बोमाँट : अमेरिकेच्या टेक्सस राज्यातील जेफर्सन परगण्याचे मुख्य ठिकाण आणि देशांतर्गत अत्याधुनिक बंदर. लोकसंख्या १,१८,०३१ (१९८०). हे नेचिस नदीकाठी, मेक्सिकोच्या आखातापासून सु. ४० किमी. ह्यूस्टनच्या पूर्वेस १३७ किमी. वर वसले आहे. सॅबीन-नेचिस या खोल नदीकालव्याने किनारी व अंतर्गत प्रदेशांशी येथून थेट मिसिसिपी नदीपर्यंत जलवाहतूक होते. यामुळेच परदेशी व्यापारही सुकर बनला आहे. रस्ते, लोहमार्ग आणि जवळच असलेला विमानतळ या दळणवळणाच्या सर्व सोयीमुळे बोमाँट हे आसमंतातील उद्योगधंद्यांचे आणि व्यापाराचे केंद्रच बनले आहे.

फ्रेंच आणि स्पॅनिश फर व्यापाऱ्यांनी तसेच संशोधकांनी १८२५ च्या सुमारास येथे प्रथम वस्ती केली असावी. याच वेळी नोआ टेव्हिस नावाच्या व्यक्तीने ‘टेव्हिस ब्लफ’ नावाचे गाव येथे वसविले होते. १८३५ मध्ये त्याने हेन्री मिलर्ड याला येथील बरीच जमीन शहर वसविण्यासाठी विकली. हेन्रीने जेफर्सन बोमाँट या आपल्या मेव्हण्याच्या नावाने हे शहर वसविले. फ्रेंच भाषेत ‘बो माँत’ (रम्य टेकडी) या अर्थीही या शहराला बोमाँट हे नाव मिळाले असावे. १८३८ मध्ये हे जेफर्सन परगण्याचे मुख्य ठिकाण बनले आणि १८८१ मध्ये येथे नगरपालिका स्थापन झाली.

प्रारंभी कापूस, ऊस, गुरेढोरे यांचे निर्यातबंदर म्हणूनच बोमाँटला महत्त्व होते. १९०१ मध्ये बोमाँटजवळ स्पिंडलटॉप येथे खनिज तेलाचा शोध लागला. तेव्हापासून तेलक्षेत्राचा विस्तार वेगाने होऊन व्यापारी जगात बोमाँटला प्रसिद्धी लाभली. येथील प्रचंड तेलशुद्धीकरण कारखान्यांना तिसांहून अधिक तेल नळांद्वारे तेलपुरवठा होतो. महत्त्वाच्या उद्योगधंद्यात गंधक, खनिज तेल, रसायने, कागद, कृत्रिम रबर उत्पादन, जहाजबांधणी, मांस डबाबंदीकरण, भात सडण्याच्या गिरण्या यांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो. परंपरागत स्वरुपाचे पशुपालन, लाकूड कापणे हे येथील प्रमुख व्यवसाय अजुनही टिकून आहेत. या बंदरातून दरवर्षी सु. दीड ते दोन कोटी टन मालाची निर्यात होते.

शहरात विविध शैक्षणिक सोयी असून सु. ४० विद्यानिकेतने आहेत. लामार विद्यापीठ व लामार स्टेट कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी (स्था. १९२३) प्रसिद्ध आहे. येथील नगरवाचनालये प्रख्यात असून तेलसंग्रहालय, कलासंग्रहालय, वाद्यवृंद, सिव्हिक ऑपेरा ग्रूप, कम्यूनिटी थिएटर इ. उल्लेखनीय आहेत. येथील विसांहून अधिक सार्वजनिक उद्यानांत पोहण्याचीही सोय आहे. एप्रिलमधील नेचिस नदीउत्सव (जत्रा), मे मधील घोड्यांचे प्रदर्शन व ऑक्टोबरमधील साउथ टेक्ससची जत्रा हे महत्त्वाचे वार्षिकोत्सव उत्साहाने साजरे होतात. बोमाँटपासून ७ किमी. वरील टेलफर्ड झुलता पूल प्रेक्षणीय आहे.

कापडी, सुलभा