बारामती : महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या ४२,२६० (१९८१). हे शहर पुण्याच्या आग्नेयीस ८० किमी. कऱ्हा नदीतीरावर वसले आहे. पुणे-दौंड-सोलापूर या लोहमार्गाचा उपफाटा दौडवरून दक्षिणेस बारामतीपर्यंत गेला आहे.

बारामती १६३७ मध्ये शहाजीराजांच्या ताब्यात होती. कविवर्य मोरोपंतांचे (१७२९-१७९४) आश्रयदाते बाबूजी नाईक यांचे इतिहासप्रसिद्ध घराणे बारामतीचेच. कऱ्हेच्या काठावर असलेल्या पराडकर वाड्यात मोरोपंतांचे बरीच वर्ष वास्तव्य होते. या वाड्यातील त्यांची खोली अजूनही सुव्यवस्थित ठेवलेली आहे.

येथे नगरपालिका (१८६५) असून औद्योगिक दृष्ट्याही शहराची प्रगती होत आहे. कापूसवटण, सिमेंटचे नळ, हिऱ्याला पैलू पाडणे इ. कारखाने येथे आहेत. शहरात कृषिविकास न्याय असून कृषी अवजारे, मोटार वाहने यांच्या दुरुस्तीच्या कर्मशाळाही येथे आहेत. तसेच गूळ, साखर व कापूस यांची येथे मोठी बाजारपेठ आहे. कातडी कमाविणे, तेलगिरण्या इ. उद्योगही येथे विकसित झालेले आहेत. शहरात मोठे सरकारी रुग्णालय असून खाजगी वैद्यकीय सेवाही उपलब्ध आहे. येथे प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन तसेच औद्योगिक प्रशिक्षणाच्या सुविधा आहेत. नगरपरिषदेचे सभागृह व कविवर्य मोरोपंत यांच्या स्मरणार्थ बांधलेले वाचनालय उल्लेखनीय आहे. सिद्धेश्वर मंदिरातील एक भव्य कोरीव नंदी, कसबा पेठेतील विश्वेश्वराचे मंदिर व कऱ्हेच्या काठावरील गणपतीचे देऊळ ही प्रेक्षणीय आहेत. यांशिवाय निरनिराळी शासकीय कार्यालये व विद्यार्थी वसतिगृहे, समाजकल्याण खात्याच्या संस्था, बँका, उद्याने, करमणुकीची केंद्रे इत्यादींनी हे शहर गजबजलेले आहे.

सावंत, प्र. रा.