वू नदी : (वू ज्यांग). चीनच्या दक्षिण भागातून वाहणारी यांगत्सी नदीची उपनदी. लांबी सु. १,१०० किमी. जलवाहन क्षेत्र ८०,००० चौ.किमी. चीनमधील पश्चिम ग्वेजो प्रांतातील टेकड्यांत उगम पावून उभ्या कड्यांच्या अरुंद घळईतून ती पूर्वेकडे वाहत जाते. सूनान येथून उत्तरेकडे वळून ती झेच्‌वान प्रांतात प्रवेश करते. फू-लिंग येथे ती यांगत्सी नदीला मिळते. ग्वेजो प्रांताचा बराचसा भाग खूपच खडकाळ, उंचसखल व विरळ लोकसंख्येचा आहे. त्यामुळे विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हिचा जलवाहतुकीच्या दृष्टीने उपयोग होऊ शकला नव्हता. परंतु १९५० च्या दशकापासून सु. ५०० किमी.चा प्रवाह मोटारबोट वाहतुकीसाठी सुलभ करण्यात आला आहे.

चौधरी, वसंत