व्होल्गा : युरोप खंडातील सर्वांत लांब व रशियातील सर्वांत महत्त्वाची नदी. व्होल्गाचा संपूर्ण प्रवाह रशियातूनच गेलेला आहे. लांबी ३,७०० किमी. व्होल्गा व तिच्या उपनद्यांचे पश्चिम रशियातील एकूण जलवाहनक्षेत्र १४,५८,९०० चौ. किमी. आहे. मॉस्कोच्या वायव्येस ३६५ किमी.वर, तर सेंट पीटर्झबर्गच्या (लेनिनग्राडच्या) आग्नेयेस ३२० किमी.वर असलेल्या व्हल्दाई टेकड्यांमधील दलदलयुक्त प्रदेशात ही नदी उगम पावते. उगमाजवळच एक लहानसे चर्च आहे. उगमापासून कामा नदी मिळेपर्यंतचे व्होल्गाचे खोरे मिश्र जंगलांचे आहे, तर ओका नदी मिळेपर्यंतच्या खोऱ्याचे भूमिस्वरूप हिमनद्यांच्या गाळाने आच्छादलेले आहे. उगमापासून ओका नदी मिळेपर्यंतचा वरचा टप्पा, तेथपासून कामा नदी मिळेपर्यंतचा मधला टप्पा, तर त्याच्या खालील मुखापर्यंतचा खालचा टप्पा असे व्होल्गा नदीचे तीन टप्पे पडतात.
व्हल्दाई टेकड्यांमधून बाहेर पडल्यानंतर व्होल्गा नदी लहान लहान अशा सहा सरोवरांच्या मालिकेमधून वाहत जाते. शेवटच्या सरोवराच्या थोडे खालच्या बाजूस नदीच्या वरच्या प्रवाहातून लहान बोटींच्या वाहतुकीसाठी १८४३ मध्ये एक लहान बंधारा बांधण्यात आला. नदी प्रथम आग्नेयेस १४४ किमी. वाहते. त्यानंतर रझेफपासून ती ईशान्येस वळते. कालीनिनपासून पुढे आल्यानंतर ती ५५ किमी. लांबीच्या ईव्हान्यकव्ह सरोवराला मिळते. या जलाशयातून बाहेर पडल्यानंतर पुढे ती ऊग्ल्यिच येथील दुसऱ्या जलाशयाला येऊन मिळते. त्यानंतर पुढे ती रिबन्स्क या प्रचंड सरोवराला मिळते. येथून ती आग्नेयवाहिनी होऊन दक्षिणेकडील ऊग्ल्यिच उच्चभूमी व उत्तरेकडील डन्यीलफ अपलँड आणि गाल्यिच – चूखलाम लोलँड यांमधील अरुंद दरीतून वाहत जाते व गॉर्कीच्या वरच्या बाजूस गरद्येत्स येथील धरणाच्या जलाशयाला जाऊन मिळते. यारोस्लाव्हल, कॉस्त्रमा, कीनिश्मा, गॉर्की या शहरांजवळून पुढे वाहत आल्यानंतर कझॅनजवळ ती दक्षिण वाहिनी होते. गॉर्की-कझॅन यांदरम्यानचा प्रवाह पूर्ववाहिनी आहे. कझॅनजवळ ती क्वीबिशेव्ह सरोवराला मिळते. येथे तिला डावीकडून कामा ही प्रमुख उपनदी येऊन मिळते. कझॅनपासून सराटफपर्यंत विस्तृत स्टेपी प्रदेशातून वाहते. स्टेपी प्रदेशाच्या मध्यभागी क्वीबिशेव्हजवळ उजव्या तीरावर असलेल्या ३७० मी. उंचीच्या झिबुली हिल्सच्या सभोवती या नदीने समारा हे एक मोठे वळण घेऊन धनुष्कोटी सरोवराची निर्मिती केलेली आहे. क्वीबिशेव्हजवळ द्वितीय बाकू हे प्रसिद्ध तेलक्षेत्र आहे. येथून दक्षिणेस नदीच्या डाव्या तीरावर २४५ –३०० मी. उंचीचा व्होल्गा हाईट्स हा चुनखडीयुक्त प्रदेश आहे. सर्व मोठ्या