सिएना : मध्ययुगीन कला अवशेषांसाठी प्रसिद्घ असलेले इटलीतील एक शहर. लोकसंख्या ५४,५२६ (२०१०). डोंगरमाथ्यावर विस्तारलेले हे शहर सिएना प्रांताच्या राजधानीचे ठिकाण असून तस्कनी विभागामध्ये फ्लॉरेन्सच्या दक्षिणेस सु. ४८ किमी.वर वसले आहे. मूळची ही इट्रुस्कन वसाहत होती. नंतर ती रोमन व लोंबार्ड लोकांनी पादाक्रांत केली. त्यावर फ्रेंचांनी पुढे आक्रमणे केली. अखेर सिएना बाराव्या शतकात स्वतंत्र गणराज्य झाले तथापि फ्लॉरेन्स बरोबर त्याचा सीमांच्या बाबतीत सतत संघर्ष चालू राहिला मात्र सिएनाचे आर्थिक आणि व्यापारी क्षेत्रातील महत्त्व अबाधित राहिले. फ्लॉरेन्सचा ४ सप्टेंबर १२६० च्या माँतापेर्तीच्या लढाईत पराभव केल्यानंतर सिएनाचा राजकीय उत्कर्ष झाला. त्याला पूर्ण स्वायत्तता लाभली आणि तेथे अनेक सुंदर इमारतींचे बांधकाम झाले. त्या चित्रांनी-शिल्पांनी सुशोभित करण्यात आल्या परंतु १४८७ मध्ये पांदाल्फो पेत्रूत्ची या हद्दपारीतील सरदाराने सिएना काबीज करुन तेथे एकतंत्री कारभार आणला. त्याच्या कारकीर्दीत (१४८७ –१५१२) स्पेन व फ्रान्स यांनी आक्रमणे केली. त्याच्या मृत्यूनंतर (१५१२) त्याच्या घराण्याने १५२४ पर्यंत सत्ता गाजविली. पुढे सिएना स्पेनला अनेक वर्षांच्या संघर्षानंतर शरण गेले (१५५५). दोन वर्षानंतर स्पॅनिश राजा दुसरा फिलिप याने ते फ्लॉरेन्सच्या स्वाधीन केले. पुढे १८६१ मध्ये सिएना तस्कनीसह इटलीच्या नवीन राज्यात अंतर्भूत झाले. दुसऱ्या महायुद्घात सिएनातील मध्ययुगीन वास्तूंना फारशी झळ पोहोचली नाही.

सिएना शहराभोवती तटबंदी असून सोळाव्या शतकानंतर या तटबंदीबाहेर नवीन शहराची वस्ती झाली तरी सुद्घा सिएनाची मध्ययुगीन वैशिष्ट्ये तशीच राहिली. जुन्या शहराच्या मध्यभागी शंक्वाकार भव्य चौक असून त्यास ‘पिएझ्झा देल काम्पो ’ म्हणतात. या चौकात दरवर्षी उन्हाळ्यात दोनदा (२ जुलै व १६ ऑगस्ट ) घोड्यांच्या शर्यती होतात. त्यांना ‘पालियो’ म्हणतात. त्या शर्यती पाहण्यासाठी देश-परदेशातील अनेक लोक जमतात. या चौकाच्या बाजूला भव्य सार्वजनिक प्रासाद ( पालात्सो पब्लिको ) आहे (१३१०). तिथे सिएना गणराज्याचे शासकीय कार्यालय होते. या प्रासादाचा आतील भाग अलंकृत असून त्याच्या भिंतीवर सीमोने मार्तीनी व आम्ब्रॉजो लोरेंत्सेती या ख्यातनाम सिएनी कलाकारांनी काढलेली उत्कृष्ट भित्तिलेपचित्रे आहेत. याच प्रासादात जुन्या कारंजाचे अवशेष आहेत. या प्रासादाच्या एका बाजूला १०२ मी. उंचीचा घंटामनोरा आहे (१३४८). या प्रासादाव्यतिरिक्त तोलोमी, ब्वान्सीनोरी, सॅन्सेदोनी, सालिम्बेनी इ. प्रसिद्घ राजप्रासाद आहेत आणि त्यांतूनही चित्रांचे अलंकरण आढळते. सिएनामधील भव्य कॅथीड्रल (बारावे ते चौदावे शतक) मूलतः रोमनेस्क शैलीत बांधलेले असून त्यात इटालियन गॉथिक शैलीचाही अंतर्भाव दिसून येतो. ही वास्तू मध्ययुगीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असून त्याच्या दर्शनी भागाची रचना प्रसिद्घ वास्तुशास्त्रज्ञ पिसानो जोव्हान्नी याने केली आहे तर मायकेलअँजेलो आणि अन्य कलाकारांनी त्यावर चित्रे काढली आहेत. त्यांतील कुमारी मेरी आणि येशू यांच्या जीवनातील द्दश्ये अप्रतिम आहेत. एकूण वास्तूची बांधणी कृष्णधवल संगमरवरात केली आहे. सिएनात ग्वीदो ऑफ सिएना, बॉनिन्‌सेन्या, सीमोने मार्तीनी, आम्ब्रॉजो आणि पिएत्रो लोरेंत्सेती आदींसारखे मोठे चित्रकार झाले. त्यांनी सिएनीज चित्रशैली आणि शिल्पशैली वृद्घिंगत केली व एक स्वतंत्र चित्रप्रणाली गॉथिक शैलीत द्दग्गोचर झाली. तिचा प्रभाव १३-१४ व्या शतकांतील शिल्पे, भित्तिचित्रे आणि व्यक्तिचित्रणांतून जाणवतो.

सिएनामधील सेंट बेर्‌नार्दिनो (१३८०–१४४४) आणि सेंट कॅथरिन (१३४७ –८०) हे इटालियन धर्मगुरु प्रसिद्घ आहेत. मध्ययुगीन वास्तूंबरोबरच येथील युनिव्हर्सिटी ऑफ सिएना (स्था. १२४०), संगीत अकादेमी, वस्तुसंग्रहालय इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत. हे शहर फ्लॉरेन्सशी लोहमार्ग व रस्त्याने जोडलेले असून शहरामध्ये छोटे उद्योगधंदे चालतात. त्यांपैकी मद्यार्कनिर्मितीचा ( वाईन ) उद्योग महत्त्वाचा आहे. मध्ययुगीन कलावशेष आणि परंपरागत घोड्यां च्या शर्यती, यांमुळे हे शहर पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.

देशपांडे, सु. र.