कर्नाली : (कौरिआला). पश्चिम नेपाळमधील एक प्रमुख नदी. लांबी सु. ३२० किमी. अलमोडा येथील हिमालय-संशोधक स्वामी प्रणवानंद यांच्या मते ही हिमालयाच्या झास्कर रांगेतील तापिया खिंडीजवळ एका हिमनदीतून उगम पावते. ती आग्नेयीकडे वहात जाऊन खोजरनाथ येथे नेपाळात शिरते. हुमला कर्नाली या नावाने पूर्वेकडे वहात गेल्यावर तिला टांके नदी मिळते. तेथे ती जवळजवळ नैर्ऋत्य-दक्षिण दिशेने जाते. नंतर तिला मूगुकर्नाली व कुमारी नद्या मिळतात. पुढे ‘तिला’ नदी मिळाल्यावर ती नैर्ऋत्य व आग्नेपय दिशांनी जाऊन महाभारत पर्वतरांगेतून वाट काढून वायव्येकडे जाते. सेती नदी मिळाल्यावर तिला थुली नदी मिळते तेथे ती पुन्हा आग्नेमयीकडे वाहते. भेरी नदीच्या संगमानंतर तिचे दोन प्रवाह होतात. नैर्ऋत्येकडे कर्नाली (कौरिआला) नावाने जाऊन कौरिआलाघाटाजवळ व दक्षिणेकडे गिरवा नावाने जाऊन कतार्निऊन घाटाजवळ ती नेपाळातून बाहेर पडून भारतात येते. हे प्रवाह पुढे एकत्र होऊन घागरा या नावाने ही नदी गंगेला मिळते. दोन प्रवाह होण्यापूर्वी शिवालिकमधून बाहेर पडताना ती शिशापाणी या काचेसारख्या स्वच्छ व शांत आणि खोल पाण्याच्या निदरीतून वाहते. येथे ती सु. ३०० मी. रुंद असून तिच्या काठावरील उभे कडे सु. ८०० मी. उंचीचे आहेत. बाहेर पडल्यावर तिची रुंदी सु. ८०० मी. होते व तिच्यावर अनेक निसर्गसुंदर द्रुतवाह दिसून येतात. लहानलहान दऱ्याखोऱ्यांतून शेती, पशुपालन व अरण्यावलंबी व्यवसाय चालतात. या नदीवर ठिकठिकाणी लाकडी पूल बांधलेले असून त्यांवरून डोंगराळ मार्गांनी माणसाच्या किंवा याकच्या पाठीवरूनवाहतूकहोते.तांदूळ, सातू, मका, बटाटे इ.उत्पन्ने हिच्याकाठच्या भागात होतात व फळेही अनेक प्रकारची होतात. या नदीमार्गे धान्ये, फळे, तूप, इमारतीलाकूड, सुंठ, मिरी, कात इ.विविध पदार्थ निर्यात होतात.कर्नालीवर वीज उत्पन्न करण्याचा प्रकल्प संयुक्त राष्ट्रांनी पुरस्कारिलेला आहे.महाभारत लेख व मलका दांडा या पर्वतरांगांच्या दोहोबाजूंनी जाणारे तिचे प्रवाह अनुक्रमे २⋅६ किमी व ५⋅५ किमी.लांबीच्या बोगद्यांनी जोडून अनुक्रमे १८० मी.व ११० मी.खोलीवर कमीत कमी दर सेकंदास ३०० घ.मी.पाण्याचा प्रवाह मिळेल व बांधन घालता सु.१३ लक्ष किवॉ.वीज मिळू शकेल. वीजउत्पादनाची ही जगातील सर्वांत स्वस्त योजना ठरेल.या विजेवर नेपाळचे उद्योगधंदे तर वाढतीलच, परंतु पुष्कळशी वीज ‘निर्यात’ ही करता येईल कारण कर्नालीच्या दक्षिणेस फक्त २०० किमी.लखनौ आहे.

संदर्भ : Hugen, Toni, Nepal – The Kingdom in the Himalayas, New Delhi, 1961.

कुमठेकर, ज.ब.