शाकद्वीप : भारतीय पुराणांनी वर्णिलेल्या भूगोलाच्या (पृथ्वीच्या) सात द्वीपांपैकी (कुश, क्रौंच, जंबु, पुष्कर, प्लक्ष, शाक, शाल्मली) एक. शाकद्वीपाच्या नेमक्या स्थानासंबंधी तज्ज्ञांत मतभेद आहेत. मत्स्यपुराणातील वर्णनांनुसार याचा विस्तार ⇨जंबुद्वीपाच्या दुप्पट असून ते त्याच्या पूर्वेस होते. तसेच या द्वीपात सप्तपर्वत (मेरु, चंद्र, नारद, दुंदुभी, अस्त्र, झंबिके, बिभ्राज) असून त्यांचा विस्तार क्षारसमुद्र ते क्षीरसागर यांदरम्यान होता. याशिवाय सप्तमहासरिता (सुकुमारी, नंदा, पावनी, शिंशिका, ईक्षू, रेणुका, सुकृता) या प्रदेशातून वाहत होत्या. “शाक” नावाच्या वृक्षावरून याला हे नाव मिळाले असावे. शाक किंवा साग वृक्ष हे शाकद्वीपाचे वैशिष्ट्य असून त्याभोवती क्षीरसमुद्र पसरलेला आहे, असे वर्णन महाभारत, विष्णुपुराण, भविष्यपुराण  इ. ग्रंथांतही आढळते. या वर्णनांवरून मुझफर अली यांच्या मते भरपूर पाऊस, साग वृक्षांची विपुलता व जंबुद्वीपाच्या पूर्वेस असलेले मोसमी पावसाचे मलाया, थायलंड, इंडोचायना, दक्षिण चीन यांचे प्रदेश म्हणजे ‘शाकद्वीप’ असावे. वि.का. राजवाडे यांच्या मते, हे क्रौंच द्वीपाच्या पूर्वेला (सांप्रत मध्य आशियातील समरकंद-बूखारा यांचा प्रदेश) अलताई पर्वताच्या दिशेला होते. बुद्ध प्रकाश यांच्या मते कॅस्पियन समुद्राच्या उत्तर, पूर्व व पश्चिम दिशांना हे विस्तारलेले होते.

जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलच्या खंड ७१मध्ये आलेल्या एका संशोधनपर लेखनात ‘शक’ लोकांची वसती असलेला प्रदेश म्हणजे शकद्वीप &gt शाकद्वीप असावे, असे म्हटले आहे. सर्वसाधारणपणे मध्य आशियातील रशियन तुर्कस्तानसह (तुर्कमेनिस्तान) तार्तरी प्रदेश म्हणजे शाकद्वीप. सोथिया (कॅस्पियनचा पूर्वभाग) व सॉग्डियाना (बूखारा-समरकंद यांदरम्यान) हे शाकद्वीपाची भ्रष्ट रूपे असावीत. शकांचे (क्षत्रपांचे) राज्य सिंध, मथुरा, उज्जैन इ. भागांवर पसरलेले होते [→ शकसत्ता]. ‘शाकद्वीप’ म्हणजे मध्य आशियाचा विस्तृत प्रदेश असावा असे म्हटले जाते. भारतीय पुराणांतून शाकद्वीपातील विविध नद्या, पर्वत, प्रदेश यांची जी नावे आली आहेत, त्यांपैकी बऱ्याच नावांचे टॉलेमीने दिलेल्या व सांप्रतच्या नावांशी विलक्षण साम्य असल्याचे दिसून येते.

चौंडे, मा. ल.