८६ ते १७५९ या कालावधीत हे शहर आलटूनपालटून फ्रेंच, डच आणि ब्रिटिश यांच्या ताब्यात होते. ब्रिटिशांनी ते अखेरीस फ्रेंचांपासून १७५९ मध्ये काबीज केले. १८६४ मध्ये बंगालच्या उपसागरातील चक्री वादळामुळे शहराचे मोठे नुकसान होऊन सु. ३०,००० लोक प्राणास मुकले.

बंदर हे ⇨कलमकारीसाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्योत्तर काळात ते शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यापारी व औद्योगिक दृष्ट्या विकसित झाले. येथे शास्त्रीय उपकरणांच्या निर्मितीचा कारखाना असून भात सडण्याच्या गिरण्या, गालिचे विणणे इ. व्यवसायही चालतात. येथे ‘अखिल भारतीय विणकर संस्थे’ चे मुख्यालय आहे. आंध्र विद्यापीठाशी संलग्न अशी तीन महाविद्यालयेही येथे आहेत. शहरात कन्यकापरमेश्वरी (शिवगंगाम्मा), नागेश्वरस्वामी, वेणुगोपालस्वामी तसेच चिलकलापुडी (पांडुरंग) यांची मंदिरे आहेत. पांडुरंगाचे मंदिर अतिशय भव्य असून आंध्र प्रदेश राज्यात त्याला मोठे महत्त्व दिले जाते. चैत्र शुद्ध पौर्णिमेला शिवगंगाम्मा देवीचा उत्सव कार्तिक शुद्ध दशमीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालणारा पांडुरंगस्वामीचा उत्सव हे येथील दोन महत्त्वाचे उत्सव गणले जातात.

गद्रे, वि रा. गाडे, ना. स.