रशियन नद्यांप्रमाणेच व्होल्गा नदीचाही पश्चिम किनारा अधिक उंचीचा असून त्याला हिल बँक असे म्हटले जाते, तर सखल पूर्व किनारा मिडो बँक नावाने ओळखला जातो. समारा वळणापासून पुढे व्होल्स्क व सराटफजवळून नदी नैर्ऋत्येकडे वाहते. सराटफजवळ ती प्रसिद्ध व्होल्गोग्राड जलाशयाला मिळते. सराटफ ते व्होल्गोग्राडपर्यंतचा नदीप्रवाह मुख्य स्टेपी प्रदेशातून वाहतो. व्होल्गोग्राडपासून नदी आग्नेयवाहिनी होऊन सु. दोनशेवर फाट्यांमध्ये विभागली गेली आहे. हे सर्व फाटे कॅस्पियन डिप्रेशन या खोलगट भागातील खाऱ्या स्टेप व निमओसाड प्रदेशातून वाहत जाऊन ॲस्ट्राखानजवळ कॅस्पियन समुद्राला मिळतात. व्होल्गोग्राडच्या वरील ४८० किमी. लांबीचा नदीप्रवाह सस.पेक्षा खालच्या पातळीत आहे. मुखाशी तर नदीची उंची काळ्या समुद्रसपाटीपासून खाली २८ मी. आहे. कॅस्पियन समुद्राला मिळताना तिने मुखाशी विस्तृत त्रिभुज प्रदेशाची (रुंदी सु. ११० किमी.) निर्मिती केलेली आहे. त्रिभुज प्रदेशात विपुल वनस्पती व पशुपक्षी आढळतात.
व्होल्गा नदीच्या उगमस्थानानंतर थोड्या अंतरापासूनच तिचे पात्र रुंदावत जाते. रझेफ येथे नदीपात्राची रुंदी १५० मी., कालीनिन (ट्वेर) येथे २१६ मी., कॉस्त्रमा येथे ६०० मी., तर कामापासून दक्षिणेस मुखापर्यंत तिच्या पात्राची रुंदी तीन किमी.पेक्षा अधिक आहे. वसंत ऋतूतील पुराच्या वेळी सखल डाव्या किनाऱ्यावर १६ किमी.पर्यंत पुराचे पाणी पसरते. नदीतील पाण्याची खोली स्थलपरत्वे व ऋतूपरत्वे बदलते. तुलनेने तिचे पात्र उथळ असते. नदीला जो एकूण पाणीपुरवठा होतो, त्यापैकी ६०% बर्फ वितळून, ३०% भूमिगत जलसाठ्यापासून व १०% पावसापासून होतो. सराटफपासून त्रिभुज प्रदेशापर्यंत उजवीकडून एकही मोठी नदी व्होल्गाला मिळत नाही. डाव्या तीरावरूनही मधल्या व खालच्या टप्प्यात फारच थोड्या लहान उपनद्या येऊन मिळतात. वरच्या टप्प्यात उजवीकडून अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यांपैकी ओका, सुरा, स्वियागा व तेरेश्का या महत्त्वाच्या नद्या आहेत. त्व्हेत्सा, मोलोगा, शेक्सना, कॉस्त्रमा, ऊंझा, कर्झेनेट्स, व्हेटलूगा, कोक्शागा, कामा, चेरेमशान, सोका, समारा, चापेवका व इरगिझ या डाव्या तीरावरील प्रमुख उपनद्या आहेत. अनेक मोठ्या रशियन शहरांची वाढ व्होल्गा नदीकाठाने झाली आहे. कालीनिन, रिबन्स्क (श्चेरबाकॉव्ह), यारोस्लाव्हल, कॉस्त्रमा, कीनिश्मा, गॉर्की, कझॅन, उल्यानफ्स्क (सिबीर्स्क), क्वीबिशेव्ह (समारा), व्होल्स्क, सराटफ, व्होल्गोग्राड व ॲस्टाखान ही नदीकाठावरील प्रमुख शहरे व बंदरे आहेत.
चौधरी, वसंत